नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असल्याचे मानले जाते. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे.
वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे केले जाते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती असते. यंदा नृसिंह नवरात्र 13 मे सोमवारी सुरु होत असून 22 मे रोजी नृसिंह जयंती साजरी केली जाणार आहे.
तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला नृसिंहव्रत, गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीला त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीला द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते.
नृसिंह पूजा विधी
नृसिंहाच्या मूर्तीला स्नान घालावे. पंचामृत, पंचगव्य आदीने स्नान घालावे. मूर्ती नसल्यास फोटोला स्वच्छ पुसावे. कुंकू, चंदन, केशर अर्पित करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस अर्पित करावी. नंतर तूप, साखर, तांदूळ, जवच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी. ही विधी नृसिंह पुराणात सांगितली आहे. या व्यतिरिक्त रितीप्रमाणे अनेक भाविक नवरात्र उत्सव साजरा करताना तसेच उपचार करतात जसे देवघरात दिवा लावणे व घट बसवणे. नवरात्रीचा उपवास करणारे किंवा ज्यांना झेपत नसेल त्यांनी केवळ जयंतीच्या दिवशी उपवास करावा व दुसऱ्या दिवशी पारणे करावे. जयंती दिवशी संध्याकाळी देवाची पूजा करून कैरीचे पन्हे, डाळीची कोशिंबीर, खीर या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. नवरात्र कालावधीत स्तोत्र, कवच, सहस्रनाम, अष्टोत्तरशत नाम या प्रकारे देवाचे नामस्मरण करावे.
कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे म्हटले जाते.