कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाऊन संपल्यावर नियोजन करण्यासाठी नुकतीच रेल्वे प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत माहिती देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, या कॉन्फरन्समध्ये सीआरबीने असे संकेत दिले आहेत की सरकार कोरोनाच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन करण्याचा विचार करीत आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कोणतीही परिवहन सेवा सुरू केली जाणार नाही. पिवळा झोन असलेल्या भागांमध्ये सेवा प्रतिबंधित असतील आणि ग्रीन भागांमध्ये सेवांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांमध्ये सामाजिक अंतर राखले पाहिजे. ३ टायर स्लीपर आणि एसी ३ टायरमध्ये मधल्या बर्थचे वाटप केले जाणार नाही. कोरोनाची लक्षणे कमी होईपर्यंत ट्रेनमध्ये किचन किंवा जेवण सेवा दिली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. सर्व नियोजित वेळापत्रक रद्द करण्यात येणार असून केवळ विशेष गाड्या चालवल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे.
सर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग केली जाईल. यात महत्त्वाचे म्हणजे ६० वर्षांवरील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी इतक्यात दिली जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मास्क परिधान करणे अनिवार्य केले जाणार असून प्रवाशांना मास्क न घालण्यास दंड आकारण्यात येणार आहे. तसेच विनामास्क प्रवाशांना ताब्यात घेतले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अनारक्षित प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही.
कोलकाता वगळता बहुतेक मेट्रो शहरे सध्याच्या ट्रेंड नुसार रेड झोनमध्ये येतील. त्यामुळे मुंबई, दिल्ली, सिकंदराबाद येथून जाण्यासाठी कोणतीही ट्रेन सुरू करणे किंवा थांबविणे शक्य होणार नाही. चेन्नई, बंगळुरूमध्ये परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणतीही कोचिंग सेवा न वापरणे चांगलेच होईल. दरम्यान, ३० एप्रिलपूर्वी निश्चितपणे सेवा सुरू होईल, अशी चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आली.