Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।

gajanan maharaj
हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति |
साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१||
जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |
तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||
तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |
साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||
जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |
दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||
तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |
महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५||
भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |
श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||
तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |
रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||
हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना |
हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||
तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |
व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९||
द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |
जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||
आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |
हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||
गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |
दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||
या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |
माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||
हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |
पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||
आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |
निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||
हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |
करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||
हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |
वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||
हे शेगांवीच्या गजानना | महासंत्ता आनंदघना |
तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ||१८||
तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |
माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||
जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |
स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||
माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||
उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |
मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||
उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |
तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||
परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |
भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||
बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |
भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||
बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |
तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||
केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पदींचे समर्था |
तुजलागी दंडवता | असो आमुचा बरचेवर ||२७||
तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |
टिटवींने सागाराचा अंत कसा घेववेल ? ||२८||
पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |
जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||
पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |
न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||
जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |
आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||
तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |
विश्र्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||
नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |
आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||
तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |
ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||
सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |
भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||
यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |
हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||
तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |
म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||
प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |
जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||
जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्र्वानर |
द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||
तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |
चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||
सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||
चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |
प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||
अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |
एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||
मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |
त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||
मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |
हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||
बंकटलालाचे वशिल्यानें । चरण धरिलें सोनारानें ।
अनन्यभाव भक्तीनें । गजाननाचे तेधवां ।।४६।।
गुरुराया अंतर । मऊ आपले साचार ।
तेंच का हो केले कठोर । मजविषयीं समर्था ।।४७।।
आता या चिंचवण्यासी । हात लावा पुण्यराशी ।
त्याविण मी सदनासी । न जाय येथून ।।४८।।
ऐसी त्याची ऐकून गिरा । चिंचवण्याशी लाविले करा ।
चिंचवणें तेच झारा झरा । अमृताचा विबुधहो ।।४९।।
यापरी जानकीराम शरण आला । अखेर आपुल्या पदाला ।
मुकीनचंदु कृतार्थ केला । खाऊन दोन कान्हवले ।।५०।।
माधव नामें चिंचोलीचा । ब्राम्हाण एक होता साचा ।
त्यास बोध अध्यात्माचा । तुम्हीच एक केलात ।।५१।।
भ्रांती त्याची उठविली । प्रपंच माया तोडिली ।
मोक्ष पर्वणी लाधली । तया माधवाकारणें ।।५२।।
ऐसें आपुलें महिमान । श्रेष्ठ आहे सर्वाहून ।
पदरी असल्या विपुल पुण्य । पाय तुझे सांपडती ।।५३।।
वसंत पूजेकारण । घनपाठी ब्राह्मण ।
आणविलेत आपण । ऐनवेळीं तेधवां ।।५४।।
बंकटलालें आपणांसी । नेलें खावया मक्यासी ।
आपुलिया मळयासी । अति आग्रह करुनी ।।५५।।
मोहळें होती मळयांत । मधमाशांची भव्य सत्य ।
तीं पेटविता आगटीप्रत । उठतीं झालीं निजलीलें ।।५६।।
मधमाशाशी पाहून । लोक करिती पलायन ।
भय जिवाचें दारुण । आहे की प्रत्येकाला ।।५७।।
तुम्ही मात्र निर्धास्त । बैसता झाला मळयांत ।
मधमाशा अतोनांत । बसल्या तुमच्या अंगावरी ।।५८।।
लोक दुरुन पाहती । परी न कोणाची होय छाती ।
तुम्हां सोडावया गुरुमूर्ती । मधमाशांच्या त्रासांतून ।।५९।।
बंकटलाल दु;खी झाला । पाहून त्या माशांला ।
त्यांनी मात्र थोडा केला। प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा ।।६०।।
कांही वेळ गेल्यावरी । तुम्हीच आज्ञा केली खरी ।
मधमाशांस जाया दुरी । तें अवघ्यांनी पाहिलें ।।६१।।
आपुल्या आज्ञेनुसार । मधमाशा झाल्या दूर ।
बंकट म्हणे सोनार। आणवितों कांटे काढावया ।।६२।।
कां कीं मधमाशांचे काटे । रुतले असतील मोठें ।
ते लपून बसती बेटे । स्वामी अवघ्या शरीरांत ।।६३।।
म्हणून ते काढावया । सोनार आणवितो ये ठायां ।
आपण म्हणालात वाया । हा त्रास घेऊ नका ।।६४।।
योगशास्त्र येतें मला । मी योगबलें कांटयाला ।
बाहेर काढितो त्याजला । सोनार कशास पाहिजे ।।६५।।
ऐसें वदून कुंभक केला । तेधवा कीं आपण भला ।
तेणें बाहेर कांटयाला । पडणें अवश्य झाले की ।।६६।।
हे कौतुक सर्वांनी । पाहिलें त्या ठिकाणी ।
जो तो मनुष्य जोडी पाणी । स्वामी आपणांकारणे ।।६७।।
आपण म्हणाला त्यावर । हे जीवांनो घटकाभर ।
बैसा या वृक्षावर । आतां कोणास चावूं नका ।।६८।।
संकल्प बंकटलालाचा । पूर्ण करणें आहे साचा ।
सोहळा मका सेवण्याचा । निर्विघ्न त्याचा होऊं द्या ।।६९।।
पहा माशा उठतां क्षणी । तुम्ही गेलात पळूनी ।
संकट येतां नाही कोणी । तारिता हे ध्यानी धरा ।।७०।।
लाडू, पेढे खावयास । लोक जमती विशेष ।
परी साह्य संकटास । कोणीही करीना ।।७१।।
हें तत्व ध्यानी धरा । ईश्र्वरासी आपुला करा ।
म्हणजे सफल होय खरा । तुमचा की संसार ।।७२।।
ऐसा उपदेश भक्ताप्रती । साच केलात गुरुमूर्ति ।
एक्या मुखें करुं किती । मी आपुलें वर्णन ।।७३।।
कृष्णाजीचें मळयांत । दांभिक गोसावी आले बहुत ।
जे होते सांगत । शुष्क वेदांत जगाला ।।७४।।
त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी । महंत आणिला वाटेवरी ।
जो जळत्या पलंगावरी । तुम्हांजवळ ना बैसला ।।७५।।
चहूंकडून होता पेटला । तो अग्नी आपण शांत केला ।
तेणें त्या ब्रह्मगिरीला । कौतुक अति वाटले ।।७६।।
सर्व अभिमान सोडून । आपणां तो आला शरण ।
अग्नीचें ते अग्नीपण । चांदण्यापरी केलें तुम्ही ।।७७।।
टाकळीकर हरिदासाचा । घोडा अति द्वाड साचा ।
तुम्ही हरविला तयाचा । द्वाडपणा तो क्षणात ।।७८।।
घोडा आज्ञेंत वागला । तो सर्वांनी पाहिला ।
अशक्य कांही आपणाला । नाही उरलें जगांत ।।७९।।
अडगांव आकोली गांवांत । कावळे शिरतां भंडा-यात ।
आपण पळविले क्षणांत । आज्ञा त्यासी करुन ।।८०।।
अजूनपर्यंत त्या ठायी । कावळा ये ना एकही ।
संत जे वदतील कांही । खोटे होय कोठून ।।८१।।
प्रखर असुनी उन्हाळा । निर्जनशा काननाला ।
ऐन दुपारचे समयाला । कौतुक केले अभिनव ।।८२।।
अकोलीच्या रानांत । सर्व्हे नंबर बावन्नात ।
एका शुष्क गर्दाडाप्रत । बनविली तुम्ही पुष्करिणी ।।८३।।
भक्त आपुला पितांबर । कृपा होती त्याचेवर ।
तयाचाही अधिकार । थोर आपण बनविला ।।८४।।
ज्योतीप्रत मिळाल्या ज्योत । भेद कांही न तेथे उरत ।
खराच पितांबर पुण्यवंत । साक्षात्कारी जाहला ।।८५।।
वठलेल्या आंब्याला । त्यांनी आणविला पाला ।
कोंडोली ग्रामाला । हे कृत्य झालें कीं ।।८६।।
भीमा अमरजा संगमासी । क्षेत्र गाणगापुरासी ।
पर्णे फुटलीं टोणप्यासी । नरसिंह सरस्वती कृपेने ।।८७।।
तेंच कृत्य कोंडोलीतें । करविले पितांबरा हातें ।
आपणची गुरुमुर्ते । हे स्वामी समर्था ।।८८।।
वद्य पक्षांत माघमासी । सोमवतीच्या पर्वासी ।
क्षेत्र ओंकारेश्वरासी । गेले असतां भक्त तुमचें ।।८९।।
तेथे महानदी नर्मदेंत । नौका फुटली अकस्मात ।
पाणी येऊं लागलें आंत । नांव बुडूं लागली ।।९०।।
त्या नौकेंत आपण होतां । म्हणून नर्मदा लावी हातां ।
फुटलेल्या ठायी तत्वतां । ऐसा प्रभाव आपुला हो ।।९१।।
नौका कांठास लाविली । नर्मदेनें आणून भली ।
आपणां वंदून गुप्त झाली । हें बहुतांनी पाहिलें ।।९२।।
त्र्यंबक पुत्र कवराचा । आपुला भक्त होता साचा ।
जो अभ्यास वैद्यकीचा । हैद्राबादी करीत असे ।।९३।।
त्याची कांदा भाकर। आपण केली गोड फार ।
पदार्थ सारूनियां दूर । इतरांनी आणलेले ।। ९४।।
जैसा द्वारकाधीश भगवान । कौरवांचे पक्वान्न ।
सांडूनिया भक्षण । करी विदुर कण्यांचे ।।९५।।
तैसेच आपण केलें । कवराचें अन्न भक्षिलें ।
ख-या भक्तीचें भुकेले । आपण आहा महाराजा ।।९६।।
सवडदचा गंगाभारती । तया फुटली रक्तपिती ।
तो त्रासून जिवाप्रती । आला असतां आपणाकडे ।।९७।।
लोक अवघे तिटकारा । करुं लागलें त्याचा खरा ।
कोणी न देती त्यास थारा । रोगभयें करुन ।।९८।।
त्या गंगाभारतीस । येऊं न देती दर्शनास ।
कोणी आपल्या शेगांवास । ऐसी स्थिती जाहली ।।९९।।
लोक म्हणती तयाप्रत । मिसळू नकोस लोकांत ।
त्रास न द्यावा यत्किंचित् । तूं समर्थाकारणें ।।१००।।
तो गोसावी एकें दिवशी । आला आपल्या दर्शनासी ।
डोई ठेवतां पायांसी । मारिले आपण तयाला ।।१।।
थोबाड झोडिलें दोन्हीं हातें । लाथ मारुन कमरेंते ।
उलथून पाडिला रस्त्याते । थुंकून त्याच्या अंगावरी ।।२।।
बेडका पडतां अंगावर । गंगाभारती हर्षला फार ।
म्हणे आतां होईल दूर । व्याधी माझी नि;संशय ।।३।।
जो बेडका होता पडला । तोच त्यानें मलम केला ।
अवघ्या अंगास लाविला । चोळचोळूनीया  निज हातें ।।४।।
ऐशा रितीं सेवा करित । राहिला गोसावी शेगांवांत ।
तयाच्या महारोगाप्रत । आपण कीं हो निवटिलें ।।५।।
तुमच्या कृपेचिया पुढें । औषध काय बापुडे ।
अमृत तेंही फिके पडे । ऐसा महिमा अगाध ।।६।।
कोणतेंही संकट जरी । येऊन पडले भक्तांवरी ।
ते निजकृपेनें करीतां दुरी । आपण साच दयाळा ।।७।।
संकटीं खंडू पाटलाप्रत । आपण देऊन कृपेचा हात ।
न्यायाधिशाचें कचेरींत । निर्दोष त्यासी सोडिलें ।।८।।
बाळकृष्ण रामदासी । होता बाळापूर ग्रामासी ।
त्या माघ वद्य नवमीसी । समर्थदर्शन घडविलें ।।९।।
घटकेंत दिसावा गजानन । घटकेंत सूर्याजीपंत नंदन । घटकेंत भजन तें गणगण।घटकेंत जयजय रघुवीर असे ।।११०।।
तेणें बाळकृष्ण घोटाळला । अखेर ओळखून आपणांला ।
समर्थ म्हणूनी नमस्कार केला । काय लीला वानूं ती ।।११।।
संत अधिकारें समान । मुळीं न तेथे  अधिक न्यून ।
जैसें भक्तांचे इच्छी मन । तैशी रुपे दिसती तया ।।१२।।
गणेशदादा खापर्डे । उमरावतीचे गुहस्थबडे ।
कुपादृष्टीने त्यांकडे । पाहिले आपण सर्वदा ।।१३।।
या खापडर्याला व-हाड प्रांती । अनभिषिक्त राजा बोलती ।
राष्ट्रोध्दाराची तळमळ ती । होती खापडर्याकारणें ।।१४।।
कोठे न आले अपयश त्याला। हा तुमच्या कृपेचा महिमा झाला ।
बाळ गंगाधर टिळकाला । तुम्हीच कृपा केलीत ।।१५।।
भगवंतानें अर्जुनाला । भगवद्गीतेचा उपेदश केला ।
ज्या गीतेने जगाला । थक्क करुन सोडिले ।।१६।
पार्थ देवाचा भक्त जरी । राहिला वनवासाभीतरी ।
बारा वर्षे कांतारीं । ऐसें भागवत सांगते ।।१७।।
भगवंताचा वशिला । प्रत्यक्ष असून अर्जुनाला ।
वनवास तो नाही चुकला । तैसेच झाले टिळकांचे ।।१८।।
संतकृपा असून । शिक्षा झाली दारुण ।
ब्रम्ह्मदेशीं नेऊन ।मंडल्याशीं ठेविलें त्या ।।१९।।
श्रोतें त्याच मंडाल्यांत । गितारहस्य केला ग्रंथ ।
जो आबालवृद्वांप्रत । मान्य झाला सारखा ।।१२०।।
कोल्हटकरा हातें भला । आपण होता पाठविला ।
भाकरीच्या प्रसादाला । मुंबईत टिळकाकारणें ।।२१।।
फळ हें त्या प्रसादाचें । गीतारहस्य होय साचें ।
भाष्यकार गीतेचे । हे सहावे झाले की ।।२२।।
पहिले शंकराचार्य गुरुवर । दुसरे रामानुजाचार्य थोर ।   मध्व, वल्लभ त्यानंतर । भाष्यकार जाहलें ।।२३।।
पांचवी ज्ञानेश्वर माऊली । भावार्थदीपिका टिका केली ।
जी मस्तकी धारण केली । अवघ्या मुमुक्षु जनांनी ।।२४।।
ज्ञानेश्र्वरा नंतर । एक दोन टीकाकार ।
झाले परी ना आली सर । त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ।।२५।।
वामनाची यथार्थदीपिका । तैसाच गीतार्णव देखा ।
हेहीं ग्रंथ भाविका । कांही अंशें पटले कीं ।।२६।।
गीतेचा अर्थ कर्मपर । लावी बाळ गंगाधर ।
त्या टिळकांचा अधिकार । वानाया मी समर्थ नसे ।।२७।।
मागील टीका समयानुसार । अवतरल्या या भूमीवर ।
तैसाच आहे प्रकार । या गीतारहस्याचा ।।२८।।
त्या  लोकमान्य टिळकांवरी । आपण कृपा केली खरी ।
म्हणून तयाचा झाला करी । गीतारहस्य महाग्रंथ ।।२९।।
खामगांवी डॉक्टर कवरा । तीर्थ आणि अंगारा ।
आपण नेऊन दिलांत खरा । ब्राह्मणाच्या वेषानें ।।१३०।।
ज्यायोगें व्याधी त्याची । समुळ हरण झाली साची ।
तुम्ही काळजी भक्तांची । अहोरात्र वहातसां ।।३१।।
कन्या हळदी माळयाची । बायजा नामें मुंडगांवची ।
ही तुमच्या कृपे जनीची । समता पावती झालीसे ।।३२।।
वरदहस्त बायजाशिरीं । तुम्ही ठेवितां निर्धारी ।
तिही झाली अधिकारी । केवळ तुमच्या कृपेनें ।।३३।।
मुंडगांवच्या पुंडलीकाला । होता जरी प्लेग झाला ।
तो येता दर्शनाला । व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ।।३४।।
सद्भक्त  बापुन्याप्रती । तुम्ही भेटविता  रुक्मिणीपती ।
नाहीं अशक्य कोणती । गोष्ट आपणांकारणे ।।३५।।
एके वेळी आपणांला । गोपाळ बुटी घेऊन गेला ।
भोसल्याच्या नागपूराला । अती आग्रह करुन ।।३६।।
गोपाळ बुटी श्रीमंत भारी । हजारों पंक्ती त्यांचे घरीं ।
उठूं लागल्या वरचेवरी । केवळ आपल्या प्रित्यर्थ ।।३७।।
इकडे शेगांव सुनें पडलें । प्रेतवत्  दिसूं लागलें ।
मुखीं तेज नाहीं उरलें । मुळींच पाटील मंडळीच्या ।।३८।।
शेगांवीचे पुष्कळ जन । आले नागपुरा जाऊन ।
परि न झालें दर्शन । समर्थांचे कोणाला ।।३९।।
चौक्या पहारे सभोंवार । कडेकोट होते फार ।
समर्थांच्या पायांवर । शीर ठेवणे मुष्कील झालें ।।१४०।।
नागपूराहून आपणाला । आणण्या हरि पाटील निघाला ।
दहा पांच संगतीला । भक्त घेऊन शेगांवचे ।।४१।।
आला सिताबर्डीसी । गोपाळ बुटीच्या सदनाशी ।
तो तेथे दारापाशीं । शिपाई पाहिले दोन चार ।।४२।।
शिपायांनी पाटलाला । जरी होता अटकाव केला ।
परि तो न त्यांनी जुमानिला । बळकट होता म्हणून ।।४३।।
हरि पाटील शिरला आंत । गडबड झाली तेथ बहुत ।
तुम्ही धावून त्याचा हात । धरिलात कीं प्रेमानें ।।४४।।
जैसे वासरासी पाहतां । गाय धावे पुण्यवंता ।
तैसेच तुम्ही समर्था । केलेंत घरी बुटीच्या ।।४५।।
गोपाळ बुटी धांवत आले । हरि पाटला विनविते झाले ।
पाटील माझें ऐकलें । पाहिजे तुम्ही थोडेसें ।।४६।।
भोजनोत्तर समर्थाला । जा घेऊन शेगांवाला ।
तो आहे भक्तीस विकला । शेगांवकरांच्या नि;संशय ।।४७।।
सर्वाचे झाल्या भोजन । आपण निघाला तेथून ।
आशीर्वाद तो देऊन । गोपाळ बुटीच्या कुटूंबाला ।।४८।।
त्या पाटील हरिवरी । कृपा आपुली अत्यंत खरी श्रीकल्याणस्वामीपरी । सेवेस आपुल्या तत्पर जो ।।४९।।
हरि पाटलाकारण । स्वामी तुमचे द्वयचरण ।
हेंच महानिधान । जोडलें  ऐसें वाटतसे ।।१५०।।
धार कल्याणचे रंगनाथ । आले तुम्हां भेटण्याप्रत ।
गुरुराया या शेगांवात । शेगांवचे भाग्य मोठें ।।५१।।
श्रीवासुदेवानंद सरस्वती । जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति ।
ऐशा जगमान्य विभूति । आल्या आपल्या दर्शना ।।५२।।
जरी आपण देह ठेविला । तरी पावतसा भाविकाला ।
याचा अनुभव रतनसाला। आला आहे दयानिधे ।।५३।।
रामचंद्र कृष्णाजी पाटील । भक्त तुमचा प्रेमळ ।
त्याची तुम्ही पुरविली आळ । गोसाव्याच्या रुपानें ।।५४।।
तैसेच  बोरीबंदरावरी । जांजळ जो कां लक्ष्मण हरी ।
त्याला भेट दिली खरी । परमहंसरुपानें ।।५५।।
तुमच्या लिलेच्या तो पार । कोणा न लागे तिळभर ।
मुंगी मेरुमांदार । आक्रमण कैशी करी ।।५६।।
टिटवीच्याने सागर । शोषवेल का साचार ।
दासगणू हा लाचार । आहे सर्व बाजूने ।।५७।।
आपली वर्णण्या लीला । महाकवीच पाहिजे झाला ।
मजसारख्या घुंगुरडयाला । ते साधणे कठीण ।।५८।।
परि जो का असे परिस । तो सुवर्ण करी लोखंडास ।
उरवी न त्याच्या ठायीं दोष । लोहपणाचा येतुला हो ।।५९।।
आपुली लीला कस्तुरी । मम वाणी मृत्तिका खरी ।
परि मान पावेल भूमिवरी । सहवासें या कस्तुरीच्या ।।१६०।।
माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून तुमचे पाहिले चरण ।
आतां न द्यावे लोटून । परत दासगणूला ।।६१।।
सर्वदा सांभाळ माझा करा । दैन्यदुःखातें निवारा ।
भेटवा मशीं शारंगधरा । भक्त बापुन्याच्यापरी ।।६२।।
आपल्या कृपेकरुन । सानंद राहो सदा मन ।
सर्वदा घडो हरिस्मरण । तैसीच संगत सज्जनांची ।।६३।।
अव्याहत वारी पंढरीची । मम करे व्हावी साची ।
आवड सगुण भक्तीची । चित्ता ठायीं असूं द्या ।।६४।।
अंत घडो गोदातीरीं । यावीण आशा नाहीं दुसरी ।
स्मृती राहो जागृत खरी । भजन हरींचें करावया ।।६५।।
भजन करितां मोक्ष घडो । देह गोदातीरीं पडो ।
सद्वत्कांसी स्नेह जडो । दासगणूचा सर्वदा ।।६६।।
मागितले तें मला द्यावे । तैसे लोकांचेही पुरवावे ।
आर्त गुरुवरा मनोभावे । जे या स्तोत्रा पठतील ।।६७।।
या स्तोत्राचा पाठ जेथ । भाव होईल तेथ तेथ ।
तेथें न राहो कदा दुरित । इतुलेही दयाळा ।।६८।।
स्तोत्रपठकां उत्तम गती । तैशी संतती संपत्ती ।
धर्मवासना त्याच्या चित्तीं । ठेवा जागृत निरंतर ।।६९।।
भूतबाधा भानामती । व्हावी न स्तोत्रपठकांप्रती ।
लौकिक त्याचा भूवरती । उत्तरोत्तर वाढवावा ।।१७०।।
हे स्तोत्र ना अमृत । होईल अवघ्या भाविकांप्रत ।
येईल त्याचीप्रचीत । सद्वाव तो ठेविल्या ।।७१।।
मोठयानें करुन गर्जना । बहावें साधू गजानना ।
शेगांवचा योगीराणा । सर्वदा पावो तुम्हातें ।।७२।।
सद्गुरुनें चित्तास । पहा माझ्या करुन वास ।
बोलविलें या स्तोत्रास । तुमच्या हिताकारणे ।।७३।।
यातें असत्य मानल्यास । सुखाचा तो होईल नाश ।
भोगीत रहाल संकटास । वरचेवर अभक्तीनें ।।७४।।
अभक्ती ती दूर करा । गजाननाशी मुळीं न विसरा ।
त्याच्या चरणीं भाव धरा । म्हणजे जन्म सफल होई ।।७५।।
स्तोत्र पठकांची आपदा । निमेलकीं सर्वदा ।
दृढ चित्तीं धरा पदां । गजानन साधूच्या ।।७६।।
वाचें म्हणता गजानन । व्याधी जातील पळून ।
जैसे व्याघ्रा पाहून । कोल्हें लांडगे पळती की ।।७७।।
स्तोत्रपठका भूमीवरी । कोणी न राहील पहा वैरी ।
अखेर मोक्ष त्याच्या करी । येई कीं नि:संशय ।।७८।।
शके अठराशें अडुसष्टांत । श्रीक्षेत्र शेगांवात ।
समाधीपुढे मंडपांत । रचियेलें स्तोत्र पहा ।।७९।।
फाल्गून वद्य एकादशी । मंगळवार होता त्या दिवशीं ।
स्तोत्र गेले कळसासी । गजाननाच्या कृपेने ।।१८०।।
शांति शांति त्रिवार शांति । असो या स्तोत्राप्रती ।
स्वामी गजानन गुरुमुर्ती । आठवा म्हणे दासगणू ।।१८१।।
 
।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।।
 
।। इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त ।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mayureshwar मोरेश्वर मंदिर, मोरगाव : अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती