गोलमाल अगेन या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. या सिनेमाशी निगडीत असलेल्या छोट्या गोष्टीदेखील वाऱ्याच्या वेगासारख्या सर्वत्र पसरत असल्याचे पहायला मिळत आहे. गोलमाल सिरीजमधला हा सिनेमा एन दिवाळीत प्रदर्शित होत असल्यामुळे सिनेचाह्त्यांसाठी तो 'सोने पे सुहागा' ठरत आहे. अश्या या गोलमाल अगेन सिनेमाच्या सेटवरील पहिल्या दिवसाची गोष्ट नुकतीच श्रेयस तळपदे यांनी एका मुलाखतीत प्रसारमाध्यमांना सांगितली. पहिल्याच दिवशी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सगळ्यांना आपापल्या केरेक्टरचा सराव करायला सांगितला होता. परंतु कोणीही त्यासाठी उत्साही दिसत नव्हतं. त्यावेळी रोहित शेट्टीने अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू यांना आपल्याला यावेळी पूर्वीच्या गोलमालपेक्षा सुपरहिट कॉमेडी करायची असल्याचे सांगितले. रोहितला अपेक्षित असलेला उत्साह त्याला टीममध्ये दिसून येत नसल्यामुळे, त्याने लगेचंच गोलमाल ३ च्या स्क्रीनची व्यवस्था केली. त्यानंतर अर्धा तास त्याने यावर चर्चादेखील केली. 'गोलमाल ३' पाहिल्यानंतर प्रत्येकांना आपापल्या पात्रांची चांगलीच उजळणी झाली होती, त्यामुळे पुन्हा एकदा तब्बल सात वर्षानंतर तीच पात्र नव्या जोमाने वठवण्यास आम्ही सगळे तयार झालो असल्याचे श्रेयसने सांगितले. गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली, त्यावेळी आम्ही सात वर्षानंतर शूट करतोय असे वाटलेच नाही, रोहितच्या इन्स्पिरेशनमुळे मागच्याच आठवड्यात गोलमाल ३ चे शूट पूर्ण झाले आणि आता आम्ही सर्व गोलमाल अगेनला सुरवात करतोय अस वाटून गेले, असे देखील श्रेयसने पुढे सांगितले.