Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 141 ते 150

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (15:26 IST)
उफराटी माळ उफराटें ध्यान । मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें । यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान । आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी । मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥
 
श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं । तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥
अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥
नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि । पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥
शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥
विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥
निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥
 
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा । बोलताचि वाचा हारपती ॥ १ ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार । सर्व निराकार एकरूपें ॥ २ ॥
नसतेनि जीव असतेनि शिव । तदाकार माव मावळली ॥ ३ ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप । विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥ ४ ॥
 
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख । विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥
 
आगम निगमा बोलतां वैखरी । तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥
कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥
 
अष्टांग सांधनें साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥
 
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति । मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥
आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य । तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥
 
दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी । नंद यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ १ ॥
खेळे लाडेकोडें गौळणी चहूंकडे । नंदाचें केवढे भाग्य जाणा ॥ २ ॥
ज्या रूपें वेधलें ब्रह्मांड निर्मळे । तेंचि हें आकारले कृष्णरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा । नामेचि वैकुंठा पावन होती ॥ ४ ॥
 
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार । गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥
 
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें । नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments