विघ्नेश विघ्नचखण्डननामधेय श्रीशंकरात्मज सुराधिपवन्द्यपाद।
दुर्गामहाव्रतफलाखिल मंगलात्मक विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्व्म॥
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून कृत-चेता युगात तो विनायक होता, तर द्वापार-कलिुगात तो गजानन म्हणून ओळखला जातो. त्याची वाहनेही युगक्रमाने सिंह, मोर आणि उंदीर अशी बदलत गेली. दहा, सहा, चार आणि दोन अशी हातांची संख्याही कमी होत गेली. याच क्रमाने त्याच्या अंगकांतीचा तेजवर्ण, शुक्लवर्ण, रक्तवर्ण आणि ध्रूमवर्ण अशा युगक्रमाने बदलत गेला. सोंड उजव्या बाजूला वळलेल्या सिद्धिविनायकाची पूजा प्रामुख्याने तांत्रिक नियमांनी बद्ध झाली आणि म्हणूनच, की काय सामन्यपणे डाव्या सोंडेचे गणपतीच सर्वत्र जास्त पूजले जाऊ लागले.
गौरीपुत्र विनायक अशा रीतीने सर्वांच्या आराधनेस पात्र झाल्यावर गणपतीच्या निरनिराळ्या स्वरूपाची कल्पना केली गेली असावी. आजही लक्ष्मी गणेश, भुवनेश, हेरंब, पिंगल, हरिद्रा, अर्भक, उच्छिष्ट, सूर्य, अष्टमहिषी वगैरे गणपतीच्या शिल्पूर्तीत आणि धनश्लोकात विविध प्रकार पाहावास मिळतात.
गणपती हा प्रथम अनार्य किंवा एतद्देशीय प्राचीन परंपरेतील देवता असावी आणि त्या ग्रामदेवतेला कालांतराने आर्यांनी आपल्या देवतांमध्ये तिच्यावर वैदिक साज चढवून समाविष्ट करून घेतले असावे, अशीही एक विचारधारा आहे; पण गणपतीची कल्पना नक्की कशी प्रगत होत गेली हे निश्चितपणे सांगता येत नाही. तमिळ भाषेत गणेशाला 'पिळ्ळेयार' हे नाव आहे. 'पिल्लेय' म्हणजे 'हत्तीचे पिल्लू'. हत्तींत्या पिल्लांची देवता समजून पूजा करण्याची पद्धत असावी. आजही आपण गाय-बैल-नाग इत्यादींची पूजा होताना पाहतोच.
वैदिक काळात आर्य सप्तसिंधू प्रदेशात राहात असत. त्यावेळी गणपतीच्या पूजेचा प्रघात मुळीच प्रचलित नव्हता. गणपतीच्या अस्तित्वाचाच आर्यांना पत्ता नसावा. ते पूर्वेकडे जसे सरकत गेले तसा अनार्य लोकांशी त्यांचा संबंध आला, असे काही विद्वानांचे मत आहे. अनार्य शेजार्यांपासून आर्यांनी सर्व गर्दभावर आरूढ होणारी शीतलादेवी, कुत्र्यावर बसणारा भैरव यांच्या प्रमाणेच उंदरावर बसणार्या विनायकाचाही स्वीकार केला.
'विनायक' हा 'ग्रामदैवत' होता. निरनिराळ्या प्रदेशातल्या आणि गावातील विनाकांच्या आख्यायिकांत थोडासाच फरक होता. पुराणातील उल्लेखांवरून हे स्पष्ट होते. अशा या विनायकाचा प्रवेश आर्य देवतांत मागल्या दाराने झाला असे काहींचे मत आहे. पण याला आधार नाही. पुराणांच्या मते युगायुगात त्याच्या रंगरूपात जसा बदल होत गेला. तसा त्याच्या स्वभाव वर्तनातही बदल होत होत आता तर तो सर्वसिद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता बनला आहे. सगळ्या पृथ्वीतलावर गणेश चरित्राची दुसर्या कुठल्याच देवतेच्या चरित्राशी तुलना होऊ शकणार नाही.