मुंबईत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी आपल्या ताब्यात द्यावं अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) केलेली आहे.
याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनने करोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला ५० लाखांची आर्थिक मदत दिली होती. याचसोबत गरज लागल्यास आपल्या अखत्यारीत असणारी मैदानं क्वारंटाइन सुविधेसाठी वापरण्याची तयारीही MCA ने दर्शवली होती.
मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात येत आहेत. गोरेगावमध्ये नेस्को कॉम्प्लेक्स परिसरात काही दिवसांपूर्वी १ हजारांपेक्षा अधिक रुग्णक्षमता असलेल्या क्वारंटाइन सुविधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. याव्यतिरीक्त BKC आणि ठाणे अशा ३ ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात आलेली आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मैदानं ताब्यात घेण्याचं ठरवलं आहे.