Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

माकडाच्या हाती शॅम्पेन

माकडाच्या हाती शॅम्पेन
, बुधवार, 25 मार्च 2020 (11:17 IST)
कोरोना व्हायरसने जगभरात उद्रेक माजवला आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असतानाही देश नरेंद्र मोदींसारख्या नेत्याच्या हातात असल्यामुळे कोरोनाने भारतात अजून हाहाकार माजवलेला नाही. इटली हा आपल्यापेक्षा प्रगत देश असूनही आणि त्यांची वैद्यकीय सुविधा आद्ययावत असूनही तिथे कोरोनाग्रस्त आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या भयंकर आहे. आपण जर खबरदारी घेतली नाही तर येणारा काळ भयंकर असणार आहे. 
 
भारतात महाराष्ट्र राज्यात कोरोनाची जास्त भीती आहे. तरी राज्यात उद्धवजी आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्या नेतृत्वाखाली सगळेच उत्तम काम करत आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर शक्यतो घरात राहणे गरजेचे आहे... म्हणून नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. पण नरेंद्र मोदींचे विरोधक इतक्या खालच्या थराला गेले आहेत की राजकीय मुद्दे कधी उपस्थित करायचे याचे भान त्यांना राहिलेले नाही. 
 
2002 ते 2020 असा या लबाड लोकांचा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ 18 वर्षे हे नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करतायत. मोदी गुजरातचे सीएम होते, आता देशाचे पीएम झालेत. या टीकाकारांची खरी वेदना ही आहे की आम्ही मोदींना राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला, खुनी, हत्यारा सगळं सगळं म्हटल आम्ही, तरी लोक ह्यांना निवडून कसे देतात? 2014 ला गुजरात दंगलीच्या आरोपीला निवडून देऊ नका असा प्रचार केला असतानाही लोक निवडून देतातच कसे? ही त्यांची खरी समस्या आहे. मग नोटबंदी ही देशासाठी किती घातक होती, सीएए, एनआरसी, ट्रिपल तलाक, असे एकामागोमाग एक निर्णय मोदींनी घेतले, या लोकांनी हे निर्णय घातक होते अस सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक मोदींच्याच मागे का जातात? 
 
पण आपल्याला मोदी कळला नाही, आपल्याला भारत कळला नाही आणि आपल्याला भारतीय जनता सुद्धा कळलेली नाही व इथली समस्या सुदधा कळलेली नाही, हे मान्य ते करायला तयार नाहीत. हा हुच्च शिक्षितांचा अडाणीपणा यांना लपवायचा होता म्हणून यांनी एक नवीन शब्द शोधून काढला, भक्त... 
 
या महामुर्ख लोकांनी मोदींच्या मतदाराला भक्त म्हणायला सुरुवात केली आणि एकदा फॉर अ चेंज म्हणून वोट केलेला मतदार हा मोदींचा कायमस्वरूपी मतदार झाला. मोदींनी जनता कर्फ्यु घोषित केल्यावर त्यांना खुल्या दिलाने साथ द्यायची किंवा प्रसंगावधान ओळखून गप्प बसावं. पण नाही... यांनी इथेही माती खाल्ली. मोदी कोरोनाचा इव्हेंट करतायत असा आरोप केला गेला. पण झालं काय? अपवाद सोडला तर सर्व भारतीयांनी या जनता कर्फ्युला भरभरून पाठींबा दिला, 5 वाजता शंखनाद, थाळ्या आणि टाळ्या वाजवून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. 
 
एक माणूस कोणतीही जबरदस्ती न करता, केवळ हात जोडून आवाहन करतो आणि देशातील बहुसंख्य लोक ते ऐकतात हे या नतद्रष्ट्याना कसं सहन होईल? म्हणून यांनी नकारात्मक व्हिडीओ पसरावयला सुरुवात केली. काही अति उत्साही लोक अभिवादन करण्याच्या नादात गरबा खेळले, सामूहिक आरती केली... या त्यांच्या गोष्टी चुकीच्याच होत्या, भारतीय लोकांना प्रबोधनाची खूप गरज आहे. अहो, आपण रांगेत उभे राहू शकत नाही आणि सिग्नल पाळत नाही तर असला मुर्खपणा करणे स्वाभाविकच आहे. पण ही संधी मोदी द्वेष्ट्याना मिळाली आणि सोशल मीडियावर पोस्टी सुरू झाल्या की बघा लोकांनी इव्हेंट केला. पण यात मोदींचा काय दोष? तरी मोदींवर टीका करण्याची आपली तृष्णा ह्यांना शांत करायचीच होती.  
 
माझ्या एका फेसबुकीय मित्राने आपला उद्दामपणा दाखवण्यासाठी हद्दच केली. त्याने खेळण्यातला माकड टाळ वाजवतो असा व्हिडीओ पोस्ट केला म्हणजे मोदींच्या सांगण्यावरून टाळ बडवणारे माकडं आहेत. 
मला या गोष्टीच फार दुःख वाटलं... एक कलाकार इतक्या उलट्या काळजाचा कसा असू शकतो? पण नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या भक्तांवर टीका करण्याची एकही संधी आम्हाला सोडायची नसते. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरला जाऊ... बरं वर आमचा नालायकपणा लपवण्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांसरख्या महामानवाचे दाखले देऊ, वर समोरच्याला अंडभक्त म्हणून हिणवू... आणि हे संविधनवादी... वाह...
 
मुळात बहुसंख्य लोकांच्या भावनांचा आदर ज्याला करता येत नाही तो सांविधानवादी काय तर माणूस म्हणवण्याच्याही लायकीचा नसतो.
 
मी स्वतः भावनिक नाही, मला भावना नाही असं नव्हे पण माझा स्वभाव भावनिक नाही. त्यात घडायच्या काळात तात्यारावांचा प्रभाव पडला. तरी मानवी भावना खूप महत्वाच्या असतात अस मला वाटतं. जग आणि देश कोरोनाच्या उद्रेकात चोपून निघत असताना नरेंद्र मोदींनी केलेलं भावनिक आवाहन अत्यंत म्हत्वाचंच होतं. एक दिवस पूर्णपणे घरात राहून आपण कोरोना ज्या झपाट्याने पसरतोय त्याला आळा घातला. यापुढचे दिवसही आपल्याला शक्यतो घरातच राहायचं आहे. थाळ्या, टाळ्या वाजवून आपण सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मोदींनी कृतज्ञतेचा इव्हेंट केला. इव्हेंट केला यात चूक काय? आजच्या युगातल्या लोकांना जी भाषा कळते त्या भाषेत मोदी सवांद साधतात. लोकांना ते पटतं आणि लोक त्यांचं ऐकतात. 
 
इव्हेंट करायची मूळ प्रेरणा लोकमान्य टिळकांची आहे. त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा इव्हेंट केला. लोकांना हीच भाषा कळते. त्यातून क्रांतिकार्य उभं राहिलं... 
 
पण या जळणाऱ्या लोकांच्या मात्र अशा घटनेने पोटात दुखायला लागत आणि स्वतःला मानवतेचे कैवारी स्वतःच म्हणवून घेणारे हे अभद्र लोक राक्षसी वृत्ती दाखवतात आणि ही राक्षसी वृत्ती लपवण्यासाठी हे लोक आंबेडकर, शाहू, फुले अशी नावे घ्यायला लागतात. या महापुरुषांच्या आड लपून हे नीच कृत्ये करीत सुटतात. पण जनतेला यांचा हलकटपणा आता कळून चुकलेला आहे. लोकांनी दुसऱ्यांदा मोदींना बहुसंख्येने निवडून दिलेलं आहे. आता कोरोनाच्या उद्रेकात सगळा  भारत मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना हे लोक टीका करून मोदींच्या मतदारांची (ह्या दळभद्री लोकांच्या भाषेत भक्त वा अंडभक्त) संख्या वाढवत आहेत. या लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवणारे लोक माकडं वाटतात. पण मुळातच माकडं हेच लोक आहेत... 
 
सावरकरांनी काशीच्या ब्राह्मणांना उल्लेखून माकड महासंमेलन आणि भाकड महासंमेलन असा लेख लिहिला होता, त्या लेखाची आठवण मला झाली... माकडाचा माणूस झाला अस आपण ढोबळ मनाने म्हणतो. पण काही लोकांची बुद्धी अजूनही माकडासारखीच आहे. देश एकजूट होत असताना ह्यांना माकडचाळे सुचतात आणि ही माकडे देशाच्या बाजूने उभे राहणाऱ्यानाच माकडे म्हणतात... माकडाच्या हातात कोलीत मिळालं की ते सगळीकडे आग लावत फिरतय... आधुनिक भाषेत म्हणायचं झालं तर माकडाच्या हातात शॅम्पेन दिलं की ते फवारेच मारत राहतय... शेवटी माकडच ती...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Redmi Smart TV Max लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत