Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लघुभागवत - उपसंहार

लघुभागवत - उपसंहार
, बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:46 IST)
आतां कथितों संक्षिप्तीं । कृष्णावतारसमाप्ती ।
अत्युच्च उत्कर्षाची प्राप्ती । तेचि उत्पत्ति र्‍हासाची ॥१॥
अति उंच केळ वाढे । फलभारें मध्येंचि मोडे ।
तैसा कुटुंबानाश घडे । वैभव पावतां शिखरासी ॥२॥
यौवन आणि अविवेकता । विपुल संपत्ति थोर सत्ता ।
द्यूत मद्य व्यसन अवस्था । मनुष्यनाशासी कारण ॥३॥
यांतूनि जरी प्राप्त एक । तरीही तें अनर्थमूलक ।
सर्वचि साध्य असतां नि:शंक । मरणप्राय दु:ख तें ॥४॥
द्यूत खेळले पांडव । हारविलें राज्य सर्व ।
मद्यानें गुंगले यादव । नामशेष जाहले ॥५॥
तें अद्भुत कथानक । असे परम शोकजनक ।
विनाशकाळीं आत्मघातक । बुध्दि उपजे मनुजातें ॥६॥
एकदां सारे यदुबालक । करावया क्रीडा कौतुक ।
पिंडारक नामें क्षेत्र एक । तेथें सहज पातले ॥७॥
खेळता खेळतां बहुत खेळ । सांब नामें होता एक बाळ ।
त्यासी गर्भिणीचें सोंग ओंगळ । दिधलें कौतुकें सकळांनीं ॥८॥
तेथें तपस्वी सन्निध एक । त्यासी भविष्य पुसती बालक ।
सांगा पुत्र कीं कन्या सूचक । गर्भ असे या स्त्रीचा ॥९॥
केवळ करावया चेष्टा । प्रश्न केला त्या ऋषिश्रेष्ठ ।
येरु वदे तुम्हां उध्दटां । शासन केलें पाहिजे ॥१०॥
कोपें वदे ही प्रसवेल मुसळ । जें  कलहाग्रीची पेटवील ज्वाळ ।
तेणें यादवकुळ समूळ । नाश पावेल निश्चयें ॥११॥
मग तो सांब कुमार । गर्भवेष करितां दूर ।
वस्त्रांतूनि भयंकर । लोहमुसळ गळालें ॥१२॥
तें देखुनि सारे बाळ । झाले अत्यंत भयाकुल ।
निवेदिती वॄत्त सकळ । बलिरामादिकांसी ॥१३॥
राम म्हणे झाला घात । मुसलपिष्ट करुनि त्वरित ।
सागरीं बुडवा नातरी समस्त । यादव मरतील निश्चयें ॥१४॥
आज्ञेपरी त्याचि काळीं । मुसलचूर्ण सिंधुजळीं ।
टाकिलें तंव मत्स्य गिळी । एक रवा त्यांतुनी ॥१५॥
आणि अवशेष सर्व चूर्ण । सिंधूंत मिसळलें पूर्ण ।
त्यापासूनि लोहाळे निर्माण । झाले तीरीं जळ येतां ॥१६॥
रवा गिळिला तोचि मासा । कैवर्तजाळीं अटके सहसा ।
पुढील प्रकार वर्तला कैसा । सावधान परिसावें ॥१७॥
धीवरें त्या मत्स्यासी । विकिलें एका पारध्यासी ।
चिरितां मीनोदरीं तयासी । लोहखंड आढळलें ॥१८॥
तेणें तेंचि खंड वेगीं । जोडिलें निजबाणालागीं ।
तीक्ष्णता आली धनुष्या अंगीं । ऐसें विषमय शकल तें ॥१९॥
कांहीं काळें एके दिनीं । सर्व यादव मद्य सेवुनी ।
गुंगोनियां नेणपणीं । कलह थोर मांडिला ॥२०॥
मद्याची भयंकर धुंदी । सर्व गुंतले घोर युध्दीं ।
नाशाचा समय सन्निधीं । आला, देखे श्रीकृष्ण ॥२१॥
तेव्हां स्त्रीपुत्रादि सकलांसी । धाडिलें शंखोध्दार तीर्थासी ।
आपण गेला प्रभासासी । बलिरामासमवेत ॥२२॥
इकडे युध्द घनघोर । चाललें, मेले यादववीर ।
शस्त्रास्त्रांचा झाला संहार । तरी युध्द संपेना ॥२३॥
मग समुद्रतीरींचे लोहाळे । एकमेकांवरी बळें ।
फेंकिती त्या विषें सगळे । यादव नाश पावले ॥२४॥
ऐसा यादवांचा संहार । झाला, पाहूनि हलधर ।  
सोडूनि माया मोह संसार । जलसमाधि तो घेई ॥२५॥
मग श्रीकृष्णही करी विचार । आतां संपवूं अवतार ।
धर्मसंस्थापन दुष्टसंहार । कार्य पूर्ण जाहलें ॥२६॥
मग अश्वत्थतळीं आसन । मांडूनि करी प्रायोपवेशन ।
तंव अवचित घडलें विघ्र । नेमिलें तें टळेना ॥२७॥
तेथें वृक्षावरी संनिधीं । बैसला होता पूर्वोक्त पारधी ।
मृगावरी साधूनि संधी ।नेम धरिला तयानें ॥२८॥
चुकोनि तें शरसंधान । कृष्णपादतळीं लागे बाण ।
तेणें व्याकुळ झाले प्राण । श्रीकृष्णाचे अत्यंत ॥२९॥
कृष्ण म्हणे सारथे दारुका । आतां बुडेल सागरीं व्दारका ।
तरी जाऊनि कळवीं लोकां । जावें नगरी सोडुनी ॥३०॥
तैसें शंखोध्दारीं सुहृज्जन । त्यांसी कथीं हें वर्तमान ।
स्त्रियांचे करावया रक्षण । अर्जुनासी सांगावें ॥३१॥
ऐसें बोलूनि कृष्ण परमात्मा । पंचभूतीं मेळवी अंशात्मा ।
कैंचें ब्रह्मपद पुरुषोत्तमा । स्वयमेवचि जो ब्रह्म ॥३२॥
दुष्टांचें करावें हनन । आणि साधूंचें पालन ।
एतदर्थ भूवरी जनन । आदिपुरुषें आदरिलें ॥३३॥
असो श्रीकृष्णाचें निधन । कळतां झाला पार्थ उव्दिग्र ।
तैसेंचि स्त्रिया आप्तजन । शोकार्णवीं बुडाले ॥३४॥
ग्रंथांतरींच्या कथा सुबोध । वेंचूनि घेतल्या प्रसिध्द ।
विव्दज्जनांचा अनुवाद । करुनि ग्रंथ म्यां लिहिला ॥३५॥
शुध्द चित्तें हा वाचितां ग्रंथ । प्रपंचीं साधेल परमार्थ ।
पुरतील सर्व मनोरथ । टळेल अनर्थ निश्चयें ॥३६॥
जयां भक्तीचा नाहीं लेश । ते न पावती कोठेंही यश ।
सदा तयां बाधती क्लेश । म्हणूनि भक्ति करावी ॥३७॥
तेचि जाणा भगवद्भक्त । जे दीन पंगु अंध अशक्त ।
यांच्या ठायीं नित्य अनुरक्त । आणि युक्त आचरती ॥३८॥
लघुभागवत ग्रंथ विशुध्द । रामनंदन दास गोविंद ।
भक्तिश्रध्दान्वित सानंद । समर्पी बालभक्तांसी ॥३९॥
शके अठराशें एकावन्न । शुक्ल संवत्सर बुध दिन ।
कृष्णजन्माष्टमीसी ग्रंथ संपूर्ण । जगदीशकृपें जाहला ॥४०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मंगळसमृध्दिरस्तु ॥
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोनम: ॥
हरयेनम: ! हरयेनम: !! हरयेनम: !!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघुभागवत - अध्याय १२ वा