कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सतकर्ता म्हणून केंद्र सरकारने विमान प्रवासासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातून आलेल्या लोकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारची नियमावली ही केंद्राच्या नियमांना धरून नाही अशी ओरड केंद्राने केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणेच राज्यातील सूचना असाव्यात असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटले आहे.
दरम्यान गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारण्याच आलं. ते म्हणाले, "काल केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलील तफावत होती. परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केलाय. यात काही दुमत नाही."
देश म्हणून एक नियम असायला हवेत यासाठी नियम असायला हवेत असं ते पुढे म्हणाले.
पण राज्य सरकारच्या नियमात देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केलाय.
त्यावर ते म्हणाले, " इतर राज्यांतून येणार्या्ना 48 तासांचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागतो. आपण इतर राज्यात जातो तेव्हा RTPCR रिपोर्ट लागतोच. तर आपल्या राज्यात येण्यासाठी लागेल."
याचा अर्थ राज्य सरकारने या नियमात बदल न करण्याचे संकेत दिलेत.
दुसरीकडे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी, बदललेला आदेश काढला तर माहिती देऊ अशी प्रतिक्रिया दिलीये.
याचा अर्थ सरकारने अजूनही जूना आदेश बदललेला नाहीये. सरकारच्या या आदेशावरून लोकांमध्ये नाराजी आहे.
केंद्र आणि राज्य आमनेसामने
बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक असेल, चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागेल, असं राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमवलीत म्हटलं आहे. तर केंद्राने 14 दिवसांचे क्वारंटाईन सांगितले आहे.
भारतात यायचं तर होम क्वारंटाईन करावे असे केंद्राने सूचवले आहे पण महाराष्ट्रात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे याबाबतही केंद्राने आक्षेप नोंदवला आहे.
ओमिक्रोनचे रुग्ण आतापर्यंत आढळले नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना एअरपोर्टवर आल्यानंतर RTPCR टेस्ट बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार महाराष्ट्र सरकारनेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियम जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र सरकारचे नियम काय आहेत?
पोलीस परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक फॉर्म तयार करतील. गेल्या 15 दिवसात ते कुठे गेले होते याची माहिती द्यावी लागेल. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी ही माहिती तपासावी
ज्या देशात ओमिक्रोनचे रुग्ण आढळून आलेत, अशा देशातून येणाऱ्या प्रवाशांना लवकर विमानातून बाहेर काढावं.
त्यांच्या तपासणीसाठी वेगळे काउंटर असावेत. या प्रवाशांना 7 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करावं लागेल.
दुसऱ्या, तिसऱ्या, सातव्या दिवशी RTPCR चाचणी बंधनकारक.
चाचणी निगेटिव्ह आल्यास 7 दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागेल.
ओमिक्रोनचे रुग्ण आतापर्यंत आढळले नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना एअरपोर्टवर आल्यानंतर RTPCR टेस्ट बंधनकारक. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाइन व्हावं लागेल.
कनेक्टिंग विमान असल्यास महाराष्ट्रात RTPCR महत्त्वाची.
केंद्र सरकारने दिलेली नियमावली
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ही नियमावली लागू होणार आहे.
1. सर्व प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टलवर (https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration) एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमच्या प्रवासासंबंधीची सर्व माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये तुमच्या नियोजित प्रवासाच्या आधी 14 दिवस जर प्रवास केला असेल, तर त्यासंबंधी सांगणं आवश्यक आहे.
2. प्रवासाच्या 72 तास आधी कोव्हिडची आरटीपीसीआर चाचणी करून त्याच्या निगेटिव्ह रिपोर्ट अपलोड करणं बंधनकारक आहे.
3. ज्या प्रवाशांनी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला असेल आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड केला असेल त्यांनाच बोर्डिंगची परवानगी दिली जाईल.
4. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या (At risk) देशांतून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर उतरल्यावर कोरोना चाचणी केली जाईल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना क्वारंटाइन केलं जाईल आणि पॉझिटिव्ह आल्यास नियमांनुसार पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती एअरलाइन्सनं द्यायला हवी.
5. सर्व प्रवाशांनी मोबाईलवर आरोग्य सेतू अप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे.
6. डि-बोर्डिंगची सर्व प्रक्रिया हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पार पाडली जाईल.
7. सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी एअरपोर्टवरील आरोग्य अधिकारी पार करतील. ऑनलाइन भरलेला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आरोग्य अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल.
8. स्क्रीनिंगदरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोव्हिडची लक्षणं आढळून आल्यास त्याला तात्काळ आयसोलेट केलं जाईल. जर संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली, तर त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जाईल.
कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या (At risk) देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी काय आहेत नियम?
1. विमानतळावर आल्यानंतर त्यांना कोव्हिड-19 चाचणीसाठी सँपलं द्यावं लागेल. चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांनी थांबणं बंधनकारक आहे.
2. जर चाचणी निगेटिव्ह आली तर 7 दिवसांसाठी होम क्वारंटाइन व्हावं लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी होईल आणि ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित व्यक्तीने पुढचे सात दिवस स्वतःचं सेल्फ-मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे.
3. समजा एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्या प्रवाशाचं सँपल INSACOG लॅबोरेटरी नेटवर्क इथं जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलं जाईल.
4. त्या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेतली जाईल आणि त्यांना संबंधित राज्य सरकारकडून होम किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं जाईल.