Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उर्फी जावेद-चित्रा वाघ : नग्नता नेहमीच अश्लील असते का?

Urfi Javed-Chitra Wagh
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (21:48 IST)
इन्स्टाक्वीन रिअॅलिटी टीव्ही स्टार उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता ती चित्रा वाघ यांच्याबाद्दलच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे लिखित पत्राच्या माध्यमातून उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे.
 
'उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा', अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
 
मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असं वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपलं मत मांडलं होतं.
 
चित्रा वाघ यांचं पत्र
चित्रा वाघ यांनी लिहिलंय की, "केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल.
 
"या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे".
 
उर्फीचं प्रत्युत्तर
उर्फीनेही याप्रकरणी ट्विट करत म्हटलं की, "माझ्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी एका पोलिसांच्या तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही खरी कामं नाही आहेत का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील.
 
"माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या."
 
चित्रा वाघ सोडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, असंही उर्फीनं पुढे म्हटलंय.
 
उर्फीने काही तासांपूर्वी ट्वीट करत पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रा वाघ यांची चांगली मैत्रीण होण्याची मी वाट पाहते आहे. चित्राजी, संजय राठोड आठवतात ना? संजय राठोड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची आणि तुमची मैत्री झाली होती. तुम्ही त्यांचे सगळे अपराध पोटात घातले होते. संजय राठोड महाविकास आघाडीचा भाग असताना तुम्ही त्यांच्यावर हल्लाबोल केला होता".
 
मिलिंद सोमण आणि पूनम पांडे
प्रथितयश मॉडेल आणि फिटनेस फ्रिक असलेले मिलिंद सोमण यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करताना समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावतानाचा एक फोटो टाकला होता. नेटिझन्सनी फिटनेसवरून त्यांचं कौतुक केलं.
 
परंतु पूनम पांडे या अभिनेत्रीला गोव्यातील एका फोटोशूटसाठी तुरुंगाची हवा खायला लागली आहे. हे फोटोशूट अश्लील आहे आणि त्यातून लोकांच्या कामूक भावना चाळवू शकतात असं म्हणून तिच्यावर ही कारवाई झालीय.
लागोपाठ घडलेल्या या घटनांनी नग्नता आणि अश्लीलता यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नग्नता प्रत्येक वेळी अश्लीलताच असते का? दोन्हीत नेमका फरक काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय कायदा याबद्दल नेमकं काय सांगतो हे समजून घेऊया...
 
25 वर्षांपूर्वी मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांनी एका जाहिरातीसाठी केलेल्या फोटो शूटमुळे वादळ निर्माण झालं होतं. पण त्याच मिलिंद सोमण यांनी आता 55व्या वाढदिवसाला स्वतःचा सार्वजनिक ठिकाणी धावतानाचा नग्न फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
दुसरीकडे मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे यांनीही गोव्यात सार्वजनिक ठिकाणी एक फोटोशूट केलं, पण त्या मात्र अडचणीत आल्या. कामूक हालचाली केल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक करण्यात आली.
 
जामीन मिळाला असला तरी त्यांना एक दिवस मानसिक त्रासातून जावं लागलं. मग या दोन्हींमध्ये काय फरक आहे? जे जे नग्न, ते सारं अश्लील असतं का?
याविषयीचा भारतीय कायदा समजून घेण्यासाठी 1990 च्या दशकातलं एक उदाहरण पाहूया. जगप्रसिद्ध टेनिस स्टार बोरिस बेकरने आणि त्याची कृष्णवर्णीय गर्लफ्रेंड बार्बरा फेल्टस यांचा एक नग्न फोटो 1994 मध्ये स्पोर्ट्स वर्ल्ड या भारतीय क्रीडा मासिकाने मुखपृष्ठावर छापला.
 
वर्णद्वेषाविरोधातल्या कँपेनचा तो भाग होता. पण त्या चित्रावर भारतभर टीका झाली. आणि कोलकात्यातल्या एका वकिलांनी प्रकरण कोर्टात नेलं. सर्वोच्च न्यायालयापर्यंत 14 वर्षं हा खटला चालला.
 
अखेर 2013 मध्ये स्पोर्ट्स वर्ल्ड मासिकाने तो जिंकला. म्हणजे चित्र नग्न आहे पण अश्लील नाही असा निर्वाळा कोर्टाने दिला.
तो निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं,
 
एखादं चित्र किंवा लेख अश्लील आहे असं तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा त्यातून कामूक भावना चाळवण्याचा इरादा असेल. दुसऱ्याच्या सेक्स लाईफबद्दल अवाजवी माहिती घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न असेल किंवा अशा फोटो किंवी लेखातून वाचकांचं मन आणि बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते अश्लील मानलं जाईल.
 
म्हणजेच कृतीइतकंच त्या कृतीमागच्या हेतूलाही महत्त्व दिल्याचं दिसतं. भारतीय दंड संहिता कलम 292 आणि 293 अश्लीलतेबाबत आहेत. यात म्हटलं आहे की अशी कृती जाहीररीत्या करू नये. आणि तेव्हाच्या सामाजिक भावनांमध्ये बसत असेल तर नग्नतेला विरोध करण्याचं कारण नाही असा कायद्याचा सूर आहे.
 
अश्लीलता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य/कलेचं स्वातंत्र्य
नाटक, सिनेमा आणि जाहिरातींमधल्या अश्लीलतेवरून म्हणजे त्या अश्लील आहेत की नाही यावरून तर नेहमीच वाद उभा राहिला आहे. इथं वाद आहे अभिव्यक्ती किंवा कलेला अभिप्रेत स्वातंत्र्याचा.
 
कला क्षेत्रात सौंदर्य आणि अश्लीलता यांच्यातली धुसर रेष नेमकी कुठली आहे. मराठीत चिन्ह हे वार्षिक विशेषांक चालवणारे सतीश नाईक यांना बीबीसीने हा प्रश्न विचारला. त्यांचा नग्नता - मनातली आणि चित्रातली हा विशेषांक खूप गाजला होता.
 
सतीश नाईक यांनी आपलं मत परखडपणे मांडताना जुन्या काळातील शिल्प आणि मूर्तींची आठवण करून दिली.
 
''सौंदर्य आणि अश्लीलता यांची तुलना होऊ नये. जी कलाकृती पाहताना आपली मान खाली जाते, किंवा आपण संकोचतो अथवा आजूबाजूला चोरट्या नजरेनं पाहतो, तर ती कलाकृती अश्लील मानायला हवी.
 
नग्नतेचं चित्रण फार प्राचीन काळापासून आपल्याकडे सुरू आहे. नग्नता फार प्राचीन काळापासून शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये चित्रांकित किंवा शिल्पांकित झाली आहे.
 
शेकडो वर्षांपूर्वीची चित्र पाहताना आपल्या मनात त्या भावना येत नाहीत. कारण, त्यात सर्व प्रकारची अभिजातता असते. हे व्यक्ती सापेक्ष आहे. पण सौंदर्य आणि अश्लीलता यांची तुलना मात्र केली जाऊ नये.''
 
अश्लीलतेचे निकष स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे?
अश्लीलतेचे मापदंड पुरुष आणि स्त्रियांसाठी समाज वेगवेगळे लावतो का? म्हणजे पुरुषांची अश्लीलता हे त्यांचं पुरुषत्व आणि महिलांची चारचौघांमध्ये साधं बाळाला दूध पाजण्याची कृतीही समाजाच्या चौकटीत बसत नाही. इथे स्त्री-पुरुष भेदभाव आहे का?
महिलांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ वकील जाई वैद्य यांच्यामते हा भेदभाव आहे. आणि त्यासाठी समाजाच्या दृष्टिकोणाकडे त्या बोट दाखवतात.
 
''स्त्री काय किंवा पुरुष काय, नग्नता जर कुणाला आक्षेपार्ह वाटत असेल किंवा ती अश्लील वाटत असेल, तर ती स्त्री किंवा पुरुष दोघांमधली वाटायला पाहिजे. जर मानवी शरीरातील सौंदर्य बघण्याचा निकष असेल तर तो स्त्रीचं शरीर किंवा पुरुषाचं शरीरही बघण्याचा दृष्टिकोण निकोप असायला हवा. पण, एकाने केलं तर त्याचं कौतुक आणि एकानं केलं तर त्याच्यावर कारवाई होणं हा विरोधाभास म्हणायला हवा.''
 
प्रत्येक नग्नता ही अश्लीलता नसते पण, या दोघांमधली रेषाही बरीचशी धुसर असते. त्यामुळे कायद्यापेक्षा संवेदनशील राहून हा विषय हाताळणं जास्त महत्त्वाचं ठरतं कधी कधी.

Published By - Priya Dixit 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पर्यटकांसाठी आकर्षण आहे कुंभलगडची ग्रेट वॉल ऑफ इंडिया