Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

FIFA वर्ल्डकप 2022 : फक्त 80 वर्षांत श्रीमंत देशांच्या यादीत जाऊन बसणाऱ्या कतारची गोष्ट

FIFA वर्ल्डकप 2022 : फक्त 80 वर्षांत श्रीमंत देशांच्या यादीत जाऊन बसणाऱ्या कतारची गोष्ट
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (16:20 IST)
जोस कारलोस क्युटो
 
यंदाचा फिफा वर्ल्डकप 2022 कतारची राजधानी दोहामध्ये पार पडत आहे. थोडक्यात यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपचं यजमानपद कतारकडे आहे. असं कधी घडेल असं कोणाला वाटलंही नव्हतं.
 
एक शतकापूर्वी म्हणजे 1922 मध्ये केवळ 12,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा देश राहण्यासाठी योग्य आहे असं वाटत नव्हतं.
 
इथं राहणारे लोक मोठ्या संख्येन मच्छीमारी करायचे, कोणी मोती वेचायचे. विशेष म्हणजे हे लोक भटके होते, जे अरबी समुद्राच्या द्वीपकल्पात फिरायचे.
 
आज जे लोक आपल्या वयाच्या नव्वदीत आहेत त्यांना 1930-40 मध्ये आलेलं भयंकर आर्थिक संकट आजही लक्षात असेल.
 
हा तो काळ होता जेव्हा जपानी लोकांनी मोत्यांची शेती सुरू केली होती आणि मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन सुरू केलं होतं. याचा परिणाम असा झाला की, कतारवर आर्थिक संकट ओढवलं.
 
त्याच दशकात कतारच्या 30 टक्के लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली. चांगल्या आर्थिक संधीच्या शोधात या लोकांनी परदेश गाठलं. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार तेव्हा इथली लोकसंख्या 24 हजारांवर आली.
 
पण कतारच्या अर्थव्यवस्थेने लवकरच यू-टर्न घेतला. कतारमध्ये जगातील सर्वांत मोठा तेलासाठा असल्याचं समोर आलं.
 
20 व्या शतकाच्या मध्यात कतारच्या तिजोरीत भर पडत गेली आणि तो जगातील समृद्ध देशांपैकी एक असा देश बनला. आज तुम्ही कतार पाहिलं तर तिथं मोठमोठाल्या इमारती, कृत्रिम बेटं आणि अत्याधुनिक स्टेडियम आहेत.
 
बीबीसीने कतारचे असे तीन बदल हेरलेत ज्यामुळे कतार जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक बनलाय.
 
  1939 मध्ये लागला तेलाचा शोध
ब्लॅक गोल्ड अर्थात खनिज तेल, हे जेव्हा कतारमध्ये सापडलं तेव्हा कतारचं स्वतंत्र असं अस्तित्व नव्हतं. 1916 पासून हा देश ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता.
 
बऱ्याच वर्षांच्या शोधानंतर 1939 मध्ये दोहापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशाच्या पश्चिम किनार्‍यावर, दुखान इथं खनिज तेलाचा साठा सापडला.
 
अमेरिकेच्या बेकर इन्स्टिट्यूशनमधील कतार विषयीच्या तज्ज्ञ क्रिस्टियन कोट्स म्हणतात की, "दुसऱ्या महायुद्धाला जेव्हा सुरुवात झाली त्याच दरम्यानच्या काळात या खनिज तेलाचा शोध लागला. त्यामुळे झालं असं की, या धामधुमीच्या काळात 1949 पर्यंत तेलाची निर्यात थांबली, साहजिकच फायदा मिळणं थांबलं."
 
पण पुढं तेलाची निर्यात सुरू झाल्यावर कतारमध्ये संधी खुल्या झाल्या आणि तिथं आधुनिकीकरण सुरू झालं.
 
आता तेल उद्योगात मिळत असणारा फायदा बघून बरेच गुंतवणूकदार कतारमध्ये आले. आणि यथावकाश कतारची लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली.
 
1950 मध्ये इथं 25,000 पेक्षा कमी लोकसंख्या होती. 1970 पर्यंत ती 1,00,000 पेक्षा जास्त झाली.
 
एककाळ असा होता जेव्हा मच्छीमारांचा, मोती पिकवणाऱ्यांचा देश म्हणून कतारची ओळख होती. पण खनिज तेलाच्या शोधानंतर 1970 च्या दशकात या देशाचा जीडीपी 300 मिलियन अमेरिकन डॉलर इतका झाला होता.
 
एका वर्षानंतर ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली आणि कतार स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. इथं एका नव्या युगाची सुरुवात झाली. कतारच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होतच होती.
 
नैसर्गिक वायूचा शोध
1971 मध्ये कतारच्या पूर्वेत्तर किनार्‍याजवळील नॉर्थ फील्डमध्‍ये नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध लागला. पण बऱ्याच कमी लोकांना त्याच महत्त्व समजून आलं.
 
आणि महत्त्वाचं म्हणजे नॉर्थ फील्ड हा पृथ्वीवरील नैसर्गिक वायूचा सर्वांत मोठा साठा आहे हे समजायला जवळपास 14 वर्षं लागली होती. यासाठी बरेचसे रिसर्च देखील करण्यात आले.
 
म्हणजे कतार हा इराण आणि रशिया नंतरचा तिसरा मोठा देश आहे जिथं नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे.
 
नॉर्थ फील्डचं क्षेत्रफळ सुमारे 6,000 वर्ग किमी इतकं आहे. अर्थात हे क्षेत्रफळ  संपूर्ण कतारच्या निम्म्याएवढं आहे.
 
कतार गॅस कंपनी द्रवीभूत नैसर्गिक वायूची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने कतारच्या आर्थिक वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
पण ज्या पद्धतीने तेलातून कमाई व्हायला कतारला वेळ लागला तसंच गॅसच्या बाबतीत झालं.
 
कोट्सच्या म्हणण्यानुसार, "या गॅसला बऱ्याच काळापासून मागणी नव्हती, साहजिकच मागणी नाही म्हटल्यावर त्याचा विकास करण्यात कोणी रस घेतला नाही. पण 80 च्या दशकात यात बदल व्हायला सुरुवात झाली. पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या, 90च्या दशकात या गॅसच्या निर्यातीची व्यवस्था झाली. आणि त्यानंतर कातरच्या अर्थव्यवस्थेला आणखीन बुस्ट मिळाला."
 
1995 मध्ये सत्तापालट
जसं 21 वं शतक उजाडलं तसं कतारच्या आर्थिक विकासदराच्या ग्राफने मोठी झेप घेतली. 2003 ते 2004 दरम्यानकतारचा जीडीपी दर 3.7 टक्क्यांवरून 19.2 टक्क्यांपर्यंत वाढला. त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे 2006 मध्ये हा दर 26.2 टक्के इतका झाला.
 
हा वाढता जीडीपीचा दर कतारची नवी ओळख बनला. पण फक्त गॅसच्या निर्यातीमुळे या दारात वाढ झाली असं नाही म्हणता येणार.
 
मोहम्मद सैदी हे कतार विद्यापीठात प्राध्यापक आहेत. सोबतच ते स्थायी अर्थशास्त्रातील तज्ज्ञ आहेत. ते सांगतात,
 
"जेव्हा राजकीय बदल घडत होते तेव्हा आर्थिक बदलही झाले. 1995 मध्ये वर्तमान आमिर तमीम बिन हमाद अल्थानी यांचे वडील हमाद बिन खलिफा अल्थानी यांनी सत्ता हातात घेतली. बऱ्याच लोकांना हे चुकीचं वाटलं, की असं कसं काय होऊ शकतं?"
 
हमाद बिन खलिफा अल्थानीने आपले वडील स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असताना सत्ता हस्तगत केली. अल्थानी कुटुंब गेल्या 150 वर्षांपासून कतारवर राज्य करतंय. आणि अशा पद्धतीने सत्ता काबीज करण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती. पण या सत्तापरिवर्तनाने कतारच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला.
 
गॅस आणि तेल काढण्यासाठी केलेली गुंतवणूक, द्रवीकरण आणि निर्यातीसाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक यामुळे कतार इतर देशांशी जोडला गेला.
 
1996 मध्ये द्रवरूप नैसर्गिक वायूने ​​भरलेलं जहाज जपानच्या दिशेने रवाना झालं. कतार गॅसची ही पहिली मोठी निर्यात होती. आणि याच निर्यातीमुळे कतारच्या अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगाची सुरुवात झाली.
 
2021 मध्ये कतारचं प्रतिव्यक्ती दरडोई उत्पन्न 61, 276 अमेरिकन डॉलर्स इतकं होतं.  जर आपण क्रयशक्ती बाबत पाहिलं तर जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हा आकडा 93, 521 अमेरिकन डॉलर्सवर जातो.
 
आता इतकं मोठं दरडोई उत्पन्न असण्यामागे कतारची कमी लोकसंख्या हेही एक कारण आहे. कतारची लोकसंख्या  3,00,000-3,50,000 च्या आसपास आहे. त्यातले अर्धे तर अनिवासी आहेत. पण कतारचं सरकार त्यांच्या लोकांना चांगला पगार, उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पुरवते.
 
कतारच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं
पण अलिकडच्या वर्षांत कतारच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असून त्याची गती थोडी मंदावली आहे. भविष्यात येणारी आव्हानं, जीवाश्म इंधनावर वाढतं अवलंबित्व आणि सध्या हवामान बदलांमुळे कतारला कठोर समीक्षा झेलावी लागते.
 
सईदी सांगतात, "2013 आणि 2014 मध्ये तेलांच्या किमती घसरल्या होत्या. त्यामुळे कतारने उत्पन्नाचे स्रोत बदलायला हवेत अशी चर्चा सुरू होती."
 
कतारसोबत झालेल्या राजनैतिक वादानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बाहरीन आणि इजिप्तने 2017 आणि 2021 दरम्यान नाकेबंदी लागू केली. याचा परिणाम कतारच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.
 
कोट्सच्या म्हणण्यानुसार, कतारकडे गॅस आणि तेलाव्यतिरिक्त आर्थिक कमाईचं इतर कोणतंच साधन नाहीये. त्यामुळे ते आता खाजगी क्षेत्रात हातपाय पसरवायचा विचार करत आहेत. त्यांचं हायड्रोकार्बनवरील अवलंबित्व कमी व्हावं यासाठी ते गुंतवणूकीचा विचार करत आहेत.
 
याचं उत्तम उदाहरण म्हणजे लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये कतार वेगवेगळी गुंतवणूक करीत आहे.
 
कोट्सना असं वाटतं की, "कतार आता दोहाला इव्हेंट्स, कॉन्फरन्स, मीटिंग्जचं केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि आता होणारा फिफा वर्ल्डकप त्याचंच एक उदाहरण आहे."
 
कतारने फुटबॉल वर्ल्डकप आयोजित करण्यासाठी 2,00,000 मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केलेत. आणि हा आत्तापर्यंतचा सर्वांत महागडा फिफा वर्ल्डकप आहे. यासाठी आठ स्टेडियम, नवीन विमानतळ, नवीन मेट्रो लाईन अशा पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
 
कतारने या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नेपाळ, भारत आणि बांगलादेश सारख्या देशांतून कामगार आणले. त्यांना बऱ्याचदा अमानवी परिस्थितीत काम करावं लागलं. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कतारच्या या कृतीवर अर्ध्याधिक जगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
 
यामध्ये कतार आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (फिफा) यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप करण्यात आलेत. 2010 मध्ये कतारने लाच देऊन कार्यक्रमाचं यजमानपद मिळवलं असं म्हटलं जातंय.
 
हल्लीच कतारच्या अधिकाऱ्यांनी एलजीबीटी कम्युनिटीविषयी वादग्रस्त विधानं केली, ज्यामुळे त्यांची पुराणमतवादी प्रतिमा जगासमोर आली आहे.
 
या टीका सोडल्या तर हे स्पष्ट आहे की, एवढ्या मोठ्या वर्ल्डकपचं आयोजन या छोट्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
 
त्यामुळे आता हा देश स्वतःला आधुनिक आणि प्रगतीशील म्हणवून एक भू-राजकीय खेळाडू म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rasnaचे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन