Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

SA vs AUS Live Score : डेव्हिड मिलरचं झुंझार शतक, दक्षिण आफ्रिकेचं ऑस्ट्रेलियाला 213 धावांचं आव्हान

SA vs AUS Live Score : डेव्हिड मिलरचं झुंझार शतक, दक्षिण आफ्रिकेचं ऑस्ट्रेलियाला 213 धावांचं आव्हान
, गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (18:51 IST)
कोलकातामध्ये सुरू असलेली दुसरी सेमी फायनल जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 213 धावांचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही विश्वचषक स्पर्धेची सेमी फायनल सध्या सुरू आहे.
 
डेव्हिड मिलरच्या झुंझार शतकामुळे दक्षिण आफ्रिकेनं 49. 4 ओव्हर्समध्ये सर्वबाद 212 धावा केल्या. मिलर मैदानात उतरला तेंव्हा दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 अशी नाजूक होती.
 
मिलरनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली. त्यानं हाईनरीक क्लासेनसोबत पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागिदारी केली आफ्रिकेच्या इनिंगमधील ही सर्वोच्च भागिदारी ठरली.
 
आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्लासेननं सेट झाल्यावर काही चांगले फटके लगावले. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच कमिन्सची चाल यशस्वी ठरली.
 
कमिन्सची चाल यशस्वी
मिलर – क्लासनेन जोडी प्रमुख गोलंदाजांना दाद देत नव्हती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्यावेळी ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजी दिली.
 
हेडनं पहिल्याच ओव्हरमध्ये क्लासेनला 46 धावांवर बाद केलं. हेडनं त्याच्या पुढच्याच बॉलवर मार्को जॅन्सनला शून्यावर बाद केलं. हेडनं एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत मोठी धावसंख्या करण्याच्या आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आणल्या.
 
मिलरचा विक्रम
एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्यानंतर मिलरचा लढा सुरूच होता. त्यानं जेराल्ड कोट्झीसोबत सहाव्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली. कोट्सझीनं 19 धावा केल्या.
 
मिलरनं त्याचं अर्धशतक 70 बॉलमध्ये पूर्ण केलं. तर, 115 बॉलमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं त्यानं शतक झळकावलं.
 
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये शतक झळकावणारा मिलर हा पहिलाच दक्षिण आफ्रिकन फलंदाज आहे.
 
पॅट कमिन्सला षटकार लगावून शतक झळकावणारा मिलर पुन्हा एकदा तसाच प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात 101 धावांवर बाद झाला.मिलरच्या शतकामुळंच आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
 
ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा
टॉस हरल्यानं पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं पहिलं सत्र गाजवलं. मिचेल स्टार्कनं पहिल्याच ओव्हरमध्ये टेंबा बवुमाला शून्यावर बाद केलं.
 
या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 4 शतकं झळकावणारा क्विंटन डी कॉक देखील अपयशी ठरला. जॉश हेझलवूडनं त्याला 3 धावांवर बाद केलं.
 
रॅसी वेन देर ड्युसेन (6) आणि एडन मार्काराम (10) हे या स्पर्धेत सातत्यानं धावा जमवणारे फलंदाज सेमी फायनलमध्ये अपयशी ठरले.
 
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जॉश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
या सामन्यातील विजेत्या संघाची वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताशी लढत होणार आहे. अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबर रोजी फायनल होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : 40 मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणखी 40 तास लागण्याची शक्यता