Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघुभागवत - अध्याय १२ वा

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:44 IST)
आतां परिसा सावधान । जरासंधाचें आख्यान ।
ऐकतां पावाल समाधान । विचित्र कथा तयाची ॥१॥
मगध देशींचा नृपती । बृहद्रथ नामें विख्यात जगतीं ।
जरासंधाची उत्पत्ती । झाली तयापासुनी ॥२॥
काशीश्वराच्या जावळ्या कुमरी । गुणसंपन्न चतुर सुंदरी ।
बृहद्रथरायें स्वयंवरीं । जिकूंनि वरिलें तयातें ॥३॥
रायासी होतें सौख्य संपूर्ण । परी नव्हतें पुत्रसंतान ।
म्हणूनि तेणें होऊनि उव्दिग्र । आरंभिले तप वनी ॥४॥
तेथें चंडकौशिक ऋषी । ब्रह्मनिष्ठ तपोराशी ।
त्याच्या दर्शनें रायासी । परमानंद जाहला ॥५॥
धरिले ऋषीचे चरण । म्हणे मी दीन शरण ।
करितों येथें तपाचरण । पुत्रप्राप्तिनिमित्तें ॥६॥
तरी होऊनि कृपावंत । आशीर्वचनें माझे हेत ।
पुरवावया तुम्ही समर्थ । मज देवचि भेटलां ॥७॥
देखूनि रायाचा भाव । ऋषि बोले तुझे सर्व ।
मनोरथ पुरवील देव । चिंता कांहीं नसावी ॥८॥
तंव तेथें अवचित । रसभरित घमघमीत ।
पक फळ पडलें तेंचि देत । ऋषि तत्काळ रायातें ॥९॥
आणि म्हणें हें भार्येसी । देऊनि जरी भक्षविसी ।
तरी निश्चयें पावसी । तिजपासोनि सुत एक ॥१०॥
घेऊनि ऋषीचा निरोप । गृहीं सानंद परते नृप ।
म्हणे माझें सत्य तप । यास्तव फळ पावलों ॥११॥
असों तें फळ ज्येष्ठ भार्येसी । रायें दिधलें तंव कनिष्ठेसी ।
कोप येऊनि म्हणे रायासी । द्यावें फळ मजलागीं ॥१२॥
छेदावया कलहाचें मूळ । अर्धार्ध उभें चिरुनि फळ ।
समभागें दिधलें तत्काळ । रायें  उभय स्त्रियांतें ॥१३॥
काहीं काळ लोटल्यावरी । ऋषीच्या वरदानापरी ।
बृहद्रथाच्या उभय नारी । गर्भवती राहिल्या ॥१४॥
यथाकाळीं सुरक्षित । एक्याचि समयीं झाल्या प्रसूत ।
परी वर्तलें अद्भुत । बाळें अर्धाग उपजलीं ॥१५॥
एक हस्त एक चरण । अर्ध शीर्ष अर्ध घ्राण ।
अर्ध उदर एक नयन । ऐसें दृश्य विचित्र ॥१६॥
विपरीत नसावें मंदिरीं । म्हणूनि तत्काळ दासीच्या करीं ।
ठेवविलीं चव्हाठयावरीं । देहशकलें पुत्राचीं ॥१७॥
तेव्हां नृप आणि युवती । परम दु:ख मानिती ।
अनुतापें पोळलीं चित्तीं । फळ चिरिलें म्हणूनि ॥१८॥
त्याचि रात्रीं तेथें एक । आली राक्षसी जरा नामक ।
तियेनें सांधिलीं सकौतुक । शकलें एकत्र दोन्हीही ॥१९॥
जेथल्या तेथें सर्व । सांधिले तिनें अवयव ।
तेव्हां देह बनला अपूर्व । रुदन करुं लागला ॥२०॥
मग त्यातें जरा राक्षसी । नेऊं पाहे स्वगृहासी ।
परी तें पुष्ट बाळ तियेसी । प्रयत्नेंही उचलेना ॥२१॥
बाळाचें घोर आक्रंदन । बृहद्रथें करितां श्रवण ।
भार्यांसह तेथ जाऊन । निजसुत गृहीं आणिला ॥२२॥
जरेनें सांधिली मूर्ती । म्हणूनि जरासंध ऐसी ख्याती ।
झाली त्याची सर्वत्र जगतीं । शूर क्रूर वीर तो ॥२३॥
ऐशी जरासंधाची उत्पत्ती । घडूनि आली अद्भुत रीतीं ।
आतां कैसा त्याचा भीमाहातीं । शेवट झाला तें ऐका ॥२४॥
बृहद्रथ होतां वृध्द । सिंहासनीं बैसें जरासंध ।
ऐश्वर्यमदें सदा धुंद । वाहे गर्व बळाचा ॥२५॥
थोर त्याचा प्रताप । युध्दीं जिंकुनि अनेक नृप ।
बंदिस्थ करुनि साक्षेप । दृष्टिसमीप ठेविले ॥२६॥
ऐसा तो दुष्टमती । शौर्यासि त्याच्या नाहीं मिती ।
समस्त राजे भयें कांपती । ऐसा धाक तयाचा ॥२७॥
त्रासले बंदिस्थ भूप । श्रीकृष्णासी धाडिला निरोप ।
देवा होऊनि सकृप । मुक्त आम्हां करावें ॥२८॥
हेंचि कार्य बहुत दिन । चिंतीत होता यदुनंदन ।
म्हणूनि केलें तेणें गमन । धर्माकडे गजपुरीं ॥२९॥
रायें देखूनि श्रीकृष्णमूर्ती । संतोषला परम चित्तीं ।
प्रेमादरें धरुनि हातीं । सुखामनीं बैसवी ॥३०॥
धर्म लागूनि श्रीकृष्णपायीं । म्हणे योजिलें आम्ही हृदयीं ।
राजसूय यज्ञ या समयीं । विधिपूर्वक करावा ॥३१॥
तेव्हां कृष्ण वदे धर्मासी । जरासंधे बंदिवासीं ।
नृप ठेविले , आधीं त्यांसी । मुक्त केलें पाहिजे ॥३२॥
त्या कार्यासी तव बंधु दोघे । भीमार्जुन देई मज संगें ।
कार्य संपादूनि वेगें । येऊं आम्ही मागुती ॥३३॥
धर्म म्हणे देवा निरंतर । तुझा तोचि आमुचा विचार ।
जें कां असेल श्रेयस्कर । तेंचि आम्हां तूं वदसी ॥३४॥
ऐकूनि धर्माचें वचन । घेऊनि सवें भींमार्जुन ।
कृष्ण चालला, मार्गीं शकुन । विजय सूचक देखिले ॥३५॥
जरासंधासमीप त्वेषें ।  तिघेही पातले विप्रवेषें ।
श्रीकृष्ण म्हणे कार्याच्या मिषें । त्रिमूर्ति आलों तुजपाशी ॥३६॥
तेव्हां येरु तयांसी सादर । बोलिला ऐसें प्रत्युत्तर ।
स्वीकारुनि माझे पूजोपचार । इष्ट घ्यावें मागोनी ॥३७॥
तेव्हां वासुदेव म्हणे कांहीं । आतिथ्य येथें रुचत नाहीं ।
कीं तूं अससी स्वजनद्रोही । पापमूर्ति केवळ ॥३८॥
दावावया निज शौर्यबळ । बंदिस्थ केले बहुत भूपाळ ।
उलट करिसी त्यांचा छळ । ऐसें आम्हीं ऐकितों ॥३९॥
हें कर्म तुझें अन्यायमूलक । निश्चयें असे संतापजनक ।
म्हणूनि नृप सकळिक । बंधमुक्त करावे ॥४०॥
यावरी बोले जरासंध । म्यां जिंकिले राजे करोनि युध्द ।
यामाजीं काय अपराध । केला तुमचा कळेना ॥४१॥
मजकडूनि तिलप्राय । घडला नसतां अन्याय ।
तुमचें भाषण अप्रिय । कैसें रुचेल मजलागीं ॥४२॥
तैशांत म्हणवितां ब्राह्मण । आणि बोलतां राजकारण ।
म्हणूनि तुमचें अंत:करण । कपटमय मज दिसे ॥४३॥
तरी सत्य तें सांगा स्पष्ट । सत्य बोलतां कायसे कष्ट ।
विदित होतां हेतु इष्ट । पुरवीन तुमचे क्षणार्धे ॥४४॥
तेव्हां कृष्ण म्हणे मी वासुदेव । हे भीमार्जुन दोघे पांडव ।
हरावया तुझा गर्व । आम्ही त्रिवर्ग पातलों ॥४५॥
तरी तुजसंगे प्रथम । बाहुयुध्द करील भीम ।
शस्त्रास्त्रावीण संग्राम । झाला येथें पाहिजे ॥४६॥
जरासंध म्हणे सत्य सत्य । बोलतां तैसें करुं अगत्य ।
आम्हां क्षत्रियांसी नित्य । युध्दकृत्य नेमिलें ॥४७॥
भीम आणि मागध । दोघेही वीर प्रसिध्द ।
शौर्य धैर्य बळ अगाध । उभयां अंगीं सारखें ॥४८॥
जैसे गज मदोन्मत्त ।तैसे ते मल्ल प्रमत्त ।
हस्तासी लावूनि हस्त । दंड पिटिती आवेशें ॥४९॥
होऊनि अत्यंत क्रुध्द । आरंभिले बाहुयुध्द ।
प्राण घ्यावया झाले सिध्द । त्वेषें परस्परांचे ॥५०॥
आरोळ्या देऊनि वारंवार । देती घेती उसने प्रहार ।
तो देखावा भयंकर । पाहूनि जन घाबरले ॥५१॥
बाहूंसी बाहु भिडविती । मुष्टिघातें हृदय ताडिती ।
ऐसे तेरा दिवस झुंजती । अविश्रान्त अहर्निश ॥५२॥
चवदावे दिनीं जरासंध । मृत्यु पावला संपलें युध्द ।
भीमाचा पराक्रम अगाध । स्वर्गीं सुर वर्णिती ॥५३॥
बंदिस्थ राजे करुनि मुक्त। स्वस्व नगरीं धाडिले परत ।
श्रीकृष्णें पुरविला निज हेत । पांडव सहाय्य घेउनी ॥५४॥
विजय संपादूनि यापरी । तिघेही इंद्रप्रस्थ नगरीं ।
परततां धर्मराज करी । राजसूययज्ञातें ॥५५॥
यथासंग होतां अनुष्ठान । धर्मे केला भीष्मासि प्रश्न ।
सभेसी अग्रपूजेचा मान । कवणालागीं अर्पावा ॥५६॥
तेव्हां वदे गंगानंदन । जो आनंदघन ज्ञानसंपन्न ।
धर्मानीतीचें निधान । तो श्रीकृष्ण पूजावा ॥५७॥
त्यापरी कृष्णासी पूजिलें प्रथम । तें कोणीही न मानी विषम ।
परी शिशुपाल भूप अधम । सभेंत सक्रोध बोलला ॥५८॥
तो म्हणे अगा धर्मराजा । त्वां कृष्णाची केली अग्रपूजा ।
हा अक्षम्य अपराध तूझा । असे जाण निश्चयें ॥५९॥
द्रोण कर्ण दुर्योधन । इत्यादि थोरांचा हा अपमान ।
मज न होय मुळीं सहन । प्रमाद कैसा त्वां केला ॥६०॥
भीष्म झाला अति वृध्द । मति चळली बोले विरुध्द ।
ऐशाचा घेऊनि बोध । निंद्य कर्म तूं केलें ॥६१॥
त्यजूनि सारे क्षत्रिय वीर । यदुवंशासी कुलांगार ।
तो कृष्ण येथें अग्रेसर । झाला; आश्चर्य वाटतें ॥६२॥
करुनि सदा चोरी चहाडी । वाढवी जगीं आपुली प्रौढी ।
ऐशा मूढाची कैशी आवडी । जडली तुम्हां कळेना ॥६३॥
कोठें तो गौळयाचा पुत्र । कोठें कौरवकुल पवित्र ।
सारेंचि येथें दिसे विचित्र । दु:सह आम्हां वाटतें ॥६४॥
ऐकूनि कृष्णाची निंदा । भीम चढे परम क्रोधा ।
त्यासी म्हणे नीचा? स्पर्धा । काय करिसी श्रेष्ठांची ॥६५॥
तंव धर्म म्हणे शिशुपाळा । आम्ही पूजिंले कृष्णगोपाळा ।
मानवली हे गोष्टी सकळां । कां तूं एकला बरळसी ॥६६॥
करुनि ऐसा मत्सर व्देष ।न होय न्यून कृष्णाचें यश ।
उलट तुझा होईल नाश । सावध राहीं यासाठीं ॥६७॥
श्रीकृष्ण भूपांचा भूप । नेणासी त्याचा प्रताप ।
आवरीं हें वाग्जल्प । नातरीं मरण पावसी ॥६८॥
म्हणूनि सांडीं कृष्णद्रोह । याही उपरी असेल आग्रह ।
तरी चक्र पाणी नि:सदेह । पुरवील तुझी वासना ॥६९॥
ऐकुनि ऐसें धर्मवचन । चैद्य झाला क्रोधायमान ।
म्हणे याचि क्षणीं घेईन प्राण । त्या दुष्टाचे ये ठायीं ॥७०॥
मग कृष्णासी म्हणे निर्लज्जा? । तूं रुक्मिणी पळविली माझी भाजा ।
तो अद्यापि व्देष माझा । शमला नाहीं लेशही ॥७१॥
चैद्याचे शत अपराध । साहीन ऐसा प्रतिज्ञा शब्द ।
बोलिला होता श्रीमुकुंद । ते सर्व पूर्ण जाहले ॥७२व
ऐसें देखूनि मधुसूदन । फिरवी चक्र सुदर्शन ।
त्या योगें झालें शिरच्छेदन । शिशुपाळाचें तत्क्षणी ॥७३॥
साधुजनांसीं करितां स्पर्धा । भोगावी लागे विपदा ।
विसरुं नये हें तत्व कदा । विचारदक्ष मनुजानें ॥७४॥
आता ऐका सुरस । सादर एक इतिहास ।
होईल तुमचें मानस । आनंदित त्यायोगें ॥७५॥
सुदामा नामें विप्र एक । ब्रह्मनिष्ठ अलौकिक ।
रुक्मिणीकांत यदुनायक । परम मित्र तयाचा ॥७६॥
सुदामा होता अति दीन । जवळी नव्हतें कांहींच धन ।
किंवा निर्वाहाचे साधन । भिक्षेवीण नसे दुजें ॥७७॥
मोठा कुटुंबापरिवार । पदरीं भार्या मुलें चार ।
म्हणूनि संसाराचा भार । झाला असह्य तयासी ॥७८॥
तरी त्याची समाधानवृत्ती । दारिद्र्याची नाहीं खंती ।
अखंड करावी ईश्वरभक्ती । ऐसा क्रम तयाचा ॥७९॥
भार्या त्याची परम चतुर। परी अखंड चिंतातुर ।
कीं लेंकुरें निरंतर । क्षुधाक्रांत देखुनी ॥८०॥
अपत्यें आणि पती । यासी वाढूनि उरेल अंतीं ।
तितुक्या अन्नें मानूनि तृप्ती । सती संतुष्ट सर्वदा ॥८१॥
त्या योगें वारंवार तीस । घडत होते उपवास ।
तेणें तियेची तनू कृश । झाली बघवेना ॥८२॥
देखुनि बाळें क्षुधित । चित्त होय तिचें व्यथित ।
म्हणे देवा आमुचा अंत । नको पाहूं या वेळीं ॥८३॥
नाहीं हातासी धड बांगडी । नाहीं चोळी धड लुंगडीं ।
कोठुनि कानीं बाळी बुगडी । प्राप्त होय सतीतें ॥८४॥
ऐसे दारिद्र्याचे केश परम। बहुत भोगी सुदाम ।
आतां कृपा करील पुरुषोत्तम । कैशी त्यांजवरी तें ऐका ॥८५॥
एकदां पतीसी वदे नारी । मित्र तुमचा कृष्ण मुरारी ।
त्यासी जाणवा कथा सारी । दारिद्रयाची आपुल्या ॥८६॥
सांदीपन गुरुच्या गृहीं । उभयतां होतों सहाध्यायी ।
खेळलों बैसलों एक्या ठायीं । आठवण हें द्यावी ॥८७॥
त्यासी म्हणावें तुज सकल । राज्यभोग ऐश्वर्य विपुल ।
आणि मित्राचे प्राण व्याकुल । होती अन्नावांचुनी ॥८८॥
ऐसे त्याची आपुले कष्ट । मधुरवचनें सांगा स्पष्ट ।
जेणें श्रीकृष्ण होय तुष्ट ।  ऐसें वर्तन असावें ॥८९॥
तेव्हां पत्नीसी  वदे सुदाम । सूचना तुझी असे उत्तम ।
परी माझा मनोधर्म । असे जाण वेगळा ॥९०॥
स्वभाव माझा तापट । मी असें नि:संग निपट ।
मजसीं कोणी करितां कपट । तें संकट मज वाटे ॥९१॥
कृष्ण माझा परम स्रेही । सर्वज्ञ, न्यायी, मनोनिग्रही ।
त्याजकडूनि होणार नाहीं । जरी कांहीं अयुक्त ॥९२॥
तथापि सोडूनि गुरुसदन । आजि झाले बहुत दिन।
नाहीं कुशल वर्तमान । कळलें परस्परांचें ॥९३॥
याकारणें वाटे शंका । भेटूं यदुनायका ।
आग्रह तुझा म्हणूनि कौतुका । पाहूं जाऊनि प्रत्यक्ष ॥९४॥
परी रिक्तहंस्तें भेटावयासी । संकोच वाटे मन्मानसीं ।
वस्तु नसे आपणापासीं । अर्पावया कृष्णातें ॥९५॥
तेव्हां पतीसी वदे कांता । येविषयीं नको चिंता ।
मुष्टिभर पोहे तरी आतां । घेऊनि येत्यें सत्वर ॥९६॥
ऐसें बोलूनि तत्काळ गेली । मुष्टि पोहे घेऊनि आली ।
म्हणे सर्व सिध्दता झाली । त्वरित आतां निघावें ॥९७॥
सांगा माझा नमस्कार । रुक्मिणीबाईस सादर ।
मागूनि घ्यावें लहान थोर । एक चिरगुट मजसाठीं ॥९८॥
सुदाम वदे तीस रोकडे । कां भक्षिसी मनीं मांडे ।
कृष्णदर्शनाचा लाभ घडे । मज ऐसें दिसेना ॥९९॥
कृष्ण व्दारकेचा थोर राजा । तेथें काय पाड माझा ।
कोण पुसेल याचक व्दिजा । राजव्दारीं सांग पैं ॥१००॥
मज वित्ताची नाहीं आस । परी कृष्णदर्शनाचा थोर ध्यास ।
संतुष्ट होईल मानस । देखतां डोळे भरुनियां ॥१०१॥
ऐसें बोलूनि मार्ग धरी । अवकाशें व्दारकापुरीं ।
येऊनि पातला राजव्दारीं । घ्यावया भेट कृष्णाची ॥२॥
तंव त्यासी म्हणे व्दारपाळ । वेष माझा अमंगळ ।
याचका तूं उतावीळ । कोठें जासी वद आधीं ॥३॥
येरू वदे हा तुझा राजा । बाळमित्र आहे माझा ।
म्हणूनि सांगतों, या व्दिजा । न करीं ऐसा प्रतिबंध ॥४॥
हांसूनि बोले व्दररक्षक । मिथ्या भाषण हें नि:शंक ।
नृपमित्र असे काय रंक? । न लावीं कलंक कृष्णासी ॥५॥
ऐसा चालतां संवाद । ऐकिला ओळखीचा शब्द ।
देखावया धावें गोविंद । तव सुदाम उभा असे ॥६॥
त्यासी सानंद धरुनि करीं । सन्मानें नेला मंदिरीं ।
गौरविलें बहुत प्रकारीं । अति आश्चर्य सकलांतें ॥७॥
पाद्यादिक करुनि पूजा । त्यासी म्हणे मित्रा व्दिजा ।
कुशल असे कीं तुझी प्रजा । आणि भार्या सांग पां ॥८॥
गुरुगृह सोडिल्यापाठीं । परस्परां न झाली भेटी ।
बहुत कालें कृपादृष्टी । केली साधो मजवरी ॥९॥
कुशल प्रश्न चार घटी । पुसोनि कृष्ण म्हणे मजसाठीं ।
काय आणिली मित्रा भेटी । सोड गांठी वस्त्राच्या ॥११०॥
तेव्हा सलज्ज बोले सुदाम । सुहृदा ! तूं कैवल्यधाम ।
आणि माझा याचकधर्म । काय आणूं तुजसाठीं ॥११॥
तरी कृष्णाचें मन न राहे । स्वयें वस्त्र उकलोनि पाहे ।
शत ग्रंथी सोडितां पोहे । मुष्टिभर देखिले ॥१२॥
देवें सेविला तो प्रसाद । अमृतापरी त्यास स्वाद ।
भक्षितां होय परमानंद । तो शब्दीं न वर्णवे ॥१३॥
ऐसे गेले दिवस चार । यथेष्ट भोगिला पाहुणचार ।
सुदाम म्हणे मज सत्वर । गृहीं गेलें पाहिजे ॥१४॥
जावयासी अनुमोदन । देता झाला मथुसूदन ।
म्हणे मित्रा द्यावें दर्शन । वारंवार यावरी ॥१५॥
सुदाम नव्हता लोभरत । आला तैसा जाय परत ।
तरी त्याचें प्रशांत चित्त । समाधान अखंड ॥१६॥
परी त्यासी वाटे एक चिंता । काय आणिलें पुसेल कांता ।
मुलें म्हणतील आम्हां ताता । द्यावें खाद्य स्वल्पही ॥१७॥
केवळ  पत्नीच्या आग्रहास्तव । व्दारकेसी सुदाम देव ।
आला होता परी विभव । नाहीं त्या लाभलें ॥१८॥
पशु पत्नी सुत वित्त । ऋणानुबंधे होती प्राप्त ।
तीं मिळतां न मिळतां, किंचित । हर्ष खेद करुं नये ॥१९॥
आतां इकडे चमत्कार । वर्तला तो जाणा सादर ।
श्रीकृष्णें एक सुंदर । सुदामपुरी निर्मिली ॥२०॥
जैशी आपुली व्दारका । किंवा प्रत्यक्ष दुजी लंका ।
तैशी कनकमय अलौकिका । दिव्य नगरी वसविली ॥२१॥
सुदामदेव गृहासमीप । येतां धांवती सेवक अमूप ।
म्हणती या नगरीचे भूप ।आपण असा स्वामिया ॥२२॥
देऊनि सुवेष सभूषण । करुं सांगती परिधान ।
आनंदाश्रूंनीं भरले नयन । समाधान बहू त्यातें ॥२३॥
श्रीकृष्णाचे उपकार । आठवी हृदयीं अपार ।
म्हणे देवा निरंतर । कृपा ऐशीच असावी ॥२४॥
गृहीं पावतांचि त्यातें सती । ओंवाळीत पंचारती ।
आनंदासी नाहीं मिती । उभयतांच्या त्या समयीं ॥२५॥
पांघरुनि शालू भरजरी । रत्नभूषणें नानापरी ।
घालूनि सती अंगावरी । करी आरती पतीतें ॥२६॥
नाथासी वदे ती ललना । या मित्रत्वासी नाहीं तुलना ।
सर्वशक्तिमंत यदुनंदना ।कांहीं नसे अशक्य ॥२७॥
तात्पर्य देखूनि नि:सीम । निजभक्ताचें प्रेम ।
कृपा करी पुरुषोत्तम । तयावरी अखंड ॥२८॥
भागवत ग्रंथ सुरस । भगवद्भक्तांचा इतिहास ।
वाचितां पावेल मानस । परम संतोष निर्धारें ॥२९॥
अन्य ग्रंथांचे अनुवाद । करुनि गात सानंद ।
रामनंदन गोविंद । बाळांसी बोध व्हावया ॥१३०॥
इति श्रीलघुभागवते व्दादशोऽध्याय: ॥१२॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु:॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments