जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज आपल्याबरोबर असतो. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता दिदी यांनी आज 90 वर्ष पूर्ण केले आहेत.
लता मंगेशकर हा एक चमत्कार आहे. त्यांना आवाजाची दैवी देण आहे. त्यांच्या मधुर आवाजातील अंगाई गीत ऐकून चिमुरडी झोपी जातात. तरूणांना त्यांच्या प्रीती गीतांची मोहिनी पडते. मध्यमवयीनांना त्यांचा काळ आठवतो आणि वृद्धांना त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती होतेय असे वाटते. लता नावाचा स्वर म्हणूनच अपार आणि अनंत आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हा स्वर कायम राहील असे वाटते. लता दिदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या काही वेगळ्या बाबी खास तुमच्यासाठी.
लता दिदीचे गाणे हे ईश्वराच्या पूजेसारखे मानतात. म्हणूनच गाण्याचे रेकॉर्डींगसुद्धा त्या अनवाणीच करतात. तेथे चप्पल घालून त्या अजिबात जात नाहीत.
त्यांच्या वडीलांनी भेट म्हणून दिलेला तंबोरा त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे.
दिदींना छायाचित्रणाचाही छंद आहे. परदेशात त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.
खेळांमध्ये त्यांना सर्वात जास्त क्रिकेटचा खेळ आवडतो. भारताचा एखाद्या बलाढ्य संघाशी क्रिकेट सामना असेल तर त्या दिवशी सर्व कामे सोडून त्या सामना पाहतात.
कागदावर काहीही लिहिण्यापूर्वी त्या 'श्रीकृष्ण' असे नाव लिहूनच लिहिण्यास सुरवात करतात.
'आएगा आनेवाला' या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी त्यांना बावीस वेळा रिटेक द्यावा लागला होता.
दिदींना जेवणात कोल्हापुरी मटण आणि मच्छी फ्राय खूप आवडते.
लिओ टॉलस्टॉय, खलिल जिब्रान या लेखकांचे साहित्य त्यांना खूप आवडते. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आणि गीतादेखील त्यांना आवडते.