Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

संत निवृत्तिनाथांचे अभंग 1 ते 10

nivruttinath maharaj
, सोमवार, 13 जून 2022 (11:36 IST)
अवीट अमोला घेता पैं निमोला । तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ १ ॥
अव्यक्त साकार अकारिला अंकूर । क्षरला चराचर भक्तिकाजें ॥ २ ॥
अनुमान विटे सर्वाघटींमाजिटें । तें परब्रह्म ईटें भक्तिसाह्य ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट पिकलिसे पेठ । पुंडलिकें प्रगट केलें असे ॥ ४ ॥
 
*****
प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥
तें रूप भीवरें पांडुरंग खरें । पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥
युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश । पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥
निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज । विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥
 
*****
रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष । पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥
पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण । दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी ॥ २ ॥
त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरुणोपाव ॥ ३ ॥
पूण्य केलें चोख तारिले अशेख । जनीं वनीं एकरूप वसे ॥ ४ ॥
वेदादिकमति ज्या रूपा गुंतती । तो आणूनी श्रीपति उभा केला ॥ ५ ॥
निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा । निरालंब शिखा गगनोदरीं ॥ ६ ॥
 
*****
पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥
विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥
शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥
 
*****
मन कामना हरि मनें बोहरी । चिंतितां श्रीहरि सुखानंद ॥ १ ॥
तें पुंडलिक तपें वोळलें स्वरूप । जनाचीं पै पापें निर्दाळिली ॥ २ ॥
वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ । विठ्ठल दैवत रहिवास ॥ ३ ॥
निवृत्ति साकर विठ्ठल आचार । भिवरा तें नीर अमृतमय ॥ ४ ॥
 
*****
निराकार वस्तु आकारासि आली । विश्रांति पैं जाली विश्वजना ॥ १ ॥
भिवरासंगमीं निरंतर सम । तल्लीन ब्रह्म उभें असे ॥ २ ॥
पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये । विठ्ठल हेंचि गाये संकीर्तनीं ॥ ३ ॥
निवृत्तिसंकीर्तन ब्रह्म हें सोज्वळ । नाम हें रसाळ अनिर्वाच्य ॥ ४ ॥
 
*****
पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट । करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥
वाळलें अंबर अमृततुषार । झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे । पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥
निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान । खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥
 
*****
विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं । तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
मुनिजनां सुख निरंतर लक्ष । भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य । उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
निरानिरंतर भीमरथी तीर । ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
नित्यता भजन जनीं जनार्दन । ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व । नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥
 
*****
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥
माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥
निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥
 
*****
नित्य हरिकथा नित्य नामावळी । वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ॥ १ ॥
म्हणोनि पंढरी उपजवावें संसारीं । प्रत्यक्ष श्रीहरी तीरीं उभा ॥ २ ॥
नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत । नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥ ३ ॥
निवृत्ति सादर विष्णुमय सार । विठ्ठल आचार पंढरिये ॥ ४ ॥
*****

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात या वस्तूंचे गुप्त दान केल्यान भाग्य उजळेल