सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजमधील माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलचे आक्षपार्ह संवाद काढणार नाही यावर ठाम असल्याचं नेटफ्लिक्सने दिल्ली हायकोर्टात सांगितलं आहे. या वेब सीरिजच्या काही दृश्यांत राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढून टाकावेत अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती. यावर ‘तो शब्द बदलायचा आहे की नाही याचा निर्णय तुम्ही घ्या. त्यावरून आम्ही तुमच्यावर दबाव आणणार नाही,’ असं कोर्टाकडून सांगण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.
‘आम्हाला संवाद बदलायचे नाहीत,’ असं नेटफ्लिक्सची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी कोर्टात सांगितलं आहे. ‘ही वेब सीरिज वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असून, त्यातल्या एका व्हर्जनच्या भाषांतरामध्ये तो आक्षेपार्ह शब्द आढळून आला आहे. त्याचप्रमाणे भाषांतरातील तो आक्षेपार्ह शब्द बदलण्यात आल्याचंही यापूर्वी कोर्टाला सांगण्यात आलं आहे,’ असं वकील चंदर पाल यांनी कोर्टात स्पष्ट केलं.