Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पहिला

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पहिला
, बुधवार, 19 जून 2024 (11:01 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
कोणे एके दिवसीं ॥ शौनकादिक सर्व ऋषी ॥ नैमिष्यारण्य क्षेत्रवासी ॥ पुसते झाले गोकर्ण ऋषीतें ॥१॥
गौकर्णौवाच ॥
आहो स्वामी गोकर्ण ऋषी ॥ तुह्मी सर्वामध्यें श्रेष्ठ ऋषी ॥ कथा ठाऊक सर्व तुम्हासी ॥ म्हणोनी शिवकथा सांगिजे ॥२॥
जे कथा पुण्यपावण ॥ ऐकतां पातकेंजाती जळून ॥ ते सांगाजी आम्हालागून ॥ कोकिला महात्म कैसें तें ॥३॥
सर्व ऋषीचें वाक्य ऐकून ॥ कथा सांगता झाला गोकर्ण ॥ ऐका तुम्ही चित्त देऊन ॥ सांगतो मी निजभावें ॥४॥
पूर्वी द्वापारयुगाचे ठाई ॥ पांडव गेले वनवासा पाई ॥ वनवास भोगिता श्रमले देहीं ॥ मग स्मरण करीत श्रीकृष्णाचे ॥५॥
द्रौपादीसहित पंडूसुत ॥ श्रीकृष्णाचें स्मरण करीत ॥ हे भगवंता धांव त्वरित ॥ कां विसरलासी आह्मातें ॥६॥
तूं आमुचा पक्षपाती ॥ आम्ही पिडलों बहुत विपत्ती ॥ आतां येईगा लक्ष्मीपती ॥ निर्विघ्न करी कां आम्हातें ॥७॥
ऐसे भक्त स्मरण करितां ॥ देव द्वारकेस होता ॥ करुणा शब्द कर्णी पडतां ॥ दुश्चित झाला भगवंत ॥८॥
पांडव असती वनांत ॥ देव द्वारकेहून धांवत ॥ वायुहून वेगें बहुत ॥ क्षणार्धे पातला भक्तांजवळी ॥९॥
मग पांडवें देखिलें श्रीकृष्णातें ॥ चरणावर मस्तक झाले ठेविते ॥ पांचीजणें द्रौपदी सहिते ॥ नमस्कारिला भगवंत ॥१०॥
नेत्री अश्रुधारा सुटती ॥ तेणें पादप्रक्षालनें होती ॥ सर्वांचे ह्र्दय उलो पाहती ॥ कदा न सोडिती पायातें ॥११॥
तेव्हा भगवंते उचलोनी ॥ ह्र्दयी धरीलें तत्क्षणीं ॥ मी तुमच्याअ सन्निध असुनी ॥ काय भीति तुह्मातें ॥१२॥
मी असतों द्वारकेंत ॥ परी मज सदा भक्त ह्र्दयांत ॥ भक्त माझे स्मरणीं रत ॥ मी सर्वकाळ असें तेथें ॥१३॥
ऐसें वाक्य ऐकून भगवंताचे ॥ समाधान झाले पंडुसुताचें ॥ मग द्रौपदी सहित कायावाचे ॥ बोलते झाले श्रीकृष्णासी ॥१४॥
श्रीकृष्णा तूं आमुचे पाठीसी ॥ आम्हीं कष्टी सदा वनवासी ॥ आतां हे कष्ट निवारी ह्र्षीकेशी ॥ फार श्रमीं झालो भववंता ॥१५॥
इतुकें वचन ऐकोन धरमाचें ॥ हरी म्हणे वचन ऐका माझें ॥ द्रौपदी हातीं वृत्त कोकिळेचे ॥ करितां सुख पावाल ॥१६॥
तें वृत्त आहे परम श्रेष्ठ ॥ स्त्रियानें करावें एकनिष्ठ ॥ हें वृत्त सर्वव्रतांत श्रेष्ठ ॥ करितां सुख सौभाग्यादि पावती ॥१७॥
कोकिला व्रतें करुन ॥ स्त्रिया होती पुत्रपावन ॥ पौत्र आणि धनसंपदा जाण ॥ भ्रतार पावती अक्षयीं ॥१८॥
जन्मजन्मांतराचे ठाई ॥ दरिद्र आणि वैधव्य नाहीं ॥ सुख सौभाग्य या देहीं ॥ भोगतील सर्वकाळ ॥१९॥
दु:ख दरिद्र जाय पळून ॥ वैधव्याचें होय निरसन ॥ अंती पावती कैलास भुवन ॥ शिवासन्निध बैसती ॥२०॥
शत्रुचा होय नि:पात ॥ मग होईल राज्य प्राप्त ॥ मग सहजची कष्टरहित ॥ व्हाल तुम्ही सर्वही ॥२१॥
तंअ धर्म पुसे कृष्णालागून ॥ स्वामी सांगा हो कृपाकरुन ॥ कोन मास कोण तिथी कोण आयन ॥ हे सांगा आम्हांसी ॥२२॥
वाक्य ऐकोनी धर्माचें ॥ मग अख्यान सांगे व्रताचे ॥ दोन आषाढ येतील नेमाचे ॥ प्रथम आषाढ तो मळमास ॥२३॥
द्वितीय आषाढ तो शुध्द जाण ॥ त्याच्या पौर्णिमेपासून ॥ संध्याकाळी स्थापना करुन ॥ करावें पूजन कोकिलेचें ॥२४॥
कोकिल तो शिवरुप ॥ कोकिळा ते पार्वती स्वरुप ॥ उमा शिव एकरुप ॥ जाणिजे कोकिळातें ॥२५॥
रुद्रश्रापें करुन ॥ पार्वती कोकिळा होऊन ॥ दक्षयार्गी देह होमून ॥ झाली कोकिला सर्वस्वें ॥२६॥
ऐकोनी वचन कृष्णाचें ॥ संदेहयुक्त मन झाले धर्माचें ॥ मग निवारण संदेहचे ॥ करिता झाला कृष्णनाथ ॥२७॥
मग धर्म पुसे देवास ॥ शंकरे का श्रापिले पार्वतीस ॥ हें सांगीजे आह्मांस ॥ कैसी कथा दक्षयज्ञाची ॥२८॥
मग बोले श्रीकृष्णनाथ ॥ इंद्रादि देव समस्त ॥ गंधर्व किन्नर अप्सरासहित ॥ ऋषी समस्त पैं आले ॥२९॥
हे सर्व देव मिळोनी ॥ कैलासा शिवदर्शना लागूनी ॥ सर्वही आले आदिकरुनी ॥ जाते झाले कैलासासी ॥३०॥
स्कंदादिग्ण समुदाय ॥ नंदी आणि सर्व शिव प्रिय ॥ महादेव पार्वती आपल्या वैभवे ॥ मध्यस्थानी बैसलेसे ॥३१॥
मग सर्व देव मिळून ॥ शिवचरणास लागून ॥ शिवाची स्तुती करुन ॥ नमस्कार करिते झाले ॥३२॥
मग शिव होवोनी हर्ष युक्त ॥ सर्व देव बैसवीत ॥ ऋषी यक्ष गंधर्व सिध्दासहित ॥ अनुक्रमें बैसविलें ॥३३॥
मग ते समयीं अप्सरा येउनी ॥ नृत्य करिती तेक्षणीं ॥ गंधर्व गायन कला करुनी ॥ शिवालागी तोषविती ॥३४॥
ऐसी सभा हर्षयुक्त ॥ तो तेथें दक्ष आला अकस्मात ॥ देवॠषी सहित ॥ उत्थापन दिधलें तयासी ॥३५॥
सर्व देव भेटती दक्षाते ॥ ऋषी गंधर्व नागसहित ॥ दक्षासी मान झाले देत ॥ सर्व देव मिळोनी ॥३६॥
तंव दक्ष अवलोकी सर्वाते ॥ न उठतां देखें शंकरातें ॥ कोपें करुनी ह्र्दय भरीतें ॥ झाला संतप्त ते काळीं ॥३७॥
मग त्या शिव सभेंत ॥ दक्ष प्रजापती न बैसत ॥ आपुल्या नगराप्रती येत ॥ क्रोधयुक्त ते काळीं ॥३८॥
तेव्हां दक्ष अंत:करणीं खेद करी ॥ एकांती बैसोनी विचार करी ॥ मग ह्र्दयी अहंकार धरी ॥ यज्ञविभाग व देऊ शिवातें ॥३९॥
ऐसा विचार करुन ॥ सर्व ऋषीतें बोलावून ॥ मी सांगतों तुह्मालागून ॥ विष्णुप्रीत्यर्थ यज्ञ करावा ॥४०॥
शिवाचा जेणें होईल अपमान ॥ ऐसा करावा महायज्ञ ॥ जेणें सर्व देव होती प्रसन्न ॥ एक शंकरावांचूनी ॥४१॥
मग ते सर्व विप्र मिळून ॥ दक्ष आज्ञेकरुन ॥ महायज्ञालागून ॥ आरंभ करीते झाले ॥ ४२॥
पुढील अध्याय़ीं कथन ॥ दाक्षायणी जाईल यज्ञालागून ॥ तेथें आपला देह जाळून ॥ कोकीला स्वरुप होईल ॥४३॥
ती कथा अति उत्तम ॥ विरभद्रा हाती दक्षामरण ॥ ते सर्वासी अगमागम ॥ श्रवणमात्रे कळो येईल ॥४४॥
आषाढी पौर्णिमेपासून ॥ श्रावणी पौर्णिमापर्यंत जाण ॥ स्नानदान नित्य करुन ॥ पूजन कोकिळाचे करावें ॥४५॥
आम्रवृक्ष समीप लाऊन ॥ त्यांत कोकिळा बैसवोन ॥ नित्य हवीष्य अन्नभक्षून ॥ नित्य भोजन एक भुक्त ॥४६॥
भूमीशयन करुन ॥ ब्रह्मचर्यव्रत आचरोन ॥ ब्रह्मार्पण पूजा करुन ॥ कथा श्रवण करावी ॥४७॥
इति  श्रीकोकिलामहात्मे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ श्रीकृष्णयुधिष्ठिरसंवादे ॥
प्रथमोऽध्याय गोडहा ॥  ओंव्या ॥४७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥धृ॥  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टिटवाळा येथील महागणपती