जगातील मोठमोठे देश भारताला पाहून अवाक झाले असून संकल्पाचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते ई-ग्राम स्वराज पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. तसंच स्वामित्व योजनेचा शुभारंभही करण्यात आला. कोरोनामुळे आपल्याला व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधावा लागत आहे असल्याचं यावेळी नरेंद्र मोदींनी सरपंचांना सांगितलं.
गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्याच्या संकल्पाचे फलित म्हणजे पंचायत राज असल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. “करोनाच्या अनुभवाने सर्वात मोठा धडा शिकवला आहे तो म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. त्याशिवाय अशी संकटं झेलता येणार नाहीत. प्रत्येक गावाने स्वावलंबी होणं गरजेचं आहे. त्यामुळे करोनासारख्या काळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. पंचायत राज जितकं मजबूत असेल, तितकी लोकशाही मजबूत होईल आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.