डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाली आहे. या दोघांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचा स्वॅब निगेटिव्ह आल्याचं समजतय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल कान्या आणि उमेश जाधव या दोघांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी विठ्ठल कान्याला ८ जुलै रोजी तर उमेश जाधवला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. माटुंगा पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची लागण झाली होती. मात्र तात्काळ उपचार घेतल्यानंतर त्यांची करोनातून मुक्तता झाली होती. या दोन्ही आरोपींना करोनाची लागण झाली असावी असा आमचा अंदाज होता. त्यामुळे चौकशी करणाऱ्या पथकाला आम्ही चौकशी करताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या दोघांच्या अटकेनंतर त्यांचे स्वॅब तात्काळ तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्ही त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठवलं आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणाची तपास करणाऱ्या पोलीस पथकाचीही कोविड टेस्ट करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, ८ जुलै रोजी या दोन्ही आरोपींनी आंबेडकरांच्या दादर येथील घराची तोडफोड केली होती.