Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय १९

Kartik Mahatmya adhyay 19
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (13:36 IST)
पृथु प्रश्न करतात - नारदा ! तुम्ही इतिहासासह अतिआश्चर्यकारक तुळशीचें माहात्म्य मला सांगितलें, तें मीं ऐकिलें ॥१॥
कार्तिकव्रत करणाराचें मोठें पुण्यफल सांगितलें; तें शुभकारक व्रत कोणीं आचरण केलें तें सांगा ॥२॥
नारद म्हणतात - पूर्वी सह्याद्रीचे प्रदेशांत करवीर नगरांत धर्म जाणणारा कोणी धर्मदत्त नांवाचा एक ब्राह्मण राहात होता ॥३॥
तो नेहमी विष्णूव्रत करणारा, विष्णूचे पूजेंत निमग्न असणारा, द्वादशाक्षरी वासुदेव मंत्राचा जप करणारा व अतिथीचा आदर करणारा असा होता ॥४॥
एकदां कार्तिकमासीं पहाटे प्रहररात्रीं हरिजागराकरितां विष्णुमंदिरास निघाला ॥५॥
हरीच्या पूजेचें साहित्य घेऊन जात असतां वाटेंत एक भयंकर राक्षसी येत आहे अशी पाहिली ॥६॥
तिच्या दाढा वांकड्या होत्या, जीभ लळलळ करीत होती, डोळे खोल गेलेले लाल होते, नग्न असून रोडकी, लांब ओठाची व घर्घर शब्द करणारी अशी ती होती ॥७॥
त्या राक्षसीला पाहून धर्मदत्त भ्याला. त्याचे हातपाय लटलट कांपूं लागले व भीतीनें हरीचें नांव घेऊन पूजेचें साहित्य पाण्याचे भांडें वगैरे सर्व त्यानें तिला मारलें ॥८॥
तें हरीचें नामस्मरण करुन तुळसीसह उदक तिचे अंगावर फेकलें; त्यामुळें तिचें सर्व पाप नाश पावलें ॥९॥
तेव्हां तिला पूर्वजन्मींच्या पापकर्माचें स्मरण झालें व त्या ब्राह्मणास साष्टांग नमस्कार घालून आपली पूर्वदशा सांगूं लागली ॥१०॥
कलहा म्हणत्ये - पूर्वीच्या कर्माच्या परिणामानें मला ही दशा प्राप्त झाली आहे. तर हे ब्राह्मणा ! मी पुनः उत्तम गतीला कशी जाईन ? ॥११॥
नारद म्हणालेः-- तिनें आपणाला नमस्कार केला व आपलें कर्म सांगितलें. तेव्हां त्या ब्राह्मणाला मोठा चमत्कार वाटून तो ब्राह्मण त्या राक्षसीला प्रश्न करितो ॥१२॥
धर्मदत्त म्हणतोः-- कोणत्या कर्मानें ही दशा तुला प्राप्त झाली ? तूं कोठली व कोण ? तुझें शील काय तें सर्व मला सांग ॥१३॥
कलहा म्हणाली - हे ब्राह्मणा ! सौराष्ट्र नगरामध्यें भिक्षु नांवाचा एक ब्राह्मण होता, त्याची मी बायको. माझे नांव कलहा. मी मोठी निष्ठुर होतें ॥१४॥
मी कधींही पतीला गोड बोलून देखील समाधान दिलें नाही, व त्यानें सांगितलें तरी त्याला मिष्टान्न करुन घातलें नाहीं ॥१५॥
मी मोठी भांडखोर असल्यामुळे तो मला भिऊन नेहमीं उदास होता. तेव्हां मला कंटाळून दुसरी बायको करावी असा त्यानें बेत केला ॥१६॥
तेव्हां मीं विष खाऊन प्राणत्याग केला. मग यमाचे दूतांनीं मला बांधून मारीत मारीत यमापुढें नेलें ॥१७॥
यमानें मला पाहतांच चित्रगुप्ताला विचारिले. यम म्हणालाः-- चित्रगुप्ता ! हिनें काय काय कर्मे केलीं आहेत तीं पहा. त्या कर्मांप्रमाणें शुभ किंवा अशुभ फळ तिला मिळेल ॥१८॥
कलहा म्हणते - तेव्हां चित्रगुप्त माझी निर्भर्त्सना करुन म्हणाला ॥१९॥
चित्रगुप्त म्हणालाः-- हिनें शुभ कर्म तर कांहींच केलें नाही. नवर्‍याला न देतां आपणच गोड गोड अन्न खात होती ॥२०॥
म्हणून वडवागुलीच्या नीच योनीमध्यें आपली विष्ठा खाणारी ही व्हावी ही नवर्‍याचा द्वेष करुन नित्य त्याशीं भांडत होती ॥२१॥
म्हणून विष्ठा खाणारी डुकरयोनी तिला प्राप्त व्हावी स्वयंपाकाच्या भांड्यांत जेवीत होती व नवर्‍याला टाकून एकटीच भोजन करीत होती ॥२२॥
म्हणून आपलींच पिलें खाणारी अशी मांजरीची योनी हिला प्राप्त व्हावी पतीच्या उद्देशानें तिनें आत्मघात केला ॥२३॥
म्हणून अति निंद्य अशा पिशाचयोनींत तिनें राहावें, म्हणून तिला यमदूतांनीं निर्जल मारवाड देशांत सोडावी ॥२४॥
तेथें तिनें बहुत काळ पिशाच योनींत राहून नंतर तीन प्रकारचे अशुभ वडवागुळ, मांजर व डुकर असे जन्म घ्यावे ॥२५॥
कलहा म्हणालीः-- ती मी पांचशें वर्षे या प्रेतदेहामध्यें आहें; आपल्या कर्मानें भूक व तहान यांचे पीडेनें फार दुःखित अशी आहें ॥२६॥
भूक व तहान यांचे पीडेमुळें मी एका वाण्याच्या शरिरांत प्रवेश केला व दक्षिण देशांत कृष्णावेण्यांच्या संगमाला आलें ॥२७॥
कृष्णावेणीच्या तीराला येतें इतक्यांत शिव व विष्णु यांच्या दूतांनी मला त्या वाण्याच्या शरिरांतून जबरदस्तीनें ओढून लांब टाकिलें ॥२८॥
तेव्हां मी क्षुधेनें पीडित असतां ब्राह्मणा मला तुझें दर्शन झालें. तुझ्या हातांतील तुळशीच्या उदकानें माझें सर्व पाप गेलें ॥२९॥
हे विप्रेंद्रा ! आतां काय करणें तें कर. म्हणजे पुढें भोगाव्या लागणार्‍या तीन योनि व हा प्रेतदेह यांपासून माझी मुक्तता होईल ॥३०॥
तो श्रेष्ठ ब्राह्मण असें तें कलहेचें भाषण ऐकून तिच्या कर्मपाकाच्या फलानें तिला प्राप्त झालेलें दुःख पाहून विस्मित व दुःखित झाला. तिची दीन स्थिति पाहून कृपेनें दया आली. त्यामुळें चित्तवृत्ति चंचळ झाल्याकारणानें बराच वेळ विचार करुन तो ब्राह्मण दुःखित अंतः करणानें बोलूं लागला ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय १८