Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल : भुजबळ

अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल : भुजबळ
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (22:23 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी पंचवटी नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिना भराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्क शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच याठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदीचे आदेश