लहानपणी बाळाला आई ज्याप्रमाणे सजवते त्याचप्रमाणे आपले देवतेला पूजा करताना सजवले तर बाळ जसं तयार झाल्यानंतर आईला पाहून खुदकन हसतं त्याचप्रमाणे आपली देवता सुध्दा प्रसन्न होते. माझ्या वडिलांनी गजानन महाराजांची अशाच रितीने ४५ वर्षे भुयारात सेवा केली. ते महाजांसोबत एवढे रमले होते की शेवटी सख्य भक्तीमुळे महाराज त्यांना कुठे जाऊच देत नव्हते आणि ते सुध्दा सुट्टी काढून कुणाच्या सुखदुख:त जात नसत. वृद्धापकाळाने सेवा थांबल्यानंतर महाराज त्यांचेशी घरीच संवाद साधत असत.
एकदा ते तिरुपतीला गेले होते तेव्हा ६-७ दिवस पुजेपासुन सुट्टीवर होते तेव्हा महाराजांनी तिरुपतीला जाऊन त्यांना दृष्टांत दिला की तू पूजा सोडुन ईथे आलास, तूला पैसे पाहिजे का? तेव्हा पासुन बाबांनी कुठे दर्शनासाठी जाणे सुध्दा बंद केले होते.
एक अनुभव आणखी असा की एकदा दुपारी माझे वडील झोपले होते, तेव्हा त्यांना धक्का देऊन सांगितले की अरे झोपलास काय? ऊठ माझे फेट्यामधली पीन मला रुतते आहे, भुयारात जा अन ते पहिले काढून फेक. बाबा लगेच उठले, वय ८५ होते, ऑटो बोलावून मंदीरात गेले, अन तिथे जाऊन सरळ भुयारात गेले,
तिथले ब्रम्हवृंदाला सांगितले की हा फेटा काढून टाक, तेव्हा ते सुद्धा घाबरले, एकीकडे बाबांचा आदेश अन दुसरीकडे संस्थानचे नियम. शेवटी बाबांनी त्यांना म्हटले की कोणी काही बोलले तर मी जबाबदार राहील. त्यांनी तो फेटा काढला व दुसरा फेटा घातला. बघतात काय तर तो फेटा थोडा ढिल्ला होता म्हणून त्याला एडजस्ट करण्यासाठी म्हणून दोन्ही बाजूने आकडे लावले होते. नंतर त्यांनी कार्यालयात जाऊन झालेला प्रकार सांगितला तर कार्यालयातील व्यक्तींनी सुध्दा आश्चर्य व्यक्त केले व महाराजांची नुसती मार्बलची मुर्ती नाही तर महाराजांचे वास्तव्य अजूनही साक्षात आहे ह्याची प्रचिती आली. असे आपले बाबा आहेत.