जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचला आहे. दरम्यान दिल्लीमध्ये काल आढळलेले 6 कोरोनासदृध्य रूग्णाची वैद्यकीय तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र सध्या देशभरात वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोना सदृश्य रूग्ण असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसची लागण असलेला एकही रूग्ण नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान याबाबत कोणतेही अफवा, खोटे वृत्त पसरवू नये असे आवाहन देखील राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यामध्ये 10 अधिक बेड्स आणि आयसोलेशन वॉर्ड्स उभारण्यात आले असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान अजूनही अॅन्टी व्हायरल ड्रग उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान काल (3 मार्च) ट्विटच्या माहितीनुसार मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधून 65,621 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून 401 प्रवासी आले. कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आलेल्या 152 प्रवाशांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार यापैकी, 149 जणांची तपासणीचा निकाल नकारात्मक आला होता. त्यानंतर 3 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा होती. मात्र आता आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अद्याप कोणताही कोरोना व्हायरसची लागण झालेला रूग्ण नाही.