Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघु भागवत अध्याय ४ था

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:01 IST)
अति सर्वत्र वर्जावें । तैसेंचि अति प्रेम नसावें । येविषयीं सादर ऐकावें । चरित्र एक अभिनव ॥१॥
जडभरत नामें नृपाळ । राज्य करुनी बहु काळ । छेदूनि वासना समूळ । गेला अंती तपासी ॥२॥
गंडकी नदीच्या तीरीं । आश्रमामाजीं कांतारीं । वैराग्य पावूनि अंतरीं । ईश्वरभजनीं रंगला ॥३॥
आचरण अति निर्मळ । स्वभाव उदार प्रेमळ । वागणें सदा सरळ । सर्वांभूती सारखे ॥४॥
एकदां नदीसी करिता स्नान । केली तेणें अवलोकन । गर्भिणी मृगी जलपान । करावया पातली ॥५॥
तंव सिंहगर्जना भयंकर । ऐकूनि घाबरे मृगी फार । भयें पळतां तेथूनि सत्वर । गर्भ तीचा गळाला ॥६॥
तीही पावतां पैलीकडे । कूपामाजीं अवचित पडे । इकडे प्रवाही सांपडे । तान्हुलें वत्स हरिणीचें ॥७॥
तें देखूनि अंतर्यामीं । गहिंवरे जडभरत प्रेमी । घेऊनि आला तें स्वाश्रमीं । वत्स कोमल मृगीचें ॥८॥
त्याचें लालन पालन । प्रेमें करी रात्रंदिन । संध्या पूजन भोजन- । समयीं वत्स आठवे ॥९॥
एकदां चुकोनि पाडस । आलें नाही आश्रमास । तेव्हां तयाचे मानस । अति विरस जाहलें ॥१०॥
त्यासी सुचेना मग कांही । विसर पडला देवाठायीं । अंतकाल आला ते समयीं । पाडस आठवे मृगीचें ॥११॥
अंतकाळी जे चिंतावें । जन्मांतरीं तैसेंचि व्हावें । या नियमें त्यासी स्वभावें । जन्म आला हरिणाचा ॥१२॥
पूर्वजन्मीं घडली ईशभक्ती । तेणे आठवे मागील स्थिती । कीं मृगजन्माची यातायाती । प्रेमास्तव जाहली ॥१३॥
पुढें आला ब्राम्हण जन्म । हाही वासनेचा परिणाम । ऐसें उमजूनि सांडिले प्रेम । वस्तुमात्रीं तयानें ॥१४॥
कधीं न बोले कोणासंगें । भ्रमिष्टापरी नित्य वागे । जें जें मिळेल प्रसंगे । निर्वाह करी त्यावरी ॥१५॥
मंदबुद्धि दिसे जड । ह्नणूनि त्यातें जन अखंड । जडभरत नामें उघड । संबोधिती विनोदें ॥१६॥
एकदां रायें केला नवस । पुत्रप्राप्तीची पुरेल आस । तरी देईन बळी मानुष । देवीपुढें निर्धारें ॥१७॥
तेव्हा येऊनि राजदूत । ओढूनि नेला जडभरत । तथापि तेणें मौनव्रत । नाही तेथेंहि सोडिलें ॥१८॥
शिर छेदूनि त्यासी बळी । देणार तंव तेचि काळीं । देवी प्रगटूनि त्यासी सांभाळी । प्राण त्याचे रक्षिले ॥१९॥
ऐसेंचि एकवार आणिक । धरुनि नेती राजसेवक । न्य़ून होता एक वाहक । उचलावया पालखी ॥२०॥
परी नाही पूर्व अभ्यास । ह्मणूनि इतरांसंगे त्यास । चालतां झाले बहुत क्लेश । परी न बोले शब्दही ॥२१॥
हें देखूनि राजा सक्रोध । बोलला त्यासी कटुशब्द । परी त्याचा कांहीच खेद । जडभरतासी असेना ॥२२॥
उलट विनोदें प्रत्युत्तर । देऊं न शके पंडित चतुर । ऐसें दिधलें तैं राजेश्वर । जाणे त्याची योग्यता ॥२३॥
कृतकर्माचे होऊनि क्लेश । खिन्न झालें रायाचें मानस । रायें घेतला मग उपदेश । जडभरतापासुनि ॥२४॥
सदाचरण नामस्मरण । कृष्ण गोविंद हरि नारायण । ऐसें अखंड ईश्वरभजन । राजा करुं लागला ॥२५॥
ईश्वराचे नामस्मरण । कैसेंही घडतां होय कल्याण । येविषयी करा श्रवण । आख्यान अजामिळाचें ॥२६॥
अजामिळ नामें द्विज एक । कपटी भोंदू स्वार्थसाधक । ऐसी त्याची वर्तणूक । दुराचारी सर्वदा ॥२७॥
नवल नव्हे की तयापाशीं । बहुकाळ होती एक दासी । तिजपासूनि तयासी । पुत्र दहा जाहले ॥२८॥
त्यामाजीं कनिष्ठ नारायण । अजामिळाचा जीव कीं प्राण । ह्नणूनि त्याचे मुखी रात्रंदिन । नांव नारायणाचें ॥२९॥
पुढें अजामिळ झाला वृद्ध । तरी देवभक्तीचा नाहीं गंध । कैशांतही नसे आनंद । नारायणावांचुनी ॥३०॥
नारायणाचें बालवय । दृष्टी चुकवूनि दूर जाय । तेव्हां पिता घाबरा होय । हांका मारी सहस्त्रदां ॥३१॥
नारायणा बैस जवळ । नारायणा बोल प्रेमळ । नारायणा किती वेळ । दूर गेलासी बालका ॥३२॥
नारायना माझे प्राण । व्याकुळ होती तुजवीण । नारायणा माझें मरण । पातलें जवळ बैस ये ॥३३॥
किती सांगूं नारायणा । मजसीं बोल मधुर वचना । नारायणा ऐसा क्षणाक्षणां । मुखी उच्चार जाहला ॥३४॥
पुत्राच्या निमित्तें हो कां । नारायणासी मारिता हांका । देवाचें नांव आले मुखा । अंतकाळी अखंड ॥३५॥
याकारणें अजामिळासी । न्यावया अंती वैकुंठासी । विष्णुदूत आले तयांसी । निवारूनि यमदूतीं ॥३६॥
विष्णुदूतांसी बोलले स्पष्ट । अजामिळ महाभ्रष्ट । पाप केले अचाट । कैसा नेतसाम वैकुंठा ॥३७॥
ऐसें उभय दूतांचें भाषण । अजामिळें केलें श्रवण । ऐकूनि झालें हृदय विदीर्ण । पश्चात्तापें पोळला ॥३८॥
पश्चात्तापें झालें शुद्ध मन । अंती घडलें वरी नामस्मरण । ह्मणूनि त्यातें वैकुंठस्थान सहज प्राप्त जाहलें ॥३९॥
न कळता पद अग्नीवरी । पडे तरीही दाह करी । तैसे देवाचे नाव सहज उच्चारी । तरी पुण्य घडे तया ॥४०॥
आतां कोणासी ह्मणावे सद्गुरु । येचविषयीं थोडा विचार करू । सद्गुरु केवळ असे तारुं । भवसागर तरावया ॥४१॥
सद्गुरुवाचूनि तरणोपाय । नाहीं ह्मणूनि त्याचे पाय । धरिल्यावीण नसे सोय नि:संशय हे जाणा ॥४२॥
सद्गुरु ह्नणजे कल्पवृक्ष । सदा असावा निरपेक्ष । शिष्य हिताविषयीं दक्ष । निरंतर असावा ॥४३॥
घरोघरीं गुरु सांप्रत । कैसें हरावें शिष्य वित्त । एतदर्थ त्यांचे सर्व चित्त । नेणती संकट शिष्याचें ॥४४॥
ज्यासी धनादि वस्तूंची चाड । सुखादि विषयांची आवड । तो गुरुसंज्ञेसी अपात्र उघड । त्याची भीड धरुं नका ॥४५॥
जैसा देवगुरु बृहस्पती । तैसेचि गुरु सद्गती । शिष्यासी देऊं शकती । इतर भोंदू जाणावे ॥४६॥
जो लोहाचें करी कनक । तोचि सत्य परीस एक । इतर ते दगड नि:शंक । तोचि न्याय गुरुविषयीं ॥४७॥
जयां आत्मज्ञानाचा स्पर्श । नसूनि इतरां उपदेश । करिती त्यांचा उपहास । होतो, नवल हें नव्हे ॥४८॥
असो सद्गुरुचा थोर महिमा । वर्णूं जातां नाहीं सीमा । गुरु ह्मणजे देवांचा आत्मा । ऐका कथा येविषयीं ॥४९॥
एकदां देवसभेसी बृहस्पती । आले देखूनि सर्व उठती । परी ऐश्वर्यमदें शचीपती । स्वस्थ बैसूनि राहिला ॥५०॥
इंद्रे न दिलें उत्थापन । गुरुसी तो अपमान । झाला नाहीं मुळीं सहन । ह्नणूनि गुप्त गुरु झाले ॥५१॥
बृहस्पती गेलियावरी । इंद्र उमजूनि अंतरीं । झाल्या अपराधाची करी । खंती चित्तीं अपार ॥५२॥
कोणाचाही अपमान । करितां होय अकल्याण । ह्नणूनि दुसर्‍याचें मन । दुखवूं नये कदाही ॥५३॥
गुरुचा केला अपराध । वाटे तयाचा परम खेद । ह्नणूनि करी शक्र शोध । परी वार्ता कळेना ॥५४॥
दैत्यांसी हा समाचार । कळतां झाले हर्षनिर्भर । ह्नणती आतां सकल सुर । दुर्बळ झालें गुरुविणें ॥५५॥
देखूनि ही योग्य संधी । देवांसंगे दैत्य युद्धीं । प्रवर्तले; कीं पुन: कधीं । ऐसी वेळ येईना ॥५६॥
पुढें दैत्य आणि देव । झुंजले त्यांत पराभव । देव पावूनि त्यांचा गर्व । गळाला सर्व क्षणार्धे ॥५७॥
मग विधीसी वृत्त सकळ । जाणवितां ह्नणे हें केवळ । गुरुच्या अवज्ञेचे फळ । तुह्मां आलें भोगणें ॥५८॥
मग विधि ह्नणे त्वष्टाकुमर । जो विश्वरुप, त्याची निरंतर । आज्ञा पाळितां जयजयकार । तुमचा होईल सर्वथा ॥५९॥
मग देव वागतां तदनुसार । संकटें त्यांची झाली दूर । परी कृतापराधाचा विसर । पुरंदरासी होइना ॥६०॥
पुढें गुरुदर्शनासमयीं इंद्र । क्षमा मागतां गुरु दयार्द्र । होऊनि, कृपेचा समुद्र । इंद्रावरे ओतिला ॥६१॥
मुख्य पाहिजे भक्ती । मग संकटीं श्रीपती । धावूनि रक्षी भक्तांप्रती । ऐका कथा येविषयी ॥६२॥
पूर्वी त्रिकूट पर्वतीं । ऋतुमत्‍ नामें वाटिका होती । तियेचा वरुण अधिपती । होता संपन्न वैभवें ॥६३॥
त्या वाटिकेत वृक्ष अपार । पुष्पफलयुक्त मनोहर । तैसेंचि होतें एक सुंदर । सरोवर त्या ठायीं ॥६४॥
त्या उपवनी सकल वृक्षीं । नाना परीचे होते पक्षी । किलकिल शब्दीं प्रातर्निशी । गजरें भरे उपवन तें ॥६५॥
तेथेंचि होतें एक निकट । अरण्य विस्तीर्ण बिकट । तेथें एक गज बळकट । गजेंद्र नामें संचरे ॥६६॥
कदा काळीं वाटिकेमाझारीं । तो स्नानासि येई सरोवरीं । कांतेसह विहार करी । यथेष्ठ जळी स्वछंदे ॥६७॥
एकदां शुंडेने जलसेक । करितां वर्तले अद्भुत एक । येऊनि नक्र भयानक । धरी पाय हत्तीचा ॥६८॥
कठिण फार मगरमिठी । हत्ती पडे महा संकटी । अपार झुंजला मुक्तीसाठीं । प्राण कंठी पातले ॥६९॥
गजेंद्राची शक्ति अचाट । शरीर भव्य बळकट । परी नक्रें धरिला पाय घट्ट । कांही केल्या सुटेना ॥७०॥
गजेंद्र अत्यंत बळी । परी नक्रापुढें झाली शेळी । नक्रें ओढूनि नेला तळीं । दाढेंत धरिला खेंचूनि ॥७१॥
शक्य तितुके सकळ । यत्न केले परी निष्फळ । हत्तीचे झाले प्राण व्याकुळ । संकट घोर टळेना ॥७२॥
मग केलें देवाचें स्मरण । देवा आतां तुजवीण । कोण करीन संरक्षण । प्राण माझे दयाळा ॥७३॥
धांव धांव दीन बांधवा । काय माझा तुजपुढें कणवा । मी पशू ह्नणूनि देवा । स्तवन नेणें करु तुझें ॥७४॥
करुणासिंधो तुवां संकटीं । प्राणी तारिले कोट्यानुकोटी । मग मजवरी निष्ठुर दृष्टी । देवा ऐसी कां केली ॥७५॥
गजेंद्राचा ऐकूनि स्तव । श्रीविष्णुने घेतली धांव । नक्राचा करुनि पराभव । गजेंद्र काढीला बाहेरी ॥७६॥
भक्तसहाय्यार्थ सदा दक्ष । तो लक्ष्मीनाथ राजीवाक्ष । गजेंद्रासी देई मोक्ष । भक्ति त्याची पाहुनी ॥७७॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील कथा सुबोध । गातसे भक्त गोविंद । बालहिताकारणें ॥७८॥
याचें करिता श्रवण पठण । आयुरायोग्य विद्याधन । प्राप्त होईल ऐश्वर्य पूर्ण । ऐसें वरदान व्यासाचें ॥७९॥
इति श्रीलघुभागवते चतुर्थोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments