Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवाविषयीचे प्रश्न

Webdunia
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:59 IST)
१) देव कुठे आहे?
 
२) देव काय पाहतो?
 
३) देव काय करतो?
 
४) देव केव्हा हसतो?
 
५) देव केव्हा रडतो?
 
६) देव काय देतो?
 
७) देव काय खातो?
 
१) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.
तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे || - नामदेव…
विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला || - ज्ञानदेव…
 
२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.
‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ | - श्रीशंकराचार्य…
त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.
 
३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.
घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||
भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी || - तुकाराम…
तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा || तुकाराम…

४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, "या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे." जीव म्हणतो, "सोहं, तू आणि मी समान." पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?" देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. 
देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ || - तुकाराम…

६) देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.
देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा || - तुकाराम…
दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |
जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग || - तुकाराम…
प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे || - तुकाराम…
देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.
माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |
ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ || - निळोबा…
यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.
“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |
एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”
 
भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा  आनंदाने ग्रहण करतो... अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!
 
देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.
 
॥जय सद्गुरु॥
*जय जय रघुवीर समर्थ*

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments