Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डॉ. चंद्रहास शास्त्री विरचित श्रीरेणुकाशरणम् : एक रसाळ भक्ती काव्य

shri renuka sharanam book
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (11:54 IST)
सौ. आरती कौस्तुभ लवाटे,
संस्कृत अध्यापिका, पुणे 
संस्कृत साहित्य आणि एकूण भारतीय भाषा यांना स्तोत्ररचनांचा एक भव्य आणि प्रगल्भ असा इतिहास आहे. “स्तूयते अनेन इति स्तोत्रम् |” अशी स्तोत्र या शब्दाची व्युत्पत्ती करणे शक्य आहे.
या स्तोत्र वाङ्मयाचे मूळ वैदिक सूक्तांमध्ये आढळते. स्तोत्रे ही सहसा छंदबद्ध असतात. या स्तोत्रामध्ये कधी देवतेला उद्देशून द्वितीय पुरुषी संबोधनाने तिची स्तुती केली जाते. तर कधी तृतीय पुरुषी रूपांची योजना करून स्तुतीगान केले जाते.
त्वमेव माता च पिता त्वमेव......||
यात आपल्याला द्वितीय पुरुषी संबोधन दिसून येते. तर 
या कुन्देन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता......||
यात आपल्याला तृतीय पुरुषी संबोधन दिसून येते. 
 
संस्कृतातील रामायण, महाभारत, भागवत-स्कंद-मार्कंडेय इत्यादी पुराणे यांत अनेक स्तोत्रे आहेत. भक्ती हा स्तोत्रांचा स्थायी रस असतो. पुढील काळात भगवान आदि शंकराचार्यादी अनेक साधू संतांनी स्तोत्र रचना केल्याचे दिसून येते. 
 
स्तोत्रात एकूण किती श्लोक असावेत, याचे बंधन नसते. कधी कधी अष्टक म्हणजे आठ, चालीसा म्हणजे चाळीस असे श्लोक असतात. तर कधी याहून कमी वा अधिक श्लोक असू शकतात. काही स्तोत्रे ही आराध्य देवतेची क्षमापना करण्यासाठी असतात. तर काही स्तोत्रे ही आपली रक्षा व्हावी, म्हणून कवच या प्रकारातील असतात. एकाच स्तोत्रात वृत्त वैविध्य सुद्धा असू शकते. 
 
गेयता, गोडवा, प्रासादिक रचना ही स्तोत्राची आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील. संस्कृत स्तोत्र साहित्यात जशी भगवान आदि शंकराचार्यांची नितांत सुंदर आणि ऐकण्यास प्रमोदकर अशी स्तोत्रे आहेत, तशी शिवतांडव स्तोत्राप्रमाणे ओज गुणाने युक्त सुद्धा स्तोत्रे आहेत.
 
उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास इत्यादी अलंकारांनी युक्त अशा रचना सुद्धा स्तोत्रांत असतात. भक्ती हा स्तोत्रांचा अंगी म्हणजेच प्रधान रस असला तरी करुण, अद्भुत, वीर, शांत इत्यादी रसांचा सुद्धा स्तोत्रांमध्ये अंतर्भाव होऊ शकतो. 
स्तोत्र साहित्यात देवतांचे स्तवन केले जाते, तसे संत, गुरु यांचेही स्तवन समाविष्ट होते. ज्या विषयी भक्त आपला भाव अभिव्यक्त करतात, तो स्तोत्राचा विषय होऊ शकतो. 
 
संस्कृत प्रमाणेच मराठी, हिंदी भाषेतही अनेक स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मारुती स्तोत्र अनेकांच्या नित्यपाठाचा विषय आहे. तुलसीदासांची रचना असलेला हनुमान चालीसा हा ग्रंथ देखील अनेकांच्या नित्यपाठाचा विषय आहे.
 
अशा प्रकारे भारतीय साहित्यात स्तोत्र परंपरा ही प्राचीन आणि समृद्ध आहे. मात्र आधुनिक काळात संस्कृत स्तोत्र रचना हा प्रकार दुर्मिळ होत चालला आहे, असे म्हणणे शक्य आहे.
 
या पूर्वपीठिकेवर आदरणीय डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांची रचना असलेल्या ‘श्रीरेणुकाशरणम्’ या स्तोत्राचा विचार केला, तर असे दिसून येते की, यात वन्दन करणारे श्लोक आहेत. प्रार्थना करणारे श्लोक आहेत. महात्म्य कथन करणारे श्लोक आहेत. आत्मनिवेदन करणारे श्लोक आहेत. उपमा, अनुप्रास, यमक इत्यादी अलंकारांनी युक्त रचना आहेत. अनुष्टुप आणि भुजंगप्रयात इत्यादी वृत्तांनी युक्त रचना आहेत. संस्कृतातील शतक काव्यातही याचा समावेश होऊ शकतो. 
 
सुप्रसिद्ध निरूपणकार श्री. विवेकजी घळसासी यांचा नितांत सुंदर असा अभिप्रायरूपी आशीर्वाद या स्तोत्रग्रंथाला लाभला आहे. डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर यांच्या चित्तलतेवर सहजच उमललेल्या मातृस्तवनाच्या, १२१ श्लोक-पुष्पांची स्तोत्रमाला हाती आली आणि माझ्या मनाचा गाभारा श्रद्धगंधाने भरून गेला! प्रारंभी एक हे एकत्वच आहे. मध्ये संसारकारणाने द्वैत आहे. आणि परत अंती एक हे एकत्वच आहे. म्हणून १२१ श्लोक स्फूरले असावेत!
 
स्त्रीदर्शन होताच ज्याच्या वृत्तीत पुत्रभाव जागतो, तोच खरा पुरुष! तर मग साक्षात् जगज्जननीच्या स्मरणाने संपूर्ण शरणागत भाव निर्माण झाला नसता तरच नवल!! श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या वृत्तीसागरात हिंदोळलेल्या ‘सौंदर्यलहरीचे’ स्मरण व्हावे, असे हे ‘श्रीरेणुकाशरणम्’ स्तवन आहे.
 
माताच सर्वत्र, सर्वरूपात आहे. तिचे स्मरण, तिचे चिंतन, तिच्या पायीचे समर्पण हीच श्रेष्ठ साधना आहे. नामरूपाच्या भिन्नतेपल्याड दडलेले मातेचे सर्वव्यापकत्व समजणे, हाच साक्षात्कार! अशा अनुभूतीचा प्रसाद डॉ. चन्द्रहासशास्त्री यांनी सर्वांच्या हाती दिला आहे.
 
भय म्हणजेच भक्ती, अशा भ्रमात गुदमरलेल्या वर्तमानात, वेदोपनिषदांना अभिप्रेत, ‘‘यत्र कुत्रापि गच्छामि, न बिभेमि कदाचन।’’ असा विश्वास देत असलेल्या प्रस्तुत भक्तिरसायनाचे स्वागत असो!! 
 
अशा निर्व्याज सुंदर शब्दांत विवेकजींनी या स्तोत्रावरील आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. 
 
पुस्तकाची बाह्य मीमांसा करताना असे दिसून येते की, पुस्तकाचे मुखपृष्ठ सात्विक भाव संवर्धित करणारे असे आहे. जगदंबा श्रीरेणुकामातेचे चित्र आणि शास्त्रीजींचे जपमाळ हाती घेतलेले चित्र हे काव्यरचनेच्या वेळचे शास्त्रीजींचे भावविश्व प्रकट करणारे असे आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर आदरणीय विवेकजींचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद वाचला की, कधी एकदा आपण हे पुस्तक वाचू या, असे होते. शास्त्रीजींच्या कुटुंबातील तीन कन्या कु. मैत्रेयी, कु. माधवी आणि कु. भार्गवी यांना समर्पित अशा या पुस्तकाची आंतरिक मीमांसा करताना असे दिसून येते की, शास्त्रीजींच्या प्राक्कथनाने पुस्तकाचा प्रारंभ होतो. आत्यंतिक विनयभावसंपन्न असे हे प्राक्कथन आहे. यात “भविष्यातही संस्कृतशारदेच्या चरणी अनेक रचना समर्पित करण्याचे ध्येय आहे. संस्कृतात अर्वाचीन काळात कमी लेखन होते, असा प्रतिपक्ष जे मांडतात, त्यांना यथाशक्य पण कृतीत उत्तर देण्याचा प्रयत्न जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत करावयाचा आहे. आपल्या स्नेहपल्लव शुभेच्छा सदैव असाव्यात.” असा दुर्दम्य ध्येयवाद अभिव्यक्त करण्यात आला आहे. 
श्रीगणेशवंदनेने स्तोत्राचा प्रारंभ होतो. 
श्रीगणेशो वरं दाता विघ्नहर्ता स्वभावतः।
पार्वतीश्वरयोः पुत्रः पातु मां सर्वतोपरि।। १।।
वर देणाऱ्या, स्वभावाने विघ्न हरण करणाऱ्या, शिवपार्वतीपुत्र अशा श्रीगणेशाने माझे सर्वतोपरी रक्षण करावे.
अशा श्लोकाने या गणेशवंदनेचा श्रीगणेशा होतो. या नंतर 
भारती ज्ञानभाषाश्री भारतस्याभिगौरवः।
सरस्वतीप्रसादश्च विराजतां मुखे सदा।।९।।
कविप्रतिभा व ज्ञानभाषेची शोभा माझ्या मुखात नेहमी शोभून दिसावी. भारताचा गौरव असा संस्कृतशारदेचा प्रसाद माझ्या मुखात नेहमी शोभून दिसावा.
अशा शब्दांत संस्कृत शारदेची वंदना करण्यात आली आहे. पुढे श्रीदुर्गेचे ध्यान आहे. त्याची शब्दरचना भक्तीरसाने ओतप्रोत अशी आहे.
ध्वनिं संश्रुत्य धन्योऽहं किणकिणकिणाङ्किण।
कङ्कणानां जनन्यास्तेऽभयमुद्रा धृता यदा।।१५।।
माते, तू अभयमुद्रा धारण केलीस, तेव्हा किणकिणकिणांकिण असा तुझ्या कंकणांचा ध्वनी ऐकून मी धन्य झालो.
एखाद्या निरागस बालकाने लडिवाळपणे आपल्या मातेशी संवाद साधावा, इतकी सहजता या ध्यानात आहे.
या नंतर 
नमः शिवाय जप्त्वा त्वं सहजं प्राप्स्यसे सुखम्।
मा विस्मर महादेवं शैलजावल्लभं शिवम्।।२०।।
तू नमः शिवाय असा जप करून सहज सुख प्राप्त करशील. शैलजावल्लभ अशा शिवशंकरास तू विसरू नकोस.
या शब्दांत भगवान शंकरांना वंदन केले आहे. भगवतीची आराधना करताना भगवंताला विसरून कसे चालेल? अर्थातच चालणार नाही. भगवान शिवाची ही पंच श्लोकात्मक स्तुती सुद्धा शिशुभावाने ओतप्रोत अशी आहे. 
श्रीसजुयशवन्तौ तौ धन्यौ हि पितरौ यथा।
आचार्यौ परमौ वन्द्यौ शङ्करलक्ष्मणौ तथा।।२५।।
माता सजुबाई आणि पिता यशवंतशास्त्री जसे धन्य होत तसेच आचार्य शङ्करशास्त्री व आचार्य लक्ष्मणशास्त्री परम वंदनीय होत.
  अशा शब्दांत आपले पूर्वज म्हणजे श्रीगुरुंचे आई वडील आणि श्रीगुरुंचे गुरु यांचे शुभ उल्लेख करून श्रीगुरुवंदनाचा प्रारंभ होतो.
पुढे भगवान श्री परशुरामांना वंदन करण्यात आले आहे.
रेणुकागर्भसम्भूतं जमदग्निसुतं प्रियम्।
परशुधारिणं रामं नमामि भृगुनन्दनम्।।३४।।
रेणुकागर्भसंभूत, जमदग्निपुत्र, आनंदकारक, परशु धारण करणाऱ्या भृगुवंशीय रामास मी नमस्कार करतो.
अशा शब्दांत भगवान श्रीपरशुरामांचे वंदन करण्यात आले आहे. जगदंबा श्रीरेणुकामातेच्या पूजनात भगवान श्रीपरशुराम पूजन करण्याचे अत्यंत महत्व आहे आणि तशी परंपरा देखील आहे. या परम्परचे स्मरण या ठिकाणी वाचकांना होते.
पुढील श्लोक हे श्रीरेणुकेच्या भक्तिभावाने युक्त असे श्लोक आहेत. ह्या श्लोकांचे पठन करतांना नक्कीच आपण रोमांचित होतो. 
यदा यदाऽपदाऽगत्य पीडयति कदापि वा।
मातृकृपां हि संस्मृत्य हसाम्यहं तदा तदा।।४२।।
जेव्हा जेव्हा, केव्हाही संकट येवून मला त्रास देते, तेव्हा तेव्हा मातेच्या कृपेचे स्मरण करून मी हसतो.
या श्लोकातून जगदंबेवरील आपली अढळ अशी श्रद्धा कवीने अगदी सहज सोप्या शब्दांत व्यक्त केली आहे.
श्रीरेणुकामातेची मानसपूजा देखील या स्तोत्रात व्यक्त करण्यात आली आहे. त्यातील कल्पनासौंदर्य, उपमा इतक्या सुंदर आहेत, की त्यातून या काव्याची प्रासादिकता पाझरते, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
शिवे रेणुके रेणुकन्ये नमस्ते
नमस्ते सुधीरे सुरैर्वन्दितेऽम्बे।
सदा मे समीपे वसन्ती हसन्ती
नमस्तेऽस्तु दुर्गे सुरैः पूजिताद्ये।। १०२।। 
हे शिवे, रेणुके, रेणुकन्ये, सुधीरे, सुरवंदिते, माते, तुला नमस्कार असो. तुला नमस्कार असो. हे सुरांद्वारे आद्यपूजित दुर्गे, तू सदैव माझ्या जवळ राहतेस, स्मित हास्य करतेस.
अशा प्रगल्भ आणि विनित शब्दांमध्ये भुजंगप्रयात छंदात अंबिकेला नमन करण्यात आले आहे.
यत्र कुत्रापि गच्छामि न बिभेमि कदाचन।
स्मरामि केवलं नित्यं रेणुका शरणं मम।।१११।।
जेथे कोठे मी जातो, मी कधीही भीत नाही. केवळ इतकेच नित्य स्मरण करतो की, माझे शरण्यस्थान रेणुका आहे.
अशा शब्दात कवीने भगवती जगदंबेच्या चरणी आपला आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
आणि 
नेच्छा मम विरामस्य तथापि विरमाम्यहम्।
सलीलपूर्णनेत्राभ्यामम्बे नतोऽस्मि रेणुके।।१२१।।
हे माते, रेणुके, माझी विरामाची इच्छा नाही. तरीही अश्रूपूर्ण नेत्रांनी तुला नमस्कार करून थांबतो.
या उत्कट शब्दांत या शरणकाव्याची समाप्ती होते. 
या नंतर श्रीदेवीच्या ५१ पीठांचे स्मरण म्हणून ५१ श्लोकीय “जगदम्ब नमस्तुभ्यम्” हे स्तोत्र पुस्तकात देण्यात आले आहे. या स्तोत्राची रचना देखील डॉ. चंद्रहास शास्त्रींची आहे. आणि विशेष म्हणजे या स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाचा प्रारंभ हा “जगदम्ब नमस्तुभ्यम्” या चरणाने होतो. हे ५१ श्लोकीय स्तोत्र शास्त्रीजींना एकाच बैठकीत स्फुरले आहे.
या नंतर “भगवती भक्ती तरंग” ह्या शीर्षकाखाली भगवती जगदंबेच्या भक्तीने ओतप्रोत अशा शास्त्रीजींच्या मराठी रचना देण्यात आल्या आहेत. संस्कृत प्रमाणेच मराठी रचना सुद्धा उत्कट आहेत. निर्व्याज मनोहर आहेत. सहजता, प्रासादिकता, सोप्या सहज शब्दांत गहन अर्थाची अभिव्यक्ती ही रचना वैशिष्ट्ये येथेही दिसून येतात. यांची संख्या देखील ५१ इतकी आहे.  
या नंतर सौ. मानसी चंद्रहासशास्त्री सोनपेठकर लिखित वै. श्रीगुरू भगवानशास्त्री महाराजांचा परिचयपर लेख तसेच श्री. विराज आडे यांचा ऐसियांचा संग देई नारायणा हा शास्त्रीजींच्या परिचयपर लेख देण्यात आला आहे. या दोन्ही लेखांमुळे शास्त्रीजींची जगदंबा श्रीरेणुकामातेच्या भक्तीची थोर परंपरा ध्यानी येते. 
एकूणच पुस्तकाचा प्रारंभ आणि समाप्ती दोन्हीही उत्कट अशा भक्तीरसाने ओतप्रोत आहेत. किंबहुना या पुस्तकातील अक्षर नि अक्षर हे भक्तीरसायनाच्या शाईनेच लिहिलेले आहे, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ।।
काय म्यां पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभर बोलविले ।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायाविण ।।
अशी भावना कवींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. ती सार्थ आहे, अशी खात्री पुस्तक वाचल्यानंतर होते. 
या रसाळ भक्तीप्रधान काव्यग्रंथाच्या यशासाठी मंगल कामना व्यक्त करू या! 
।। श्रीरेणुकाशरणम् ।। (संस्कृत श्लोक व मराठी अर्थासह)
रचना: ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर 
शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद 
एकूण पाने ९३ 
किंमत १६५ रु. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोथिंबीर निवडण्याची सोपी पद्धत, व्हिडिओ व्हायल