Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूखचा मन्नत ते राजेश खन्नाचा आशीर्वाद-बॉलिवूड स्टार्सच्या घरांची कथा

शाहरूखचा मन्नत ते राजेश खन्नाचा आशीर्वाद-बॉलिवूड स्टार्सच्या घरांची कथा
, बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (17:54 IST)
बॉलिवूडचे सिनेस्टार जेवढे लोकप्रिय आहेत, तेवढेच त्यांचे बंगलेही. प्रत्येकाच्या बंगल्याची एक कथा आहे आणि म्हणूनच चाहत्यांना त्याबद्दल उत्सुकताही आहे.
शाहरूख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 'मन्नत' या बंगल्यावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावरही त्यांच्या वाढदिवसाला किंवा एरव्हीही अशीच गर्दी पाहायला मिळते.
 
स्टार्सच्या बंगल्यांबाबत अनेक प्रकारच्या चर्चा सर्रास होत असतात. अशीच एक चर्चा होती, एका कलाकाराच्या भूत बंगल्याची.
 
1950 मध्ये भारत भूषण यांनी कार्टर रोडवर नौशाद यांच्या शेजारी एक बंगला विकत घेतला त्याला 'भूत बंगला' असं म्हटलं जायचं.
 
ज्येष्ठ पत्रकार शांती स्वरूप सांगतात, " हा बंगला विकत घेताच भारत भूषण यांचं नशीब चमकलं. सुरुवातीला त्यांना यश मिळालं, पण नंतर आर्थिक अडचणींमुळं त्यांनी तो बंगला राजेंद्र कुमार यांना विकला."
 
हे घर विकत घेण्यासाठी राजेंद्र कुमार यांनी बीआर चोप्राचा 'कानून' आणि इतर चित्रपट साइन केल्याचं सांगितलं जातं.
 
या बंगल्यात आल्यानंतर राजेंद्र कुमार यांनाही खूप यश मिळालं. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि त्यानंतरच ते ‘ज्युबिली कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
पत्रकार शांती स्वरूप सांगतात की, नंतर राजेंद्र कुमार यांनी दुसरा बंगला बांधला आणि तिथं राहायला गेले.
 
1970 मध्ये त्यांनी राजेश खन्ना यांना बंगला विकला.
 
विशेष म्हणजे हा बंगला विकत घेण्यासाठी राजेश खन्ना यांनी 'हाथी मेरे साथी'च्या निर्मात्याकडून आगाऊ रक्कम घेतली होती. त्यांनी या बंगल्याला 'आशीर्वाद' असं नाव दिलं.
 
या बंगल्याच्या भिंतींवर 'हाथी मेरे साथी'चे चित्र शेवटच्या दिवसापर्यंत कायम होते. या बंगल्यात राहून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
 
राजेश खन्ना शेवटपर्यंत त्यात राहिले. राजेश खन्ना यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी यांनी ते अलकार्गोचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांना विकला.
 
शशी किरण शेट्टी यांनी 70 वर्षे जुना 'आशीर्वाद' बंगला पाडला.
 
सिनेस्टारच्या बंगल्यांचं पर्यटकांना आकर्षण
चित्रपट इतिहासकार एसएमएम औसाजा म्हणतात, “1940 नंतरचे हे बंगले त्या काळी पर्यटकांचं आकर्षण होते. अशोक कुमार, भारत भूषण, देवानंद, राज कपूर, किशोर कुमार, मनोज कुमार, दिलीप कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि सुनील दत्त यांचे भव्य बंगले पाहायला येणाऱ्यांची गर्दी असायची.”
 
लोकांना उत्सुकता असायची की जे सिनेस्टार पडद्यावर दिसतात त्यांचं घर कसं असतं ?
 
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीचीही झलक पाहण्याची पण ही एक संधी असायची.
 
चाहते बंगल्याबाहेर त्यांचे फोटो काढायचे आणि त्या आठवणी जपून ठेवायचे.
 
चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं औसाजा सांगतात.
 
शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला आजही अनेक अर्थांनी लँडमार्क बनला आहे.
 
बंगल्यासाठी चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली
चित्रपट इतिहासकार औसाजा सांगतात, “अमिताभ बच्चन यांना त्यांचा बंगला विकत घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आधी ते ‘मंगलम’ बिल्डिंगमध्ये राहत होते, मग त्यांनी 'प्रतीक्षा' बंगला बांधला आणि मग 'जलसा' आणि 'जनक' विकत घेतला."
 
सिनेस्टारसाठी घर बांधणं ही एक महत्त्वाची गोष्ट होती. खरेदी करण्यापूर्वी ते वास्तू नीट बघून घ्यायचे.
 
औसाजा सांगतात की, एखाद्या सुपरस्टारला एखादं घर आवडलं तर ते आपल्या मालकीचं करण्यासाठी प्रयत्न करायचे.
ते म्हणतात, “जावेद अख्तर यांनी मला एक घटना सांगितली होती की राजेश खन्ना यांना एक बंगला खूप आवडला होता आणि त्यासाठी त्यांनी ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाच्या निर्मात्याकडून पैसे घेतले होते. पण त्यांना सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नाही.”
 
“त्यांना वाटलं की हा चित्रपट आपटेल, म्हणून त्यांनी जावेद आणि सलीम यांना स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्याची विनंती केली. स्क्रिप्ट बदलण्यात आली. चित्रपटानं चांगली कमाई केली आणि ते सर्व पैसे त्यांच्या बंगल्यावर खर्च करण्यात आले.”
 
फिल्म स्टार्सच्या बंगल्यांची किंमत
प्रसिद्ध प्रॉपर्टी एक्सपर्ट पंकज कपूर सांगतात की, फिल्म स्टार्सचे अनेक बंगले 30 ते 40 वर्षांपूर्वी बांधले गेले आहेत.
 
आता मुंबईच्या मालमत्तेत बरेच बदल झाले आहेत. दक्षिण मुंबईत पूर्वी घरांची किमान किंमत 1 ते 2 कोटी रुपये असायची, पण आता ती 4 ते 5 कोटी रुपये झाली आहे.
 
ते सांगतात की, आता सर्व कलाकारांना बंगल्याच्या जमिनीचा पुरेपूर वापर करून त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं आहे.
 
आता बहुतेक स्टार फ्लॅट आणि निवासी अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित झाले आहेत.
पंकज कपूर यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेता दिलीप कुमार यांच्या बंगल्याजवळील मालमत्तेचा दर 80 हजार ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट इतका झाला आहे.
 
कपूर सांगतात की, हाऊस टॅक्स, मेंटेनन्स आणि इतर खर्च इतके वाढले आहेत की बंगला ठेवणं महाग झालं आहे.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, "दिलीप कुमार यांच्या बंगल्याच्या जागी एक टॉवर बांधला जात आहे आणि तिथं म्युझियम बनवण्याची चर्चा आहे. आता हे प्रत्यक्षात घडते की नाही हे पाहायचे आहे."
 
अपार्टमेंट संस्कृती वाढली
ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट समीक्षक डॉ. रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात की, सुनील दत्त यांचा बंगला पाडून त्यांचा मुलगा संजय दत्त यानं आता ‘इम्पीरियल हाइट्स’ नावाचा टॉवर बांधला आहे.
 
प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांचा स्टुडिओ आणि घर गोदरेज यांना विकण्यात आलंय.
राजेश खन्ना यांचा बंगला त्यांच्या मुलींनी उद्योगपती शशी किरण शेट्टी यांना विकला होता.
 
याशिवाय देवानंद यांचं कार्यालय दिलीप कुमार यांच्या बंगल्याजवळ पाली हिल इथे होतं. आता तिथे एक बहुमजली इमारत आहे.
 
ते म्हणतात, “आजच्या पिढीला बंगला संस्कृती आवडत नाही. त्यामुळे फिल्म स्टारचे बंगले हळूहळू मुंबईबाहेर जाऊ लागले आहेत.
 
शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची कथा
श्रीनिवासन सांगतात की, मुंबईबाहेरून आलेल्या कलाकारांना मोठ्या घरांचं आकर्षण आहे, जसं शाहरुख खानसारखा स्टार, जो मूळचा दिल्लीचा आहे.
 
जेव्हा त्याला 'मन्नत' विकत घ्यायचा होता तेव्हा त्यानं सर्वतोपरी प्रयत्न केले.
 
सुरुवातीला शाहरुख खान ‘मन्नत’ जवळ असलेल्या एका घरात राहायचा. तो रोज 'मन्नत' खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असे. पूर्वी ‘मन्नत’ हे शूटिंग लोकेशन होतं.
 
पण शाहरुखनं रतन जैन, यश चोप्रा आणि इतर अनेकांकडून आगाऊ पैसे घेतले, त्यांचे सर्व चित्रपट केले आणि नंतर हा बंगला विकत घेतला.
 
शाहरुख खानसाठी ‘मन्नत’ लकी ठरला आणि इथं राहत असताना तो त्याच्या करिअरच्या उंचीवर पोहोचला आणि सुपरस्टार बनला.
डॉ रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात की, अनेक सुपरस्टार बड्या बिल्डर्ससोबत बंगल्यांचे सौदे करतात आणि त्यांना तिथं काही फ्लॅट मिळतात.
 
संजय दत्त, रणबीर कपूर, रणधीर कपूर, मनोज कुमार, फिरोज खान आणि राकेश रोशन यांनीही असंच काहीसं केलं.
 
इथं त्यांना सुरक्षा आणि मेंटेनन्सची चिंता करण्याची गरज नाही. काळाच्या ओघात जीवनशैली बदलली आणि जगण्याची पद्धतही बदलली हे उघड आहे.
 






Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Divya Spandana: अभिनेत्री दिव्या स्पंदनाच्या निधनाची बातमी अफवा ठरली