हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ करणे, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी शुभ कार्य केले जातात. या दिवशी घरोघरी दारी गुढी उभारली जाते जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्र आरंभ होते.
गुढी पाडवा 2023 पूजा मुहूर्त : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10.52 मिनिटापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 रोजी रात्री 8.20 मिनिटाला समाप्त होईल. उदयतिथीनुसार गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी आहे. पूजा मुहूर्त 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06.29 ते सकाळी 07.39 वाजेपर्यंत आहे.
गुढी पाडवा पूजन मंत्र
प्रातः व्रत संकल्प
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः, अद्य ब्रह्मणो वयसः परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भारतवर्षे अमुकनामसंवत्सरे चैत्रशुक्ल प्रतिपदि अमुकवासरे अमुकगोत्रः अमुकनामाऽहं प्रारभमाणस्य नववर्षस्यास्य प्रथमदिवसे विश्वसृजः श्रीब्रह्मणः प्रसादाय व्रतं करिष्ये।
शोडषोपचार पूजा संकल्प
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः, अद्य ब्रह्मणो वयसः परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भारतवर्षे अमुकनामसंवत्सरे चैत्रशुक्ल प्रतिपदि अमुकवासरे अमुकगोत्रः अमुकनामाऽहं प्रारभमाणस्य नववर्षस्यास्य प्रथमदिवसे विश्वसृजो भगवतः श्रीब्रह्मणः षोडशोपचारैः पूजनं करिष्ये।
पूजा झाल्यावर या मंत्राचा जप करावा
ॐ चतुर्भिर्वदनैः वेदान् चतुरो भावयन् शुभान्।
ब्रह्मा मे जगतां स्रष्टा हृदये शाश्वतं वसेत्।।
गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत
सकाळी स्नान वगैरे झाल्यावर गुढी सजवली जाते.
या दिवशी घरे स्वच्छ करण्याची पद्धत आहे.
शास्त्रानुसार या दिवशी अरुणोदयाच्या वेळी अभ्यंगस्नान अवश्य करावे.
सूर्योदयानंतर लगेच गुढीची पूजा करण्याचा नियम आहे. यामध्ये आणखी विलंब होता कामा नये.
सुंदर रांगोळी काढून घर ताज्या फुलांनी सजवले जाते.
अंघोळ करुन नवीन आणि सुंदर वस्त्र धारण करावे. सामान्यतः मराठी स्त्रिया या दिवशी नऊवारी परिधान करतात आणि पुरुष कुर्ता-पायजमा किंवा धोती-कुर्ता घालतात तसेच डोक्यावर पगडी घालतात.
कुटुंबातील सदस्य हा सण एकत्र साजरा करुन एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
या दिवशी नवीन वर्षाची भविष्यवाणी ऐकण्याची परंपरा देखील आहे.
परंपरेनुसार प्रसाद म्हणून गोड कडुलिंबाची पाने खाऊन या सणाची सुरुवात केली जाते. साधारणपणे या दिवशी गोड कडुलिंबाची पाने, गूळ आणि चिंचेची चटणी तयार केली जाते. असे मानले जाते की ते रक्त शुद्ध करते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. त्याची चवही चटणीप्रमाणेच जीवनही आंबट आणि गोड असल्याचे दिसून येते.
गुढीपाडव्याला श्रीखंड, पुरणपोळी, खीर इत्यादी पदार्थ बनवले जातात.
लोक संध्याकाळी लेझिम नावाचे पारंपारिक नृत्य देखील करतात.