Coronavirus India Latest Update : देशात कोरोना व्हायरसचे गेल्या चोवीस तासात जी आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे टेन्शन वाढू शकतं. चोवीस तासात 501 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासात कोरोनाचे 12 हजार रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संख्येमुळे देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 3 कोटी 44 लाख 14 हजार 186 इतकी झाली आहे. सक्रिय रूग्ण 1 लाख 37 हजार 416 आहेत. गेल्या 267 दिवसांमधली ही सर्वात कमी संख्या आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात 501 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 62 हजार 690 इतकी झाली आहे. आज सलग 35 व्या दिवशी कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण रोजच्या रूग्णांपेक्षा 20 हजारांनी कमी झाले आहेत. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. या काळात रोज चार लाखांहून जास्त नवे रूग्ण समोर येत होते. तसंच लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी आणि इलाज मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.
महाराष्ट्रात चोवीस तासात 997 केसेस समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 66 लाख 21 हजार 420 झाली आहे. तर देशभरात जे चार लाखांहून अधिक मृत्यू झाले त्यातले 1 लाख 40 हजार 475 कोरोना मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत.
तसंच गुजरातमध्येही कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं दिसून येतं आहे. दिवाळीत लोकांनी गर्दी केली होती. कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळलेले नाहीत त्याचा फटका गुजरातला बसण्यास सुरूवात झाली आहे. एका दिवसात गुजरातमध्ये 42 नवे रूग्ण आढळले आहेत. हे प्रमाण वाढलेलंच आहे. कारण गेले अनेक दिवस गुजरातमध्ये आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 10 किंवा त्यापेक्षाही कमी होती.