वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण रायगड गावी बळवंतराव फडके यांचा घरी झाला. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार व्यक्तिमत्त्वाचे होते. शिक्षणात त्यांचे मन विशेष रमले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश केला. हायस्कूल शिक्षणासाठी पुणे गाठून त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्यांनी रेल्वेत लिपिकाची नोकरी केली. त्यानंतर 1864 मध्ये लष्कराच्या वित्त विभागात दाखल झाले. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी नोकरी सोडून दिली.त्यांचा प्रथम विवाह सोमण घराण्यातील मुलीशी झाला. त्यांच्यापासून त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली. प्रथम पत्नीच्या मृत्यू नंतर त्यांनी गोपिकाबाई यांच्याशी दुसरे लग्न केले. नंतर त्या देखील निधन पावल्या. एकंदरीत त्यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नव्हते.
ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्द बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. गनिमी कावा ही शिवकाळातील युक्ती त्यांनी आपल्या संघर्षासाठी उपयोगात आणली. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.
ब्रिटिश शासनाने त्यांच्या अटकेसाठी बक्षीस घोषित केली. 1870- 78 दरम्यान पडलेल्या दुष्काळात शेतकर्यांच्या दयनीय परिरिस्थतिविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. आपल्या तडफदार भाषणातून त्यांनी स्वातंत्र्याची सिंहगर्जना केली. आमसभांच्या माध्यमातून त्यांनी देशाची हलाखीची स्थिती देशवासीयांसमोर मांडली.त्यांना लढाऊ राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जाते.
स्वातंत्र्यच सर्व समस्यांचे समाधान असल्याचे त्यांचे मत होते. विजापूर जिल्ह्यात 20 जुलै1879 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पुण्यात तीन नोव्हेंबर 1879 रोजी राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यांना जन्मठेप झाली. तुरूंगात असतानाच क्षय रोगाने त्यांचे निधन झाले. भारतीयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत जागवण्याचे महान कार्य त्यांनी केले.त्यांना मान वंदना देण्यासाठी त्यांचा स्मारक स्तंभ शिरढोण येथे उभारला आहे.