IND vs AUS :गेल्या 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहतायत तो आता काही तासांवर आलाय. या निर्णायक क्षणानं मागच्या दहा वर्षात हुलकावणी दिलीय. अखेर ही प्रतीक्षा संपणार का?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षकांच्या गजरात रोहित शर्मा विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
कसा होता दोन्ही टीमचा प्रवास?
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तब्बल 20 वर्षांनी वर्ल्ड कप फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकलेत.
यापूर्वी 2003 साली झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 125 धावांनी पराभव केला होता.
मागच्या 20 वर्षांमध्ये परिस्थिती बदललीय. यजमान भारतानं सलग दहा सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केलाय. या प्रत्येत सामन्यात भारतीय खेळाडूंनी कामगिरी उंचावत आपली स्पर्धा इतरांशी नाही तर स्वत:च्याच पूर्वीच्या कामगिरीशी आहे हे दाखवून दिलंय.
ऑस्ट्रेलियानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकलेत. या आठपैकी न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागलाय.
भारताची बाजू वरचढ का?
फायनलपूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजीची पॉवर सर्वांनी पाहिलीय. या दोन्ही सामन्यात प्रत्येकी 2 फलंदाजांनी शतक झळकावलंय.
रोहित शर्मा सातत्यानं आक्रमक सुरूवात करुन देतोय. शुबमन गिलचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील रेकॉर्ड जबरदस्त आहे. फायनलमधील पहिल्या दहा ओव्हर ही जोडी कशी खेळणार? यावर भारतीय टीमचं भवितव्य निश्चित होणार आहे.
टीम इंडियाची मधली फळी देखील फॉर्मात आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि वन-डे क्रिकेटमध्ये 50 शतक हे दोन्ही विक्रम विराटनं सेमी फायनलमध्ये नोंदवलेत. त्यानं या स्पर्धेत 10 पैकी 8 वेळा पन्नाशीचा टप्पा ओलांडलाय. तर, 3 वेळा शतक झळकावलंय.
श्रेयस अय्यरनं मागच्या 4 सामन्यात दोन सलग शतकांसह 392 धावा केल्यात. तर के.एल. राहुलची या स्पर्धेतील सरासरी 75 पेक्षा जास्त आहे.
2003 च्या फायनलमध्ये भारताला हरवणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये ग्लेन मॅग्रा आणि ब्रेट ली होते. यंदा भारताकडं जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी आहेत. मोहम्मद सिराजही त्यांना तोलामोलाची साथ देतोय.
फिरकी गोलंदाजीपुढं गोंधळण्याचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा इतिहास आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा सज्ज आहेत.
ऑस्ट्रेलिया आव्हानात्मक का?
भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्मात असली तर विश्वचषकाची फायनल खेळणाऱ्या कोणत्याही टीमला हलक्यात घेता येणार नाही. त्यातच ऑस्ट्रेलियाशी सामना असल्यानं हे आव्हान आणखी खडतर आहे.
1996 पासून कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवल्याशिवाय अन्य टीमला जगज्जेता होता आलेलं नाही.
ऑस्ट्रेलियानं पाचवेळा म्हणजे 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वन डे वर्ल्ड कप जिंकलाय. त्याशिवाय दोनदा म्हणजे 1975 आणि 1996 साली ते उपविजेते ठरले.
डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड आणि मिच मार्श ही त्यांची टॉप ऑर्डर फॉर्मात आहे. स्मिथ आणि लबुशेनसाठी हा विश्वचषक तितका यशस्वी ठरला नसला तरी फायनलमध्ये सर्वोत्तम खेळ करण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे.
जगातील कोणत्याही पिचवर आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्लेन मॅक्सवेलला कमी लेखून चालणार नाही.
7 ते 11 क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळोवेळी संकटातून बाहेर काढलंय. त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी या स्पर्धेत तब्बल 402 बॉल खेळलेत. तर भारताच्या लोअर ऑर्डरनं फक्त 49 बॉलचा सामना केलाय.
ऑस्ट्रेलियच्या तळाच्या फलंदाजांनी टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावलीय. त्यामुळे फायनलमध्ये शेवटची विकेट पडेपर्यंत भारतीय गोलंदाजांना शांत बसता येणार नाही.
स्टार्क- हेझलवूड -कमिन्स हा अनुभवी वेगवान गोलंदाजांचा मारा ऑस्ट्रेलियाकडं आहे. त्याला झम्पाचीही साथ मिळतीय. या गोलंदांजीनं भारताची चेन्नईत 3 बाद 2 अशी अवस्था केली होती.
कसं असेल पिच?
वन डे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या पिचवरून बरीच चर्चा झाली होती. साहजिकच आता फायनलसाठीचं पिच कसं असेल, याविषयी तुमच्या मनात उत्सुकता असेल.
तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्रकारच्या मातीनं बनवलेल्या एकूण 11 खेळपट्ट्या आहेत. त्यातल्या पाच काळ्या मातीनं बनवल्या आहेत ज्यावर चांगला बाऊन्स मिळतो. बाकीच्या खेळपट्या लाल मातीनं आणि मिश्र प्रकारच्या मातीनं बनवल्या आहेत.
स्टेडियमच्या साधारण मध्ये असलेल्या काळ्या मातीच्या पिचवर हा सामना होणार आहे. ज्या पिचवर आधी भारत आणि पाकिस्तानमधला सामना खेळवला होता, त्याच पिचवर ही लढत होणार असल्याचं समजतंय. जुनी विकेट असल्यानं इथे स्पिनर्सना मदत मिळण्याची शक्यता आहे आणि ती गोष्ट विचारात घेऊन आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते.
या स्पर्धेदरम्यानन अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यांत वेगवान गोलंदाजांनाही पिचकडून मदत मिळताना दिसली होती.
हवामानाचा विचार केला तर अहमदाबादमध्ये या दिवसांत हवा बरीच कोरडी आहे, जास्तीत जास्त तापमान 33 अंशांपर्यंत जातं, पण दुपारी सूर्य कलला की ते आठ-१० अंशांनी कमी होतंय. त्यामुळे खेळाडूंना डीहायड्रेशन किंवा पायात गोळे येण्याची भीती कमी आहे.
पण तापमान कमी होत असल्यानं सामन्याच्या उत्तरार्धात दवाचा प्रभाव पडू शकतो. इथे यंदा विश्वचषकातील चारपैकी तीन सामने प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं जिंकले होते. पण त्याआधीच्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनाही आरामात विजय मिळवतात आलाय.
आता फायनलमध्ये टॉस जिंकणारा कर्णधार काय निर्णय घेईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Published By- Priya Dixit