Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लघुभागवत - अध्याय ५ वा

लघुभागवत - अध्याय ५ वा
, बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:21 IST)
पंचमाध्यायींचेम कथानक । परीक्षितीसि सांगे शुक । त्या कथेंचे कौतुक ऐका तुह्मी सादर ॥१॥
स्वधर्माचरण सद्वरर्तन । यांपासूनि होय कल्याण । एतदर्थ पुरातन आख्यान एक परिसावें ॥२॥
शर्याति नामें एक राजा । सुकन्या नामें त्याची तनुजा । सुवर्णचंपकावरी तेजा । लाधली ते सुदैवें ॥३॥
शर्याति नृप एके दिनीं । कन्येसह संचरे वनीं । वनशोभेच्या दर्शनीं । राजा आनंद पावला ॥४॥
च्यवन ऋषीचा आश्रम । सन्निध देखिला जीर्ण परम । करीत होता मुनिसत्तम । तपश्चर्या त्या ठायीं ॥५॥
तपश्चर्या चाले बहुकाळ । कीं त्यावरी वाढलें वारुळ । त्या वारूळीं छिद्रस्थळ सुकन्येनें देखिलें ॥६॥
त्यांतूनि चमके सूक्ष्म प्रकाश । कारण काय कळेना तीस । ह्मणूनि कंटक सावकाश । टोंचूनि आंत पाहिलें ॥७॥
ओढितां कंटक बाहेर । वाहूं लागे तेथूनि रुधिर । कीं चमकली वस्तु तो नेत्र । होता च्यवन ऋष्रीचा ॥८॥
ऋषि पावे परम क्रोध । परी सुकन्येचा अपराध । बालचेष्टेचा आहे विनोद । क्षमा झाली पाहिजे ॥९॥
ऐसे प्रार्थितां शर्याती । च्यवन शांत होऊनि चित्तीं। ह्नणे हे कन्या मजप्रती । दान देईं राजया ॥१०॥
ऋषि होता बहुत वृद्ध । परी कन्या न देतां शाप दग्ध । करील ह्मणूनि त्याचा शब्द । सन्मानिला नृपतीनें ॥११॥
मग ऋषिसंगे तात्कालिक । सुकन्येचे विधिपूर्वक । लग्न लावितां परम सुख । ऋषि पावे अंतरी ॥१२॥
ऋषीचा तापट स्वभाव । सुकन्येसी ठाऊका सर्व । कीं आधींच होता अनुभव । परिपूर्ण तियेसी ॥१३॥
ह्नणूनि पतीचें मन । राखूनि राहे सावधान । सेवा करुनि रात्रंदिन । संतोषवी तयासी ॥१४॥
याकारणें तिजवरी प्रीती । सहज करूं लागला पती । नांदे सुकन्या ऐशा रीतीं । पतिसंगे आनंदे ॥१५॥
तंव एके दिनीं आले तेथ । अश्विनीकुमार अवचित । त्यांचे केलें स्वागत । सुकन्येनें आदरें ॥१६॥
तेव्हां त्यांते संतोष हृदयीं । होऊनि बोलिले मागा कांहीं । ऋषि ह्मणे या वृद्ध देहीं । तारूण्य आलें पाहिजे ॥१७॥
तेव्हां अश्विनीनंदन । ऋषीसी तडागीं मंत्र स्नान । घालितां, तात्काळ यौवन । प्राप्त झालें तयातें॥१८॥
पुढें एकदां आश्रमाप्रती । सुकन्येचा तात शर्याती । आला यज्ञाच्या निमित्तीं । पाचारण करावया ॥१९॥
जामातासी देखिलें । परी नाही ओळखिलें । नवयौवन प्राप्त झालें । नव्हते विदित तयासी ॥२०॥
ह्नणूनि होऊनि साशंक । मनीं मानी परम दु:ख । बोलवेना कांही अधिक । राजा सखेद बैसला ॥२१॥
ऐसा शर्याती त्या समयीं । पडला अत्यंत संशयीं । काय करावें सुचेना कांही । तरुण पुरुष देखुनी ॥२२॥
मनीं येती नाना विकल्प । उपजला थोर संताप । आपणाशींच ह्मने नृप । वर्तलें विचित्र हें कैसें ॥२३॥
ओळखूनि रायांचे मन । सुकन्या बोले वचन । ताता कां धरिले मौन । बुडूनि संशयसागरीं ॥२४॥
काय सांगूं चमत्कार । येथें आले अश्विनिकुमार । त्यांसी सादर पाहुणचार । पतिवचने म्यां केला ॥२५॥
मग होऊनि प्रसन्न । बोलिले मागा वरदान । तेव्हां पति मागे यौवन । संसारसुखाकारणें ॥२६॥
ऐकुनि कन्येची वाणी तोषला नृप अंत:करणीं । तूं पतिव्रता आनंददायिनी । होसी उभयकुलांतें ॥२७॥
नवल नव्हें हे स्वाभाविक । कन्येचें करी जामात कौतुक । ऐसें ऐकुनि जननी जनक । अपार आनंद मानिती ॥२८॥
ऋषीवरी अश्विनिकुमार । करुनि गेले उपकार । त्या ऋणांतूनि सत्वर । च्यवन उत्तीर्ण जाहला ॥२९॥
शर्यातीचे सदनी यज्ञ । झाला, तेथ अश्विनीनंदन । पाचारुनि सोमरसपान । तयांलागी करविलें ॥३०॥
तेव्हां आला क्रोध इंद्रासी । आणि वधावया च्यवनासी । उचलूं पाहे वज्रासी । तंव ते भूमिसी चिकटलें ॥३१॥
सुकन्येनें सोसूनि क्लेश । करुनि घेतला पति वश । सद्वर्तनापासूनि यश । जगीं सर्वत्र जोडतें ॥३२॥
देखा इतुकाचि सारांश । सदाचरणें संतुष्ट ईश । होऊनि तेथें दु:खाचा लेश । उरों नेदी सर्वथा ॥३३॥
सत्याचा महिमा थोर । येविषयी एक सुंदर । परिसा कथा सादर । सांगतो सकल संक्षेपे ॥३४॥
नाभानेदिष्ट नामें एक । ॠषि परम सात्विक । तपश्चर्या अलौकिक । करीत होता बहुकाळ ॥३५॥
त्यासी होते तीन बंधु । नीचवृत्ति स्वार्थसाधु । कपटाचे केवळ सिंधु । नाहीं बिंदु दयेचा ॥३६॥
तिघांचीही कुबुद्धि ऐसी । वंचूनि आपुल्या भ्रात्यासी । घ्यावें सर्वस्व विभागेंसीं । भूमि क्षेत्र धन त्याचें ॥३७॥
अति वृद्ध त्यांचा तात । अव्हेरुनि त्यांचे मत । व्यवहार करिती समस्त । स्वेच्छेपरी मदांधें ॥३८॥
ऐसा लोटता काळ बहुत । तपश्चर्या सारुनि परत । येतांचि नाभातें सर्व वृत्त । जाणविलें पित्यानें ॥३९॥
तपश्चर्येचें सामर्थ्य अद्भुत । त्याचे अंगी होतें बहुत । मनीं धरिता तरी खचित । शासन करिता तिघांसी ॥४०॥
परि स्वभावे शांत उदार । पितृवचनी सदा तत्पर । ह्मणूनि सहज कृपा थोर । पिता करी त्यावरी ॥४१॥
मग तो पुसे पित्यासी, आतां । काय कीजे उपाय ताता । येरु ह्नणे गा सुविद्य सुता । चतुर सर्वथा तू अससी ॥४२॥
तुज कांही नसे न्यून । जाशील तिकडे विपुल धन । मेळविसी ऐसा पूर्ण । पराक्रम असे तुझा ॥४३॥
ह्नणूनि नको करुं कलह । विभागाचा सांडूनि मोह । आहे तैसा असों दे स्नेह । भ्रात्यासंगे पवित्रा ॥४४॥
देख अंगिराऋषि सांप्रत । यज्ञ करिती तुवां तेथ । गेलिया मिळेल प्रचुर वित्त । चित्तीं साशंक नसावें ॥४५॥
तेथें असती ऋत्विज अनेक । परि दोन सूक्ते वैदिक । नसती कोणाही ठाऊक । ह्नणूनि विरस यज्ञासी ॥४६॥
तरी जाऊनि तेथ सवेग । यज्ञकर्मी घेईं भाग । सूक्तें पठूनि यथासांग । यज्ञ नेईं सिद्धीतें ॥४७॥
इतुके करीसी तरी तुज । बहुत धन मिळेल सहज । वरी आचार्य आणि ऋत्विज । देतील आसन सन्मानें ॥४८॥
ऐसें ऐकूनि पितृवचन । नाभागें तेथे करुनि गमन । दोन सूक्ते केली पठण । जीं ऋत्विज नेणती ॥४९॥
तेव्हां तोषूनि ऋषि सकल अर्पिले त्यातें धन विपुल । मग तेथूनि तो तत्काळ । निघे द्रव्य घेउनि ॥५०॥
तंव काळपुरुष एक तेथ । प्रगटूनि ह्नणे हें सर्व वित्त । माझेंचि असे निश्चित । कैसे अर्पूम मी तूतें ॥५१॥
येरु ह्नणे म्यां करुनि यज्ञ । संभावना संपादन । केली तें तूं माझें धन । हरिसी नवल वाटतें ॥५२॥
ऐसें विवादिती उभय । मग नाभाग योजी उपाय । कीं मत्पित्याचा अभिप्राय । घेऊनि तैसें वर्तावें ॥५३॥
तेव्हां काळपुरुष ह्नणे धन्य । सूचना आहे मज मान्य । याहुनि उपाय नसे अन्य । वाद तोडावयासी ॥५४॥
मग नाभानेदिष्ट सत्वर । पित्यासी कळवी समाचार । तेव्हां करुनि गंभीर विचार । पिता त्यातें बोलला ॥५५॥
कीं ते संपूर्ण धन । काळपुरुषाचेंचि असे जाण । ऐकूनि निर्णय नाभाग खिन्न । होऊनि, चकित जाहला ॥५६॥
परी पित्याचे अनुशासन । करुनि शिरसा वंदन । तत्काळ येऊनि केलें कथन । काळपुरुषासी तेधवां ॥५७॥
जाण पित्याचें सुनिश्चित मत । कीं तुझेंचि असे हे सर्व वित्त । यास्तव घेई तूंचि समस्त । घेववेना मज कांही ॥५८॥
नाभांगाची पितृभक्ती । आणि सत्याविषयी प्रीती । देखूनि काळपुरुष चित्तीं । परमाल्हाद पावला ॥५९॥
मग वदे नाभागासी । मी रुद्रदेव हें तूं नेणसी । तुझे सत्व देखावयासी । काळरुपें पातलों ॥६०॥
सत्यासी स्मरुनि पूर्ण । पक्षपात केल्याविण । तुझ्या तातें न्यायदान । केलें कौतुक वाटतें ॥६१॥
तूंही सांडूनि धनलोभ । पित्राज्ञेचा न धरितां क्षोभ । जाणूनि निज शुभाशुभ । न्यायधर्मे वर्तसी ॥६२॥
ऐसें तुझे शुद्धाचरण । देखूनि हें द्रव्य अर्पण । केलें म्यां तुज संपूर्ण । सुखसंपन्न असावें ॥६३॥
नाभाग पावला सुख परम । हा केवळ सत्याचा परिणाम । ह्नणूनि सत्यावरी प्रेम । सर्वकाळ असावें ॥६४॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥६५॥
याचें करिता श्रवण पठण । आयुरायोग्य विद्याधन । प्राप्त होईल ऐश्वर्य पूर्ण । ऐसें वरदान व्यासाचें ॥६६॥
इति श्रीलघुभागवते पच्चमोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघु भागवत अध्याय ४ था