श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवारी ४ जुलै ते सोमवार ६ जुलै या काळात श्रीगुरुपौर्णिमा उत्सव येत आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईआश्रम येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण
डोंगरे यांनी दिली आहे.
कोरोनामुळे १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ४ जुलै ते ६ जुलै याकालावधीत साजरा करण्यात येणारा श्रीगुरुपौर्णिमा उत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याकालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ आणि पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी ४ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५ वाजता श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक, ५.१५ वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०५.३० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ६ वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
उत्सवाच्या मुख्य दिवशी ५ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणूक ०५.२५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ६ वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार ६ जुलै रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपुजा आणि गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १० वाजता गोपालकाला कीर्तन आणि दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाणात रक्ताची उणीव भासत आहे. याकरीता श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने उत्सवाच्या मुख्य दिवशी ५ जुलै रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत श्री साईआश्रम येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच ज्या रक्तदात्यांना प्लाझ्मा या रक्त घटकाचे दान करावयाचे आहे, अशा दात्यांनी आपली नावे श्री साईनाथ रक्तपेढी, शिर्डी येथे नोंदवावी. याकरीता मोबाईल नंबर ८६६९१४०६९३ ०२४२३-२५८५२५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी रक्तदान करणाऱ्या इच्छुक रक्तदात्यांनी आणि संस्थान कर्मचाऱ्यांनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले.