"26 डिसेंबरला वॉर्डमध्ये फक्त सात रुग्ण उपचार घेत होते. आज 817 रुग्ण दाखल आहेत."
मुंबई महापालिकेच्या नेस्को जंबो कोव्हिड रुग्णालयाच्या डीन डॉ. निलम अंद्राडे बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या. त्यांच्या आवाजातून मुंबईतील कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव होत होती.
दुपारचा 1 वाजला असेल. कोव्हिड उपाययोजनांबाबतची अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच संपली होती.
डॉ. निलम पुढे म्हणाल्या, "26 डिसेंबरपासून रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. 10 दिवसांपूर्वी ICU मध्ये चार-पाच रुग्ण होते. आज 52 रुग्ण ICU मध्ये उपचार घेत आहेत."
बीबीसी मराठीशी बोलण्याआधी डॉ. अंद्रादे यांनी जंबो कोव्हिड रुग्णालयाच्या कंट्रोल रूममध्ये वरिष्ठ डॅाक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना दिल्या.
नेस्को जंबो कोव्हिड रुग्णालयात A, B आणि C असे तीन ब्लॉक आहेत. यापैकी ब्लॉक-A मध्ये या फिल्ड हॅास्पिटलची कंट्रोल रूम आहे.
या कंट्रोल रूममध्ये साधारणः 50 लोक उपस्थित असतील.
"सद्यस्थितीत कोव्हिड सेंटरमध्ये वॉर्ड आणि ICU मिळून 869 रुग्ण उपचार घेत आहेत. अजूनही 50 रुग्ण वेटिंगवर आहेत," डॉ. अंद्रादे पुढे माहिती देत होत्या.
जंबो कोव्हिड सेंटरच्या कंट्रोल रूममध्ये आत शिरतानाच एक पांढरा बोर्ड लावण्यात आलाय.
यावर रुग्णालयात किती रुग्ण दाखल झाले, किती लोकांना डिस्चार्ज मिळाला, ICU आणि वॉर्डमधील रुग्णसंख्या याची माहिती सतत अपडेट केली जाते.
मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना आकडेवारीचा स्फोट झालाय. गुरुवारी मुंबईत 20 हजारापेक्षा जास्त कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
रुग्णसंख्या वाढण्याचं कारण काय? लोकांचा आजार गंभीर होतोय का? रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची लक्षणं काय आहेत? आम्ही डॉ. निलम अंद्रादे यांना विचारलं.
"उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत," त्या सांगतात. काहींना थोडा ताप, कफ, खोकला आणि अंगदुखीची तक्रार आहे.
मुंबईत कोरोना संसर्गाची तिसरी लाट झपाट्याने पसरतेय. त्यामुळे नेस्को कोव्हिड सेंटरमध्ये कामाचा पसारा आणि वेग प्रचंड वाढलाय.
डेल्टा संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नेस्को जंबो कोव्हिड रूग्णालयात दाखल अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली होती.
ओमिक्रॉनच्या लाटेत काय परिस्थिती आहे? डॉ. अंद्रादे पुढे सांगतात, "वॉर्डमध्ये दाखल एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाहीये." हे तिसऱ्या लाटेतील सर्वात चांगलं लक्षणं आहे.
डॉ. निलम यांच्याशी चर्चा करत असताना बाजूला काही डेस्कवर मुलं-मुली काम करत होते. हा कोव्हिड रुग्णालयाचा स्टाफ आहे.
यातील काही डॉक्टर आहेत, ज्यांच्यावर प्रशासकीय कामांची जबाबदारी आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अंद्रादे यांनी ICU त दाखल होणाऱ्या रुग्णांबाबत काळजी व्यक्त केली. त्यांच्या आवाजात परिस्थितीचं गांभीर्य समजत होतं.
त्या म्हणाल्या, "गेल्या दोन दिवसांपासून ICU त दाखल होणाऱ्यांची संख्या वाढतेय. काल 14 तर आज 11 रुग्ण दाखल झालेत. सुरुवातीला फक्त 5-6 रुग्ण होते. आता ही संख्या वाढलीये. ही गंभीर परिस्थिती आहे."
कंट्रोल सेंटरच्या या हॉलमध्ये मध्यभागी टेबल ठेवण्यात आली आहेत.
या डेस्कवर कोणी रुग्णांची डेटा एन्ट्री करत होतं. तर कोणी सतत येणारे मेल चेक करत होते.
ICU मध्ये दाखल होणारे रुग्ण गंभीर आहेत का? त्या पुढे म्हणाल्या, "ICU मध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा होत होता. काहींच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण 68-70 पर्यंत खाली आलं होतं."
ICU मध्ये दाखल रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांनी कोव्हिडविरोधी लस घेतलेली नाहीये, अशी माहिती आम्हाला देण्यात आली. ही धक्कादायक गोष्ट होती.
"सहव्याधी असलेले पण लस न घेतलेले रुग्ण ICU मध्ये दाखल होत आहेत," डॉ. अंद्रादे सांगतात. या आकड्यांवरून लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित होतं.
डेस्कच्या मध्यभागी असलेल्या टीव्हीवर रुग्णालयातील विविध भागांचं सीसीटीव्ही फुटेज दिसत होतं. स्टाफ यावर लक्ष ठेऊन होता.
10 दिवसांपूर्वी रिकामा असलेला हा वॉर्ड आता भरलेला दिसत होता.
मुंबईत ओमिक्रॉन झपाट्याने पसरत असला तरी, डेल्टा आणि डेल्टाचे उपप्रकारही आढळून येत आहेत. नेस्को सेंटरमध्ये काही ओमिक्रॅानबाधित रुग्ण नक्कीच उपचार घेत असतील.
"डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनबाधित रूग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याचं दिसून आलं नाहीये," अशी माहिती डॉ. निलम देतात.
रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे जिनोम सिक्वेसिंग तेल्यानंतर कळतं. मुंबईत जिनोम रिपोर्टमध्ये 55 टक्के ओमिक्रॅानचे रुग्ण आढळून आलेत.
डॉ. अंद्रादे पुढे सांगतात, "सौम्य लक्षणं असलेले रुग्ण बहुदा ओमिक्रॅानचे असण्याची शक्यता आहे."
नेस्को कोव्हिड रुग्णालयातील ब्लॅाक-B मध्ये 1100 बेड्स तयार आहेत. तर वाढती रुग्णसंख्या पहाता ब्लॅाक-C मध्ये आणखी 1350 बेड्सची तयारी करण्यात आलीये.
या कंट्रोल सेंटरमध्ये आत शिरताना काही मुली बाहेर बॅगा घेऊन बसलेल्या आढळून आल्या. आतही मोठी रांग पहायला मिळाली.
या मुलं-मुलींच्या हातात फाईल होत्या. यातील काही मुलं बहुधा डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय असण्याची शक्यता होती. रुग्णांसाठी बेड्स वाढवायचे म्हणजे मनुष्यबळ हवंच. त्यामुळे डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयसाठी इंटरव्ह्यू सुरू झाले होते.
त्यांना खुर्चीवर बसवून कागदपत्रं तपासणी आणि नोंदणी सुरू होती.
डॉ. अंद्रादे पुढे सांगत होत्या, " डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय स्टाफ घेण्यात आलाय. गरज पडल्यास केव्हाही दुसरा ब्लॉक रुग्णांसाठी खुला करू शकतो."
दुपारची वेळ असल्याने काही लोक आपापला जेवणाचा डबा खाताना पहायला मिळाले.
जंबो रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतरच तिसऱ्या दिवशी कोव्हिड टेस्ट केली जातेय. रुग्ण निगेटिव्ह असेल तर डिस्चार्ज देण्यात येतोय.
नेस्को फक्त कोव्हिड रुग्णालय नाही. याठिकाणी लसीकरणही सुरू आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेली काही शाळेची मुलं पाहायला मिळाली.
नेस्को कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर आणि रुग्णांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र जागा करण्यात आलीये. घरचं जेवण देण्यासाठी बाहेर बॉक्स