गणेश मूर्तीवरील रासायनिक रंग आणि निर्माल्य पाण्यात मिसळल्यास पाण्याचे प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा शहरातील निवडक विसर्जनठिकाणी पाण्यातील रासायनिक घटक शोषून पाणी शुध्दीकरण करणाऱ्या वनस्पतींचे तरंगते तराफे (फ्लोटिंग बेड) सोडण्यात येणार आहेत. पुण्यानंतर कोल्हापुरात असा प्रयोग पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर यंदाच्या गणेशोत्सवात केला जाणार आहे.
किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे पर्यावरणविषयक उपक्रम राबवणाऱ्या किर्लोस्कर कंपनीकडून तरंगत्या तराफ्याचा (फ्लोटिंग बेड) प्रयोग करण्यात येणार आहे. दोन वर्षापूर्वी हा प्रयोग पुण्यातील राम नदी जीर्णोध्दार मोहिमेत केला होता. त्यावेळी हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यावर्षी गणेशोत्सवात जनजागृती व्हावी यासाठी असे तरंगते तराफे पंचगंगा नदी, रंकाळा तांबट कमानीजवळ आणि कोटीतीर्थ तलावात सोडण्यात येणार आहेत. शनिवारी या महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते या तरंगत्या तराफ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.