देशात सध्या सरासरी २ टक्के पॉझिटिव्हीटी दराने कोरोनाबाधित आढळत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात १०.०२ टक्के पॉझिटिव्हीटीदराने कोरोना रुग्ण आढळले. भारतातील ६ राज्य, केंद्रशासित प्रदेशांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळ ४.५७ टक्के, गोवा ३.९० टक्के, चंदीगढ ३.१६ टक्के, पंजाब २.३७ टक्के तसेच गुजरातचा पॉझिटिव्हीटीदर २.०४ टक्के नोंदवण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानूसार गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ३९७ कोरोना रुग्णांची भर पडली. तर, केरळ १,९३८, पंजाब ६३३, तामिळनाडू ४७४ तसेच कर्नाटकमध्ये ३४९ कोरोनाबाधित आढळले. दरम्यान महाराष्ट्रात ३०, पंजाब १८, केरळ १३, छत्तीसगढ ७ तसेच तामिळनाडू, कर्नाटकमध्ये प्रत्येकी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २१ कोटी ७६ लाख १८ हजार ५७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ७ लाख ५९ हजार २८३ तपासण्या या सोमवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.