Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Omicron : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन कारणीभूत?

Omicron: Omicron causes third wave of corona in Mumbai? Omicron : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन कारणीभूत?Marathi Coronavirus News in Webdunia Marathi
, रविवार, 2 जानेवारी 2022 (15:20 IST)
मुंबईत पसरलेल्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन व्हेरियंट कारणीभूत आहे, असं आकडेवारीतून समोर येत आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेंसिंग अहवालात 55 टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आलाय. 15 डिसेंबरला फक्त 2 टक्के रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित होते. तर गुरूवारी राज्यातील 198 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 190 मुंबईतील होते.
महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "यात काहीच दुमत नाहीय की, मुंबईत ओमिक्रॉन व्हेरियंटने डेल्टा व्हेरियंटची जागा घेतली आहे."
मुंबईतील तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची आहे. मुंबईत शनिवारी  9 हजार 170 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग अहवालात काय आढळलं?
मुंबई महापालिकेने शुक्रवारी सातव्या जिनोम सिक्वेंसिंग चाचणीचे अहवाल जाहीर केले. यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं.
 
282 नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आलं
त्यातील 156 म्हणजे 55 टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला
37 म्हणजे 13 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंटचे आढळले
डेल्टा व्हेरियंटचे उपप्रकार असलेल्या डेल्टा डेरिव्हेटिव्हजे 89 रुग्ण आढळून आले
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, "ओमिक्रॉनबाधित 156 रुग्णांपैकी फक्त 9 रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचारांची गरज भासली. तर एकूण रुग्णांपैकी फक्त 17 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं."
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये 46 रुग्ण 0 ते 20 वयोगटातील, 99 रुग्ण 21 ते 40 वयोगटातील, 41 ते 60 वयोगटातील79 रुग्ण आणि 54 रुग्ण 61 ते 80 वयोगटातील आहेत.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांना ऑक्सिजन किंवा अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं नाही. तर 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 32 मुलं बाधित झाली होती."
मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी पुढे माहिती देतात की, ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल करावं लागलेल्या रुग्णांपैकी तीन जणांनी कोव्हिडविरोधी लशीचा एक डोस घेतला होता. दोन्ही डोस घेतलेले दहा रुग्ण, हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तर, लशीचा एकही डोस न घेतलेल्या 81 पैकी चार रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
 
15 डिसेंबरला काय परिस्थिती होती?
297 नमुन्यांमध्ये 35% डेल्टा व्हेरिअंट, 62% डेल्टा डेरिव्हेटीव्ह, 2% ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले होते
यात 183 नमुने 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' या उप प्रकाराचे तर 105 नमुने 'डेल्टा व्हेरिअंट'ने बाधित आढळून आले
2 % म्हणजेच फक्त 7 नमुने ओमिक्रॅानचे असल्याचं निदर्शनास आलं
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील - प्रदीप व्यास
"कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जानेवारीत 2 लाख केसेस येऊ शकतील," असं महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्य़ा पत्रात म्हटलं आहे.
प्रदीप व्यास आपल्या पत्रात म्हणतात, "ओमिक्रॅान सौम्य आहे असं समजू नका, लस न घेतलेल्यांसाठी आणि सहव्याधी असलेल्यांसाठी हा व्हेरियंट जीवघेणा आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनासंसर्ग खूप मोठा असेल आणि केसेस जास्त असतील, त्यामुळे लसीकरण मोहीम वाढवा आणि जीव वाचवा"
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रात 5 हजार 631 नवे रुग्ण आढळले आहेत.
 
तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन व्हेरियंट कारणीभूत?
तज्ज्ञ सांगतात की, या आकडेवारीवरून स्पष्ट आहे की मुंबईत पसरलेली कोरोना संसर्गाची तिसरी लाट ही ओमिक्रॉन व्हेरियंटची आहे.
 
बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "मुंबईत कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटची आहे. थोड्या दिवसातच डेल्टा व्हेरियंट पूर्णत: डिस्प्लेस होईल."
कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाराष्ट्रातून सुरू झाली होती. ही लाट डेल्टा व्हेरियंटची होती. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली ही लाट हळूहळू कमी झाली तर डेल्टा व्हेरियंट मोठ्या प्रमाणात आढळून येत होता.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी राज्यातील 198 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 190 मुंबईतील होते.
राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "ओमिक्रॉनचा संसर्ग समाजात दिसून येत असला तरी त्याची लक्षणं अत्यंत सौम्य आहेत."
 
मुंबईत मोठ्या प्रमाणावर ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून येत आहेत. याचा अर्थ मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा समुहसंसर्ग झालाय? डॉ. शशांक जोशी पुढे सांगतात, "मुंबईत ओमिक्रॉनचा समुह संसर्ग झालाय. तर काही भागात क्लस्टर आऊटब्रेक दिसून आलाय."
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ओमिक्रॉनबाधित रुग्ण जास्त दिसून आले असले तरी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण फार कमी आहे. डॉ. जोशी पुढे म्हणाले, "ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलेलं नाही." मुंबईत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 6 टक्के आहे."
तज्ज्ञ सांगतात, कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटमुळे जास्त गंभीर आजर होत होता. त्याच्या तुलनेत ओमिक्रॉन झपाट्याने पसरला तरी आजार सौम्य स्वरूपाचा असेल.
 
डॉ. जोशी पुढे सांगतात, "ओमिक्रॉनचे रुग्ण लवकर रिकव्हर होतील. जागतिक पातळीवरील डेटा सांगतो की सहव्याधी असलेल्यांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. याकडे आपल्याला काळजी घ्यावी लागेल."
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार 18 वर्षाखालील ज्या मुलांना कोव्हिड झाला. त्यातील 16 मुलांना ओमिक्रॉनची लागण झालीये. तर, इतर मुलं डेल्टा व्हेरियंटने बाधित आहेत.
फोर्टिस हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडीत म्हणतात, "जिनोम सिक्वेंसिंगचा मोठा हिस्सा ओमिक्रॉन व्हेरियंटचा आहे. आपल्याला 10 जानेवारीपर्यंत पहावं लागेल. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या जास्त नसेल तर परिस्थिती चांगली असल्याचं म्हणता येईल."
"पण रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर मात्र काळजीचं आणि चिंतेचं कारण नक्कीच असेल," असं डॉ. पंडीत पुढे म्हणाले.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवोदय विद्यालयातील 85 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह