Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं

Gudipadwa
प्रत्येक ऋतूची जशी विविध रुपं आहेत तशी या काळात साजर्‍या होणार्‍या सणांची आणि ते साजर्‍या करण्याची पद्धतीची रुपंही वेगवेगळी आहेत. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलते तशी परंपरा बदलत जाते. रुढी-परंपरा बदलतात अर्थात सणवार जरी एकच असले तरी ते साजरे करण्याची पद्धती मात्र बदलत जातात. साडेतीन मुर्हूर्तापेकी एक आणि मराठी नववर्षारंभ असणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात  विविध पध्दतीने साजरा होतो.
पुढे बघा महाराष्ट्रातील विविध रुपं 
Gudipadwa
पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. सातार्‍यामध्ये बावधनची जत्रा प्रसिध्द आहे. पंचमीला ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाचा रथ निघतो. या रथाला बगाड जोडलेले असतं. होळीपासून जेव्हा हा उत्सव सुरू होतो तेव्हापासून गुढीपाडव्यापर्यंत भैरवनाथाच्या देवळात कोणी नवस करत नाही वा नारळही फोडला जात नाही. पंचमीच्या रथयात्रेनंतर तो रथ तसाच देवळाच्या आवारात ठेवला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी या रथाचे भाग वेगवेगळे काढून ते विहिरीत टाकले जातात अर्थात रथविसर्जन केले जाते. त्यानंतर देवळात पुन्हा नवस करायला आणि नारळ फोडायला सुरुवात होते. 
Gudipadwa
कोल्हापूरमध्येही भल्या पहाटे उठून, आंघोळ करून गुढी उभारली जाते. गुढीला साखरगाठेची माळ, कडुलिंब, फुलांचा हार घातला जातो. गुढीला कच्ची कैरी, गूळ, कडुलिंबाचा पाला, चण्याची डाळ याचा नैवेद्य दाखवला जातो पण हा नैवेद्य केवळ लग्न झालेले स्त्री-पुरुषच खाऊ शकतात तो मुलांना देत नाहीत. दुपारी गुढीला पुरणावरणाचा नैवेद्य दाखवतात. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवली जाते.

खानदेशातल्या गुढीपाडव्याचं वैशिष्ट म्हणजे इथे गुढीपाडव्याच्या दिवशी शेताची पूजा करतात. खरीप हंगामाचा हा शेवटचा काळ असतो. एप्रिलमध्ये विश्रांतीनंतर रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकर्‍याला लागायचं असतं. त्यामुळे येणारा हंगाम चांगला जाऊ दे अशी निसर्गदेवतेला विनंती करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी खास शेतात जाऊन काम करतात. घरामध्ये, गुढीभोवती कडुलिंबाच्या झाडाची कोवळी पानं गुंडाळतात. गुढीला साखरकडं घालतात. 
Gudipadwa
छत्तीसगढ व मध्य प्रदेशाच्या प्रभावामुळे विदर्भात गुढीपाडव्याचे प्रस्थ फार नाही. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात गुढीपाडव्याचं तेवढं प्रस्थ नाही.

विदर्भामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शेताचं पूजन केलं जातं. बुलढाण्याला गुढी उभारल्यावर तिला कडुनिंबाचा मोहोर, आंब्याचा टाळा, साखरेच्या माळा घालतात. आंब्याच्या आणि कडुलिंबाच्या टाळ्याला इथे डगळा म्हणतात. या व्यतिरिक्त काही ठिकाणी गुढीवर साखरकडं घातलं जातं. हे साखरकडं स्थानिक लहान मुलं हातातही घालतात, कारण या ठिकाणी प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळे कधी कधी तहान लागल्यावर साखरेचं हे कडंही खाल्लं जातं.  
Gudipadwa
डहाणूमध्ये गणेशपूजन व पंचांगपूजनाला जास्त महत्त्व दिले जाते. परंतु येथे कडुलिंबाच्या पानांचे काहीही केले जात नाही. कडुलिंबाचे तितकेसे महत्त्व दिसून येत नाही.
Gudipadwa
मराठवाड्यातही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. औरंगाबाद येथे गुढीची पूजा इतर ठिकाणांप्रमाणेच साखरेच्या माळा, फुले, अक्षता, हळदकुंकू याप्रमाणे केली जाते; परंतु गुढीवर जो गडू लावला जातो त्यावर शुभाचे प्रतीक म्हणून डोळे काढतात, जेणेकरून घरादारावर ही शुभदृष्टी राहावी. लातूरच्या गुढीपाडव्याला गुढीला बत्ताशांची माळ, आंब्याचा टाळा, गडू, जरीचा खण आणि फुलांची माळ घातली जाते. या ठिकाणी कडुलिंबाचा मोहोर, आंबा डाळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

का करतात हात जोडून Namaskar