हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. साधारणपणे एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्ट चतुर्थी येतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत महिला आणि पुरुष करू शकतात. काही जण संकष्ट चतुर्थीला मिठाची चतुर्थी करतात तर काहीजण पंचामृती चतुर्थी करतात. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.
दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा कालावधी आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे.
पूजा विधी
- संकष्टी चतुर्थीला सकाळी अंघोळ झाल्यावर गणपतीची पूजा करावी.
- दिवसभर उपास करावा.
- पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले गेले आहे.
- पूजा करताना मुख पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे.
- हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन व्रत संकल्प घ्यावे नंतर पूजा स्थळी एका चौरंगावर गणपतीची प्रतिमा स्थापित करावी.
- नंतर गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या आणि नैवेद्य दाखवावं.
- श्री गणेशला दूर्वा अर्पित करताना ओम गं गणपतय: नम: मंत्र जपावं.
- व्रत कथा वाचावी.
- शेवटी सर्वांना प्रसाद वितरित करुन चंद्रदर्शन घेऊन व्रत खोलावे.
संकष्ट चतुर्थीची कथा
प्रत्येक व्यक्तीला चार प्रकारची संकटे असल्याचे मानले जाते. प्रसूतिजन्य, बाल्यावस्था, मरणात्मक आणि यमलोकगमन. या चार संकटातून मुक्त होण्याकरिता संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले गेले आहे. हे संदर्भ श्री गणेश कोश यामध्ये आढळतो. यानुसार ब्रह्मदेव पृथ्वीच्या निर्मितीकरिता ध्यानस्थ बसले असताना निर्मितीचे कार्य ध्यानी येईना. तेव्हा ब्रह्मदेवांना आकाशवाणीने सांगितले की, अभिमानाचा त्याग करून निर्मितीच्या कार्याला लागावे आणि मंत्राला ओमकार लावावे. तेव्हा विधात्याने मंत्र म्हणायला सुरुवात करताच एक महाप्रकृती निर्माण झाली.
या प्रकृतीला योगमाया असे म्हणतात. या योगमायेने श्री गणेशाची एक सहस्र वर्षापर्यंत तपस्या करुन गणेशाला प्रसन्न केले तेव्हा गणपतीने वरदान दिले की व्रतमाता तुझे नाम होईल आणि तुझे ठायी माझा जन्म होईल. कालमापनाकरिता तिची निर्मिती झाल्यामुळे तिने ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यासाठी तिने तिथिरूप देह धारण केला. चार मुख, चार हात, चार पाय, असे तिचे वर्णन येते. तिच्यापासून सर्व तिथी निर्माण झाल्या असे मानले जाते.
चतुर्थी व्रत केल्यास मी संतुष्ट होऊन ऐहिक संकट निरसन करी, असे प्रत्यक्ष गणेशांनी सांगितले असल्याचे मानले जाते.