Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नायनाटानंतरही जेव्हा सापडलेला देवीचा रुग्ण, हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झालेला?

corona
, शनिवार, 11 मार्च 2023 (22:16 IST)
तीन वर्षांपूर्वी जगभरात पसरलेला कोव्हिड-19 विषाणू चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला होता. हा दावा करून न थांबता अमेरिकेने चीनवर अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनमध्ये 2018 ते 2021 पर्यंत संचालक पदावर राहिलेले डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी बुधवारी (8 मार्च) अमेरिकेच्या काँग्रेस पॅनेलला सांगितलं की, कोव्हिड-19 हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून लीक झाल्याची शक्यता आहे.
 
डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड आणि एफबीआय प्रमुख क्रिस्टोफर रे यांची मतं याबाबतीत जुळतात.
 
यूएस टीव्ही नेटवर्क फॉक्स न्यूजशी बोलताना क्रिस्टोफर म्हणाले होते की, "एफबीआयने केलेल्या तपासानंतर ही साथरोग प्रयोगशाळेतील एका अपघाताशी निगडित असल्याचं समोर आलंय."
पण बरेच शास्त्रज्ञ असं सांगतात की, हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. अमेरिकन सरकारच्या इतरही संस्थांनी यासंबंधी वेगवेगळे निष्कर्ष काढलेत.
 
कोव्हिड-19 च्या उत्पत्तीबद्दल अमेरिकन सरकारमध्येही एकमत नाहीये.
 
पण मग असा एखादा जीवघेणा विषाणू प्रयोगशाळेतून सहज लीक होऊ शकतो का? असा प्रकार यापूर्वी कधी घडला आहे का?
 
तर होय! यापूर्वीही असं घडलं होतं.
 
पण मग असा एखादा जीवघेणा विषाणू प्रयोगशाळेतून सहज लीक होऊ शकतो का? असा प्रकार यापूर्वी कधी घडला आहे का?
 
तर होय! यापूर्वीही असं घडलं होतं.
 
यापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रयोगशाळांमधून अत्यंत घातक विषाणू लीक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातलाच एक विषाणू होता देवी रोगाचा.
 
असं म्हटलं जातं की, 20 व्या शतकात देवीमुळे 30 कोटी लोक मरण पावले होते. पुढे 1977 मध्ये देवीचं पूर्ण निर्मूलन झालं, पण...
 
जीवघेणा संसर्ग
1977 मध्ये देवीचा रोग हद्दपार झाला तरी ऑगस्ट 1978 मध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठातील 40 वर्षीय मेडिकल फोटोग्राफर जेनेट पार्करला देवीचा संसर्ग झाला. अचानक झालेल्या या संसर्गाने सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. पण असं का?
 
देवीच्या उद्रेकावेळी बर्मिंगहॅम रुग्णालयात संसर्गजन्य रोगाचे सल्लागार म्हणून काम करणारे प्रोफेसर अल्सायडर गेडेस सांगतात की, "हा एक भयंकर रोग होता. केवळ बर्मिंगहॅमलाच नाही तर सरकारला सुद्धा या रोगाची भीती होती."
 
देवी हा संसर्गजन्य रोग आहे आणि त्यावेळी संसर्ग झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांचा मृत्यू होत होता. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत या संसर्गजन्य रोगावर प्रयोग केले जात होते.
 
पण मग जेनेट पार्करला देवीचा संसर्ग कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नाही.
 
एका सरकारी अहवालात म्हटलं होतं की, हा विषाणू हवा, वैयक्तिक संपर्क आणि कोणत्याही संक्रमित उपकरणाद्वारे पसरण्याची शक्यता असते.
 
पार्कर आयसोलेशनमध्ये असल्यामुळे केवळ तिच्या आईलाच संसर्ग झाला होता.
 
जेनेट पार्करचा या आजारात मृत्यू झाला, पण तिची आई यातून बरी झाली. त्यावेळी या संसर्गाच्या प्रादुर्भावाने आणखी दोन जणांचा मृत्यू झाला होता.
 
या मृतांमध्ये जेनेट पार्करचे सत्याहत्तरी गाठलेले वडील फ्रेडरिक पार्कर देखील होते. आपल्या मुलीच्या (जेनेट पार्कर) काळजीने चिंताग्रस्त झालेल्या फ्रेडरिक पार्कर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
 
मृतांमधील दुसरी व्यक्ती होते बर्मिंगहॅमच्या स्मॉलपॉक्स लॅबचे प्रमुख प्रोफेसर हेन्री बेडसन. त्यांनी आत्महत्या केली होती.
 
जगातील सर्वात सुरक्षित प्रयोगशाळा
जेनेट पार्करच्या मृत्यूमुळे हादरलेल्या अधिकाऱ्यांनी इतर प्रयोगशाळांची फेरतपासणी केली. ज्या ठिकाणी हे विषाणू ठेवण्यात आले होते अशा प्रयोगशाळांची संख्या कमी करण्यासाठी पावलं उचलली गेली.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 1979 मधील एका करारानुसार देवीच्या सक्रिय विषाणूचा स्टॉक अमेरिकेतील अटलांटा येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि रशियाच्या सायबेरिया नोवोसिबिर्स्क प्रदेशातील वेक्टर लॅबमध्ये ठेवला होता.
 
या प्रयोगशाळा जगातील सर्वात सुरक्षित प्रयोगशाळा असल्याचं त्याकाळी मानलं जात होतं. मात्र या प्रयोगशाळांनाही अनेक धोकादायक घटनांना सामोरं जावं लागलं.
 
2014 मध्ये सीडीसीच्या कार्यकर्त्यांना परीक्षणासाठी ठेवलेले नमुने निष्क्रिय करता आले नाहीत. यामुळे डझनभर लोकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र यामुळे कोणालाही संसर्ग झाला नाही.
 
2019 मध्ये सायबेरियाच्या व्हेक्टर प्रांतात गॅसचा स्फोट होऊन इमारतीच्या खिडक्या फुटल्या होत्या. या स्फोटात एक कर्मचारी गंभीर भाजला होता. मात्र या अपघातामुळे कोणताही जैविक प्रसार झाला नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
 
जीवघेण्या चुका
अशा कित्येक घटना सांगता येतील ज्यात सर्वांत सुरक्षित प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी आणि जवळपास राहणारे लोक संक्रमित झाले होते.
 
फ्रान्समधील प्रयोगशाळेत काम करत असताना उपकरणाचा तुकडा लागून एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूच्या दहा वर्षांनंतर फ्रान्समध्ये सुरक्षेशी संबंधित उपायांवर काम करण्यात आलं.
 
या संसर्गजन्य प्रथिनामुळे होणारा रोग टाळता येईल किंवा त्यावर उपचार करता येईल अशी कोणतीही लस किंवा उपचार त्यावेळी अस्तित्वात नव्हता.
 
चीनच्या वायव्य भागातील लॅन्झोउ प्रांतात एका बायोफार्मास्युटिकल प्लांटमध्ये बिघाड झाला होता. यावेळी तिथल्या जवळपास 10,000 हून अधिक लोकांना धोकादायक अशा पॅथोजेनची लागण झाली होती.
या लोकांना या संसर्गातून वाचवण्यासाठी एका लसीचा वापर करण्यात आला होता. ही लस जनावरांचं ब्रुसेला बॅक्टेरियापासून संरक्षण करते. एका चुकीमुळे प्लांटमधील कर्मचाऱ्यांना या संसर्गाची लागण झाली आणि नंतर हा विषाणू संपूर्ण शहरभर पसरला.
 
यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, लोकांमध्ये तापाची लक्षणे दिसू लागली आणि बराच काळ लोकांना याचा त्रास झाला.
 
हजारो लोकांना डॉक्टरांच्या मदतीची गरज होती.
 
प्रयोगशाळेत संसर्ग झालेल्या लोकांपेक्षा बाहेर पसरलेल्या संसर्गाची लक्षणे खूपच वेगळी होती.
 
विषाणूच्या या गळतीचं नेमकं कारण काय?
आता अशीही बरीच प्रकरणं आहेत ज्यात संसर्ग किंवा रोग प्रयोगशाळेतून बाहेर तर आला, पण त्याचं मूळ शोधताच आलं नाही.
 
2021 मध्ये तैवानच्या तैपेई येथील एका प्रयोगशाळेत काम करत असताना कर्मचाऱ्यांना कोव्हिड-19 ची लागण झाली.
 
प्रयोगशाळेतील पर्यवेक्षण यंत्रणा कठोर नसल्याचं तपासणीत आढळून आलं. पण नेमकं चुकलं कुठे याचा पत्ताच लागला नाही.
 
प्रयोगशाळेत काम करत असताना सुरक्षा उपकरणे काढून ठेवल्याने श्वसनाद्वारे या विषाणूचा संसर्ग झाल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात आल्या.
 
पण प्रयोगशाळांमध्ये या विषाणूची गळती होते हे देखील तितकंच सत्य आहे. त्यामुळे कोव्हिड-19 चा संसर्ग नेमका चीनमधून पसरला की तो जंगली प्राण्यांमुळे पसरला याचा सोक्षमोक्ष लागणं बाकी आहे.

Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रिक्षाने प्रवास करणाऱ्या माय-लेकीचा मृत्यू