Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्री भक्तविजय अध्याय १३

श्री भक्तविजय अध्याय १३
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥
ऐका श्रोते नवल अद्भुत ॥ आजि लाधलें परमामृत ॥ म्हणोनि तुम्हांऐसे भाग्यवंत ॥ नाहीं दिसत निजदृष्टीं ॥१॥
देवांत श्रेष्ठ वैकुंठनाथ ॥ त्यासही आवडती प्रेमळ भक्त ॥ तीं भक्तचरित्रें अति अद्भुत ॥ जाहलीं प्रकट निजभाग्यें ॥२॥
संतचरित्रें गातां ऐकतां ॥ संतोष वाटे रुक्मिणीकांता ॥ जैसा रोहिणीपतीचा उदय होतां ॥ क्षीरसागर उल्हासे ॥३॥
कीं गजवदनाची करितां स्तुती ॥ शंकरपार्वती संतुष्ट होती ॥ कीं शिष्यास होतां ज्ञानप्राप्ती ॥ सद्गुरु डोलती निजप्रेमें ॥४॥
नातरी निजबाळकाचे वर्णितां गुण ॥ जननीस वाटे समाधान ॥ कीं नारदाचें वर्णितां विरक्तपण ॥ कमलोद्भव संतोषे ॥५॥
तेवीं भक्तचरित्र प्रशंसितां ॥ संतोष वाटे जगन्नाथ ॥ मग प्रसन्न होऊन श्रोता वक्ता ॥ अक्षयपदा पाववी ॥६॥
म्हणोनि सभाग्य तुम्हांकारण ॥ यास्तव म्हणितलें असे जाण ॥ विष्णुपदाहूनि लाभ कोण ॥ थोर न दिसेचि सर्वथा ॥७॥
मागिले अध्यायीं कथा रसाळ ॥ आंवढ्यानागनाथीं फिरलें देऊळ ॥ कौतुक देखोनि विप्र सकळ ॥ तटस्थ जाहले मानसीं ॥८॥
कैलासपतीस नमस्कारूनी ॥ उभयतां निघाले तेथूनी ॥ मग पंढरपुरास परतोनी ॥ येते जाहले तेधवां ॥९॥
जैसी कन्या सासुरवासिनी ॥ माहेरास चालिली परतोनी ॥ उल्हास वाटे तिचें मनीं ॥ तैसेंच जाहलें नामया ॥१०॥
कीं गोवत्सांची पडतां तुटी ॥ तंव माय देखिली उठाउठीं ॥ लगबग धावे तिचे पाठी ॥ तैसेंच जाहलें नामया ॥११॥
नातरीं बाळक खेळतां बिदीसीं ॥ परतोनि जाय मातेपासीं ॥ हर्षें ओसंडे मानसीं ॥ तैसेंच जाहलें नामया ॥१२॥
कीं पाडस क्रीडावया गेलें ॥ परतोनि हरिणीपासीं चालिलें ॥ तें चित्तीं हर्षें ओसंडलें ॥ तैसेंच जाहलें नामया ॥१३॥
यापरी संतोष मानूनि चित्तीं ॥ उभयतां चालिले सत्वरगती ॥ सन्निध येतां अवचितीं ॥ कळस दुरून देखिला ॥१४॥
पंढरी दृष्टीस पाहिली जेव्हां ॥ साष्टांग नमस्कार घातला ॥ तेव्हां क्षेमालिंगन देतां बरवा ॥ उल्हास वाटला दोघांसी ॥१५॥
मग टाळ वीणा करीं घेऊन ॥ सप्रेम करिती हरिकीर्तन ॥ महाद्वारीं येऊनि जाण ॥ पुनः दंडवत घातलें ॥१६॥
जैसी काठी देतां टाकूनी ॥ निश्चलपणें पडे धरणीं ॥ तैसाच नामा लोटांगणीं ॥ विहेही होऊन पडियेला ॥१७॥
मग ज्ञानदेवें उठवूनि सत्वर ॥ किंचित आणिला देहांवर ॥ आपुले हातीं धरूनि कर ॥ चालिला सत्वर पुढारा ॥१८॥
मग शेजारमंडपीं येऊन ॥ मागुती जेव्हां केलें नमन ॥ तंव सिंहासनाखालीं ॥ उतरून ॥ जगज्जीवन पुढें आला ॥१९॥
नामयासी धरून पोटीं ॥ सद्गदित जाहला जगजेठी ॥ इडापीडा घेऊनियां दिवटी ॥ ओंवाळूनि सांडिली ॥२०॥
मग नामा सद्गद होऊनी ॥ अश्रु वाहती नयनीं ॥ चरणकमळीं मस्तक ठेवूनी ॥ मंजुळ वचनीं बोलत ॥२१॥
म्हणे बहुत शिणलों जगजेठी ॥ आतां पाहे कृपादृष्टीं ॥ तुजविण बहु जाहलों हिंपुटी ॥ अंत पोटीं दिसेना ॥२२॥
अज्ञानदशा होती अंतरीं ॥ म्हणोनि हिंडोलों दारोदारीं ॥ परी पंढरीऐसें स्वप्नांतरीं ॥ सौख्य कोठेचि दिसेना ॥२३॥
उदंड तीर्थें प्रौढी अनेगें ॥ परी माझें मन लागलें चंद्रभागे ॥ दीनदयाळे पांडुरंगे ॥ करिसी भवभंग दासांचा ॥२४॥
गरुडटके आणि पताका ॥ जेथें नाहींत यदुनायका ॥ त्या देवासी देखोनि शंका ॥ माझ्या मनीं वाटतसे ॥२५॥
त्यातें पाहतां नेत्रपातीं ॥ मजला वाटे तुझी खंती ॥ मग तुझें रूप आठवोनि चित्तीं ॥ राहत होतों निवांत ॥२६॥
इष्ट मित्र बंधु आप्त ॥ तूंचि माझें कुळदैवत ॥ ऐसें सांगूनि मग निवांत ॥ नामा उगाचि राहिला ॥२७॥
यावरी म्हणे रुक्मिणीपती ॥ मजला फार होती खंती ॥ निद्रा न येचि अहोरातीं ॥ तुझी वात पाहातसें ॥२८॥
नामया गेला होतासी दूरी ॥ तैं उदास दिसे हे पंढरीं ॥ आणि तुझा विसर क्षणभरी ॥ माझें अंतरीं न पडेचि ॥२९॥
आतां दृष्टीपासूनि निराळा ॥ नको जाऊं भक्ता प्रेमळा ॥ माझें स्वरूपीं लावूनि डोळा ॥ बैसें निश्चळ होऊनी ॥३०॥
तुज माझी अत्यंत गोडी ॥ मजही तुझी बहुत आवडी ॥ गोडी गुळातें न सोडी ॥ तैसीच चोखडी निजप्रीती ॥३१॥
नातरी कमळिणी आणि गभस्ती ॥ एकमेकांची आवडी धरिती ॥ तैसीच तुझी माझी प्रीती ॥ जाय निश्चितीं नामया ॥३२॥
नातरी चंद्र आणि अपांपती ॥ एकमेकांची अत्यंत प्रीती ॥ तैसी नामया तुझी संगती ॥ माझें चित्तीं तूं तैसा ॥३४॥
कीं तान्हया आवडे निजजननी ॥ माता न विसंबे त्यालावूनि ॥ तैसें तुझें माझें मनीं ॥ द्विअत स्वप्नीं नसेचि ॥३५॥
कोणी कापडी पडतां दृष्टीं ॥ तयासी पुसें तुझी गोष्टी ॥ माझा नामा तुमचे दृष्टीं ॥ पडला होता कीं सुखरूप ॥३६॥
ताहान भूक लागतां जाण ॥ मजविण त्याची जाणेल कोण ॥ अथवा जीवींची निजखून ॥ कवणाकारण सांगेल तो ॥३७॥
तो खंती करूनि आपुल्या जीवा ॥ करीत असेल माझा धांवा ॥ दिवसनिशीं आणीक हेवा ॥ नसे ठाऊक तयासी ॥३८॥
मजविण नामयाकारण ॥ कोण पुसेल भाग शीण ॥ कोणाचे साउलियें बैसोन ॥ विश्रांति घेईल क्षणभरी ॥३९॥
ऐसें म्हणूनि जगजेठी ॥ संतांसी सांगे गुजगोष्टी ॥ मजविणें नामा होऊनि कष्टी ॥ प्राण कंठीं धरिला असे ॥४०॥
मग बाहें कवळूनि जगज्जीवन ॥ नामयासी दिधलें आलिंगन ॥ प्रेमें कुरवाळूनियां वदन ॥ नेत्र पुसिले निजकरें ॥४१॥
सुमनतुलसींची काढूनि माळा ॥ घातली नामयाचे गळां ॥ सर्वांग सादर घनसांवळा ॥ कृपादृष्टीं पाहतसे ॥४२॥
तंव भेटीसी आले वैष्णववीर ॥ निवृत्ति आणि ज्ञानदेव ॥ सोपान विसोबा खेचर ॥ नरहरी सोनार निजभक्त ।४३॥
ऐसे मिळोनि तये क्षणीं ॥ लोटांगणें घातलीं धरणीं ॥ नामयासी आलिंगन देऊनी ॥ जयजयकारें गर्जती ॥४४॥
तंव निर्जर येऊनि गगनीं ॥ अनिवार सुमनें टाकिली त्यांनीं ॥ जयजयकारें गर्जोनि ध्वनी ॥ पेर्मानंदें डोलती ॥४५॥
ऋषिगण आणि गंधर्व ॥ चतुर्मुख इंद्रादिदेव ॥ दृष्टी सुख घ्यावया सर्व ॥ आले तत्काळ ते समयीं ॥४६॥
तंव पंचारती घेऊनि करीं ॥रुक्मिणी आली सत्वरी ॥ देवभक्त ते अवसरीं ॥ ओवाळले निजप्रीतीं ॥४७॥
धरूनि नामयाची हनुवटी ॥ माता पाहे कृपादृष्टी ॥ तंव नामयासी पुनः जगजेठी ॥ काय गोष्टी बोलत ॥४८॥
म्हणे नामया ऐक मात ॥ तीर्थें पाहिलीं तुवां समस्त ॥ जन्मा येऊनि केलें स्वहित ॥ पुरविलें आर्त मनींचें ॥४९॥
आतां यात्रा व्हावया संपूर्ण ॥ करीं नामया उद्यापन ॥ विधियुक्त आचरून ॥ हेतु संपूर्ण करावे ॥५०॥
तुवां बहुत कष्ट केले देख ॥ तयांचें होईल सार्थक ॥ सांगतों हें नामया ऐक ॥ देव बोलत निजप्रीतीं ॥५१॥
अनेक तीर्थें केलीं जाण ॥ त्यांचें न करितां उद्यापन ॥ जैसें षड्रस रांधिलें अन्न ॥ शेवटीं भोजन न केलें ॥५२॥
कां पुराणें ऐकिलीं बहुत ॥ तीं मननाविणें गेलीं व्यर्थ ॥ नातरी अलंकार घडिले सुयुक्त ॥ न लेतां व्यर्थचि ॥५३॥
नातरी आरोग्य व्हावया काया ॥ औषध घेतलें नामया ॥ परी पथ्य न करितां वायां ॥ उपयोगी न पडे सर्वथा ॥५४॥
तेवीं सप्तपुर्‍यांसमवेत ॥ तीर्थें पाहिलीं तुवां बहुत ॥ उद्यापन न करितां जाती व्यर्थ ॥ असे शास्त्र या रीतीं ॥५५॥
तरी पुण्यक्षेत्र हें पंढरी ॥ भूवैकुंठ महीवरी ॥ जे विख्यात चराचरीं ॥ उपमा द्यावया नसेचि ॥५६॥
द्विजांसी अन्न अर्पितां येथ ॥ तरी मी कल्पपर्यंत होतसें तृप्त ॥ आतां क्षेत्रवासी ब्राह्मण समस्त ॥ आणावे त्वरित भोजना ॥५७॥
पूजा करूनि उपचारेंसीं ॥ षड्स भोजन द्यावें त्यांसी ॥ तांबूल दक्षिणा द्विजवरांसी ॥ निजभावेंसीं अर्पावीं ॥५८॥
ऐसें बोलूनि श्रीपती ॥ मग नामयासी धरूनि हातीं ॥ अंतरमंदिरीं सत्वर गतीं ॥ घेऊनि गेला तेधवां ॥५९॥
मग हास्यवदन शारंगधर ॥ रुक्मिणीस बोले करुणाकर ॥ नामयासी माझी प्रीति थोर ॥ न करवे दूर सर्वथा ॥६०॥
नाना तीर्थें करून ॥ आज करितों उद्यापन ॥ ऐसें म्हणतां जगज्जीवन ॥ जगन्माता बोलत ॥६१॥
म्हणे जी ब्रह्मांडनायका ॥ नामा तुमचा परम सखा ॥ माया ममता टाकूनि देखा ॥ भजतो एका निजभावें ॥६२॥
सर्व उद्योग टाकिले याणें ॥ कोण करील उद्यापन ॥ तुम्हांसी बांधिलें सेवा करून ॥ अहंता ममता टाकूनि ॥६३॥
अनंत जन्म घेऊनि पाहीं ॥ याणें जोडिलें सुकृत कांहीं ॥ तें अवघेंचि तुमचे पायीं ॥ निक्षेपिलें निजप्रीतीं ॥६४॥
घेऊन अपार जललोट ॥ सरिता सागरीं झाल्या प्रविष्ट ॥ तैसा नामया एकनिष्ठ ॥ अनुसरला तुम्हांसी ॥६५॥
म्हणोनि याचें कौतुक सांगें ॥ करावें लागेल आपूलेनि अंग ॥ ऐसें ऐकतांचि श्रीरंग ॥ हास्यवदन जाहले पैं ॥६६॥
रुक्मिणी म्हणे जी पुरुषोत्तमा ॥ अद्भुत नामयाचा प्रेमा ॥ निजमुखें वर्णूं न शके ब्रह्मा ॥ नित्य नवा अनुपम ॥६७॥
आतां सत्वर जावें चक्रपाणी ॥ नामयासी सवें घेऊनी ॥ आमंत्रण ब्राह्मणांसी देऊनी ॥ शीघ्र आलें पाहिजे ॥६८॥
सर्वसिद्धि अनुकूल असतां ॥ करणें न लगे कांहीं चिंता ॥ इच्छामात्रें पंढरीनाथा ॥ काय न होय तुमचेनि ॥६९॥
कामधेनूच्या पाडसासी ॥ चरणें न लागे डोंगरासी ॥ कीं दीपसायास भास्करासी ॥ करणें न लागेचि सर्वथा ॥७०॥
कीं अवर्षण पडेल म्हणूनियां ॥ उदधीस चिंता कासया ॥ सुधारस सदा सेवी तया ॥ पथ्य कासया पाहिजे ॥७१॥
शीतळ उपचार व्हावयास ॥ चंद्रें करावें कां सायास ॥ कीं काव्यरचना सरस्वतीस ॥ होणें अवघड कासया ॥७२॥
करावया विघ्नांचें निवारण ॥ गजवदनासी न लगे प्रयत्न ॥ कीं हातींचें पहावया कंकण ॥ दर्पण कासया पाहिजे ॥७३॥
तेवीं नामयाची करावया समाराधना ॥ आयास न लगती जगज्जीवना ॥ ऐसें ऐकूनि वैकुंठराणा ॥ जाता जाहला ते समयीं ॥७४॥
नामयाचा हात धरूनि करकमळीं ॥ सत्वर चालिले वनमाळी ॥ सवें घेऊनि भक्तमंडळी ॥ समारंभेंकरूनियां ॥७५॥
निवृत्ति आणि ज्ञानेश्वर ॥ सोपान विसोबा खेचर ॥ चोखा नरहरि सोनार ॥ वंका काठीकार तो ॥७६॥
दोहीं बाहीं सनकादि ॥ चालती पाहात कौतुक ॥ नामयाचे पाठीसी यदुनायक ॥ चालत देखा निजप्रीतीं ॥७७॥
पाठीसी चालावया काय कारण ॥ तेही तुम्हांसी सांगतों खूण ॥ नामयाचे लागावया रजचरण ॥ जगज्जीवन इच्छीतसे ॥७८॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ आशंका धरितील विचक्षण ॥ देव भक्तांचे रजचरण ॥ कैशा रीतीं इच्छील ॥७९॥
तरी तीर्थावळींत साचार ॥ स्वमुखें बोलिला जगदीश्वर ॥ तोचि धरूनियां आधार ॥ म्यांही लिहिलें तैसेंचि ॥८०॥
येरवीं शरणागता शरण ॥ स्वमुखें बोलिला जगज्जीवन ॥ तो करुणासागर कृपाघन ॥ काय एक करीना ॥८१॥
दीनबंधु दीननाथ ॥ बिरुदावली जगद्विख्यात ॥ म्हणऊनि श्रोतीं आशंकित ॥ सर्वथा चित्त न कीजे ॥८२॥
असो काय बोलोनि बहुत ॥ निजखूण जाणती वैष्णवभक्त ॥ विप्रांसी द्यावया आमंत्रण त्वरित ॥ रुक्मिणीकांत चालिले ॥८३॥
निजदासांचा अभिमान ॥ सिद्धी न्यावया जगज्जीवन ॥ गृहस्थ व्यापारी ब्राह्मण ॥ जाहले यजमान भक्तांचे ॥८४॥
वैष्णवांसहित यादवराणा ॥ करीत क्षेत्रप्रदक्षिणा ॥ ब्राह्मणासी पाहतां वैकुंठराणा ॥ वाळुवंटासी पातले ॥८५॥
तों अनाथनाथ रुक्मिणीवर ॥ दीनदयाळ करुणासागर ॥ दृष्टीस देखतां द्विजवर ॥ केला नमस्कार सद्भावें ॥८६॥
पंडित वैदिक ब्राह्मण ॥ सदाचारी श्रोते निपुण ॥ दृष्टीस देखोनि जगज्जीवन ॥ विस्मित मन तयांचें ॥८७॥
गृहस्थरूप धरिलें जगज्जीवनें ॥ परी लोपती षड्गुणैश्वर्यचिन्हें ॥ जैसें पितळेमाजी सोनें ॥ न झांकेचि सर्वथा ॥८८॥
कथिलामाजी रुपें निर्मळ ॥ कीं प्रपंचांत भक्त प्रेमळ ॥ पाषाणांत परिस केवळ ॥ न झांकेचि सर्वथा ॥८९॥
कीं वनस्पतींमाजी जैसी तुळसी ॥ सरितेमाजी गंगा जैसी ॥ तेवीं निजभक्तमेळीं वैकुंठवासी ॥ न झांकेचि सर्वथा ॥९०॥
हिरकण्यांमाजी हिरा दिसे ॥ कीं पक्वान्नताटीं सुधारस ॥ कीं नक्षत्रांमाजी भासे ॥ चंद्रमा जैसा सोज्ज्वळ ॥९१॥
तेवीं वैष्णवमेळीं शारंगधर ॥ देखोनि विस्मित द्विजवर ॥ मग काय बोलती मधुरोत्तर ॥ सौख्य अपार मानूनि ॥९२॥
तुमचें स्वरूप देखोन ॥ त्रिविध ताप मावळले जाण ॥ आपुलें सांगा नामाभिधान ॥ केलें आगमन कोठोनि ॥९३॥
कवण वृत्ति साचार ॥ कवण चालवितां व्यापार ॥ कोठें योजिलें बिढार ॥ ऐसा विचार कळों द्या ॥९४॥
ऐसी ऐकूनि द्विजवाणी ॥ काय़ बोलती चक्रपाणी ॥ माझें कुळ आणि वृत्ति दोनी ॥ या भक्तांसी ठाऊकीं ॥९५॥
मी तो अजित असंग ॥ परी अनंतजन्मीं यांचाचि संग ॥ यांचें आमचें निजांग ॥ निकट ओळखी सर्वदा ॥९६॥
आणि साक्ष करूनि तुमचे चरण ॥ यथार्थ बोलतों सत्य वचन ॥ नामयाचा मी मैत्र जाण ॥ अंतरंग सर्वदा ॥९७॥
कांहीं आशंका असेल चित्तीं ॥ तें गुज पुसावें संतांप्रती ॥ निःसंदेह करूनि वृत्ती ॥ भोजनासी आलें पाहिजे ॥९८॥
बिर्‍हाड घेतलें देउळांत ॥ नाम पुसाल तरी अनंत ॥ स्नानविधिकरूनि त्वरित ॥ यावें शीघ्र भोजना ॥९९॥
ऐसी ऐकूनि अमृतवाणी ॥ भूदेव आनंदले मनीं ॥ अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ पाकसिद्धी करविली ॥१००॥
ऐकूनियां जगज्जीवन ॥ देउळासी आले परतून ॥ रुक्मिणीपासीं वर्तमान ॥ जाहलें तैसें सांगती ॥१॥
म्हणे प्राणवल्लभे ऐक मात ॥ विप्रांसी प्रार्थूनि आलों समस्त ॥ परी कर्मठ अभिमानी आम्हांत ॥ नोळखतीच सर्वथा ॥२॥
माझें देखोनि स्वरूपतेज ॥ तयांसी वाटलें अति चोजे ॥ त्यांणीं कुळवृत्ती ॥ पुसिली मज ॥ म्यां सांगितलें काज सकळिक ॥३॥
मी त्यांसी बोलिलों स्ववाचा ॥ सांगती आहें संतांचा ॥ जिवलग मैत्र नामयाचा ॥ आहें साचा अंतरंग ॥४॥
बिर्‍हाड पुसिलें द्विजवरीं ॥ सांगितलें म्यां देउळाभीतरीं ॥ नाम पुसतांचि सत्वरीं ॥ अनंत ऐसें सांगितलें ॥५॥
ऐसी सांगितली संकेतखूण ॥ परी तयांसी नव्हेचि आठवण ॥ ऐसें बोलूनि जगज्जीवन ॥ हास्यवदन जाहले ॥६॥
रुक्मिणी म्हणे शारंगधरा ॥ सदा भेद तयांचे अंतरा ॥ विद्या अभिमान असतां बरा ॥ जगदुद्धारा न भेटती ॥७॥
याति कुळ पवित्र म्हणवूनी ॥ अनुताप नव्हे त्यांचें मनीं ॥ त्यांसी दर्शन चक्रपाणी ॥ कैशापरी घडेल ॥८॥
कावीळ होतां नेत्रांसी ॥ पीतवर्ण चंद्र भासे त्यासी ॥ कीं नवज्वर असतां शरीरासी ॥ कडवट अन्नासी तो म्हणे ॥९॥
तेवीं कर्मठपणाचा अभिमान ॥ असतां न रुचे भक्तिज्ञान ॥ सद्भावाविण तुमचें दर्शन ॥ नव्हेचि जाण सर्वथा ॥११०॥
निजभाग्येंकरूनि देवदेवा ॥ सांपडलासी वैकुंठींचा ठेवा ॥ आजि नामयाच्या निजदैवा ॥ उजरी जाहली वाटतें ॥११॥
ऐसें बोलतां विश्वजननी ॥ तों नव वर्तलें तये क्षणीं ॥ साहित्य करावया लागूनी ॥ अष्टही सिद्धी पातल्या ॥१२॥
इच्छामात्रें तया अवसरीं ॥येऊनि ठाकल्या महाद्वारीं ॥ त्यांहीं सिद्ध करून सर्व सामग्री ॥ चंदनसडे घातले ॥१३॥
भागवतधर्में समार्जन करूनी ॥ गुढिया उभविल्या वृंदावनीं ॥ नवविध पताका लाविल्या गगनीं ॥ कौतुक नयनीं दाखविलें ॥१४॥
भवनें श्रृंगारूनि सायासें ॥ म्हणती कोण पुण्य केलें विष्णुदासें ॥ निर्गुणासी लाविलें लोभपिसें ॥ विस्मित मानसें सकळांचीं ॥१५॥
मोतियांचे चौक रंगमाळा ॥ दीपावळी उजळिल्या ते वेळां ॥ अभिनव मांडिलासे सोहळा ॥ भक्तप्रेमळाकारणें ॥१६॥
आनंद मांडिला अति गजरें ॥ हर्षें वाजती मंगळतुरें भक्त गर्जती जयजयकारें ॥ स्वानंदभरें तेधवां ॥१७॥
मग नामयास ते वेळे ॥ मंगळमार्जन करविलें ॥ विधिमंत्रोक्त आरंभिलें ॥ पुण्याहवाचन तेधवां ॥१८॥
सत्यभामा राई रुक्मिणी ॥ येती अक्षयवाणें घेऊनी ॥ जैशा विद्युल्लता मेघसदनीं ॥ सतेजपणें चमकती ॥१९॥
मग विष्णुदासासी अहेर ॥ स्वहस्तें करी शारंगधर ॥ वस्त्रें भूषणें अपार ॥ लेववी श्रीधर निजप्रीतीं ॥१२०॥
परमानंदें सुंदरी ॥ कौतुक पाहती नरनारी ॥ जीवेंभावें ते अवसरीं ॥ ओंवाळिती विष्णुदासा ॥२१॥
निजदासाचा संभ्रम ॥ निजांगें करी मेघश्याम ॥ अनाथनाथ सर्वोत्तम ॥ करुणासिंधु दीनांचा ॥२२॥
धन्य नामया तुझी भक्ती ॥ ऐसें समस्त जन बोलती ॥ तुझिया सुखाची अगम्य प्राप्ती ॥ विरिचीसी अगम्य ॥२३॥
तंव पाकनिष्पत्ति जाहली जाण ॥ मग पाचारिले सकळ ब्राह्मण ॥ महाद्वारासी येतां त्यांकारण ॥ दिधलीं आसनें बैसावया ॥२४॥
विप्रपूजा करावयासी ॥ निजांगें बैसलें हृषीकेशी ॥ तंव निर्जर येऊनि आकाशीं ॥ एकमेकांसी बोलती ॥२५॥
म्हणती आपणासी ठकविलें ॥ विष्णुभक्तांनीं सौख्य लुटिलें ॥ अमृतपान करितों भलें ॥ परी अंतरलें प्रेमामृत ॥२६॥
जैसी सलोकता मुक्ति घेतां ॥ तों पुढें अंतरली सायुज्यता ॥ कीं धीटपाठकवित्व पाहतां ॥ तों प्रासादिकता अंतरली ॥२७॥
नातरी नित्यकर्म करितां भलें ॥ तैं नैमित्तिक अंतरलें ॥ कीं कामनिक साधन जों साधिलें ॥ तों निष्काम हातींचें गेलें कीं ॥२८॥
नातरी तीर्थें पाहतां भूमंडळीं ॥ तों मातृसेवा अंतरली ॥ कां क्षुद्र देवतांची सेवा केली ॥ तों विष्णुपूजा गेली हातींची ॥२९॥
कीं आंवतिल्या द्विजां घालितां भोजन ॥ तों अतिथि विमुख गेला जाण ॥ कीं अमरपदीं बैसतां आपण ॥ तों भक्तिप्रेम अंतरलें ॥१३०॥
ऐसें आकाशीं निर्जर ॥ एकमेकांसी करिती प्रत्युत्तर ॥ तों महाद्वारीं शारंगधरें ॥ विप्र पूजेसीं बैसविले ॥३१॥
जांबूनद जें का सुवर्ण ॥ ज्यावरी केलें रत्नकोंदण ॥ ऐसे जडित पाट मांडून ॥ तयांवरी ब्राह्मण बैसविले ॥३२॥
मग आपुले हस्तें रुक्मिणीरमण ॥ करी विप्रांचें चरणक्षालण ॥ पीतांबरें पुसोनि जगज्जीवन ॥ हृदयीं धरी निजप्रीतीं ॥३३॥
अंगुष्ठ लावूनि नेत्रांप्रती ॥ मग स्वस्थानीं बैसवी द्विजपंक्ती ॥ मग तीर्थ सेवूनि निजप्रीतीं ॥ वैकुंठपति संतोषे ॥३४॥
अष्टगंधांची देऊनि उटी ॥ तुळसीमाळा घातल्या कंठीं ॥ कस्तूरीटिळे ललाटीं ॥ लावी जगजेठी स्वहस्तें ॥३५॥
सप्रेम पूजी वैकुंठनायक ॥ दशांगधूप दावी देख ॥ रत्नज्योति उजळोनि दीपक ॥ ओंवाळी देख निजप्रीतीं ॥३६॥
मग दों भागीं मांडोनियां पंक्ती ॥ सुवर्णपात्रें ठेविलीं पुढती ॥ द्विजांसी वाढी रुक्मिणी सती ॥ अनन्यप्रीतीकरूनि ॥३७॥
नानापरींछी दिव्यान्नें जाण ॥ चतुर्विध वाढिलीं संपूर्ण ॥ मग नामयासी पाचारून ॥ संकल्प त्याहातें सोडविला ॥३८॥
भक्त गर्जोनि जयजयकार ॥ म्हणती भोक्ता रुक्मिणीवर ॥ ऐसें म्हणोनि सत्वर ॥ प्राणाहुती घेतल्या ॥३९॥
भर्ता भोक्ता आणि करविता ॥ स्वयें आपणचि जाहला कर्ता ॥ तेथें सकळ पूर्णकामता ॥ कांहीं न्यूनता नसेचि ॥१४०॥
जेथें दिवाकराचें प्रयोजन ॥ तेथें अंधकार येईल कोठून ॥ कीं सरस्वतीचें गायन ॥ ऐकतां निद्रा न येचि ॥४१॥
कीं उदधीचा विवाह होतां ॥ उदकाची करावी कां चिंता ॥ कीं उष्णकाळीं रोहिणीकांता ॥ विंजणा कासया पाहिजे ॥४२॥
कीं लोहघनासी लावितां परिस ॥ मग पुट देणें नलगे त्यास ॥ नातरी इंद्रभुवनीं करितां वास ॥ व्याधि त्यास न होती ॥४३॥
नातरी ज्ञानेश्वरी शुद्ध ग्रंथांत ॥ संशय पाहतां न दिसे तेथ ॥ तेवीं नामयाचे प्रयोजनांत ॥ न्यूनता कोठेंचि दिसेना ॥४४॥
आपण निजांगें रुक्मिणीवर ॥ प्रार्थना करीत वारंवार ॥ वचन ऐकोनि मधुरोत्तर ॥ होती द्विजवर निजसुखी ॥४५॥
म्हणे कवलेंकवलें नाम वाचे ॥ घेत असावें अच्युताचें ॥ सुखरूप भोजन त्या नराचें ॥ असे साचें द्विजवरां ॥४६॥
यापरी आनंदयुक्त मनें ॥ जाहलीं सकळांचीं भोजनें ॥ विप्रांसी करशुद्धि जगज्जीवनें ॥ दिधली असे ते समयीं ॥४७॥
द्विजांसी बैसवूनि आसनीं ॥ विडे दिधले त्रयोदशगुणी ॥ कीं आवडीचें अर्त तये क्षणीं ॥ रूपा आलें मूर्तिमंत ॥४८॥
कीं विष्णुभाग्यें सगुण जाहलें ॥ तें नामयाचे भेटीस आलें ॥ म्हणोनि चिदानंद भलें ॥ उभेंचि भुललें निजप्रीतीं ॥४९॥
मग जोडोनियां दोनी कर ॥ द्विजांसी विनवी शारंगधर ॥ म्हणे तुमचिया दृष्टीसमोर ॥ प्रसाद घ्यावा मज वाटे ॥१५०॥
हेचि माझी असे प्रीती ॥ म्हणूनि स्वामींस करितों विनंती ॥ क्षणैक स्वस्थ होऊनि चित्तीं ॥ कृपामूर्ति बैसावें ॥५१॥
आमुचें भोजन जाहलियावर ॥ मग दक्षिणा देऊं सत्वर ॥ संतुष्ट मानसें अंगीकार ॥ करूनि जावें निजमंदिरा ॥५२॥
मनांत विचारी श्रीपती ॥ आधींच दक्षिणा देतां हातीं ॥ तरी विप्र येथें न बैसती ॥ उठोनी जाती न सांगतां ॥५३॥
जैसे अहेर ओपिल्याविण ॥ सोयरे न जाती लग्नांतून ॥ कीं याचक दान घेतल्याविण ॥ संतुष्टमन न होती ॥५४॥
ऐसें विचारूनि चित्तीं ॥ ब्राह्मणांसी म्हणे श्रीपती ॥ नामयाचे योगें मजप्रती ॥ तुमची सेवा घडली कीं ॥५५॥
तुम्ही केवळ ब्रह्मबीज ॥ ब्रह्मादिकां असां पूज्य ॥ तरी कृपादृष्टीं पाहूनी मज ॥ सांभाऒळावें द्विजवर हो ॥५६॥
ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ विप्रांसी वाटली अमृतवाणी ॥ मग संतुष्ट होऊनि निजमनीं ॥ आनंदभरित जाहले ॥५७॥
मग म्हणती धरामर ॥ तुम्ही श्रमलेती बहु थोर ॥ भोजनास लागला उशीर ॥ करितां उपचार द्विजांचे ॥५८॥
तुम्हीच होऊनि सर्व व्यापक ॥ करणें सार्थक केलें निक ॥ न्यून पदार्थ पाहतां एक ॥ नये दृष्टीसी सर्वथा ॥५९॥
आज दृष्टीस देखिला नवलाव ॥ स्वामीचा आदर अभिनव ॥ नम्रता आणि गौरव ॥ पाहतां दिसे निरुपम ॥१६०॥
मग चहूं वेदींचे ब्राह्मण ॥ महामंत्र उच्चारून ॥ मंत्राक्षता देऊन ॥ आशीर्वचन बोलती ॥६१॥
विजयी होऊन सर्वकाळ ॥ आमचा करावा प्रतिपाळ ॥ आकल्पपर्यंत चिरकाळ ॥ ब्रह्मांडभुवनीं असावें ॥६२॥
पीतांबरीं घेऊनि मंत्राक्षता ॥ घातल्या नामयाचे माथां ॥ म्हणे हेंचि प्रेम तुझिया चित्ता ॥ सर्वकाळ असावें ॥६३॥
आतां वैष्णव घेऊनि निजपंक्तीसीं ॥ भोजन करावे सद्गुणराशी ॥ आम्ही स्वस्थ करूनि मनासी ॥ तुम्हांपाशीं बैसतों ॥६४॥
ऐसें बोलतां धरामर ॥ अवश्य म्हणती शारंगधर ॥ मग सुवर्णपात्रीं ओगरूनि प्रकार ॥ रुक्मिणी सत्वर पातली ॥६५॥
मग कनकपात्र घेऊनि पाहीं ॥ सत्यभामा आली लवलाहीं ॥ आपोशन घालितां ते समयीं ॥ नवल मांडलें अद्भुत ॥६६॥
मग आपुले पंक्तीस शारंगधर ॥ बोलाविले उद्धव अक्रूर ॥ नारद आणि दुजा तुंबर ॥ हें पाथीकर निजपंक्तीं ॥६७॥
नामा उभा महाद्वारीं ॥ त्यासी पाचारिलें सत्वरी ॥ तंव तो नाहीं देहावरी ॥ सप्रेम अंतरीं ओसंडला ॥६८॥
निजबोधें दाटला निश्चित ॥ देखोनि धांवले पंढरीनाथ ॥ जैसी धेनु देखोनि अपत्य ॥ ओरसोनि येत सत्वरी ॥६९॥
मग चहूंभुजीं जगज्जीवन ॥ उचलूनि देत आलिंगन ॥ नामयासी सावध करून ॥ सप्रेम क्षेम दीधलें ॥१७०॥
मग धरूनि बाहुवटीं ॥ भोजनासी बैसविला ताटीं ॥ स्फुंदोनि होतसे हिंपुटी ॥ तेव्हां जगजेठी कुरवाळी ॥७१॥
स्वानंदग्रास घालितां मुखीं ॥ तंव तो तन्मय परम लक्षी ॥ निजबोधरूपें एकाएकीं ॥ होऊनि अंतरीं निश्चित ॥७२॥
मग धरूनि गरुडध्वज ॥ नामयसी सांगे गोष्ट गुज ॥ म्हणे जिवलगा गोष्टी बोल मज ॥ द्वैतलाज टाकोनि ॥७३॥
अंतरींचें गुज पाहतां स्पष्ट ॥ तरी गगनासी नाहीं पाठपोट ॥ तैसाचि मजसीं एकवट ॥ अससी निकट नामया ॥७४॥
तुझें तेंचि जाण माझें ॥ माझें तेंचि असे तुझें ॥ एकविधचि दिसे सहजें ॥ नामया समजें अंतरीं ॥७५॥
परतोनि दृष्टी मजवरी ॥ जिवलगा पाहें निजअंतरीं ॥ मी जो अव्यक्त निर्धारीं ॥ तो तूंचि आहेसी वाटतें ॥७६॥
हा तुझा अद्भुत सोहळा ॥ दृष्टीस पाहें उघडोनि डोळां ॥ ज्ञानदीप आहे कीं जवळा ॥ भक्त प्रेमळा तुजपासीं ॥७७॥
तुझिये भेटीकारणें ॥ वर्षें पातले भक्तराणे ॥ तयांसी करीं सुखाचें पारणें ॥ अमृतवचनें बोलोनि ॥७८॥
केवळ परमानंदमूर्ती ॥ तोचि हा जाण निवृत्ती ॥ सर्व सुखाचा सांगाती ॥ ज्ञानदेव दृष्टीं पाहें तूं ॥७९॥
परत्र हा सोपानेश्वरू ॥ केवळ परलोकींचें तारूं ॥ भाग्यवंता याचा आदरू ॥ अमृतवचनें करावा ॥१८०॥
ऐसें म्हणोणि रुक्मिणीवरें ॥ नामयासी आश्वासिलें करें ॥ तेणें मस्तक आदरें ॥ चरणांवरी ठेविला ॥८१॥
म्हणे जन्मोजन्मीं प्रेमदान ॥ हेंचि देई मजकारण ॥ ऐसें ऐकोनियां वचन ॥ जगज्जीवन हांसले ॥८२॥
ऐसा तो भक्तवत्सल ॥ नामयामुखीं घाले कवळ ॥ शीणभाग पुसे गोपाळ ॥ दीनदयाळ दासांचा ॥८३॥
जो सनकादिकांचे शिरीं ॥ अभय हस्त ठेवीत हरी ॥ त्या हस्तेंचि पूतनारी ॥ नामयासी कुरवाळी ॥८४॥
नामयासी म्हणे वनमाळी ॥ सांडीं जीवींची सर्व काजळी ॥ विश्रांतीसी आहें मी जवळी ॥ तुज सांभाळीन सर्वदा ॥८५॥
मार्गीं कष्ट झाले फार ॥ वियोगयोगें वाळलें शरीर ॥ उतरोनि गेला मुखचंद्र ॥ नेत्र निसूर जाहले कीं ॥८६॥
तहान भूक नेणेचि कोणी ॥ दूर गेलासी जैंपासूनी ॥ तुजविण आवडेना नयनीं ॥ दुजें कांहींच मजलागीं ॥८७॥
धीर न धरवे म्हणोनी ॥ दाही दिशा अवलोकीं नयनीं ॥ माझा विष्णुदास नाम ग्येऊनी ॥ कधीं भेटेल म्हणतसें ॥८८॥
उतावीळ होऊनि अंतरीं ॥ तुजला पहातसें गरुडाधारीं ॥ न दिससी म्हणोनि महाद्वारीं ॥ भीमातीरीं पहातसें ॥८९॥
नाहींतरी पद्मतीर्थपदीं ॥ तुजला पहातसे वेणुनादीं ॥ कोठें न लागतां तुझी शुद्धी ॥ वाटे खंती मज फार ॥१९०॥
मी भोजना बैसतां जगज्जीवन ॥ कीं अनुदिनीं करितां अमृतपान ॥ तैं होय तुझी आठवण ॥ येशील धांवून म्हणूनियां ॥९१॥
उतावीळ धांवून येसी ॥ सप्रेम आलिंगन मज देसी ॥ कीं जीवींचें निजगुज सांगसी ॥ हे च्छा मानासी धरितसें ॥९२॥
ऐसें बोलतां कृपावंतें ॥ करुणारसा दाटलें भरतें ॥ जेवीं जननीस बालक होय आवडतें ॥ देखोनि तें संतोषें ॥९३॥
तयाच रीतीं वैकुंठराणा ॥ नामयासी वर्षला प्रेमपान्हा तो ब्रह्मरस सेवितां जाणा ॥ नये वीट सर्वथा ॥९४॥
ऐशा रीतीं चक्रपाणी ॥ निजभक्ताची पुरवी आइणी ॥ मग कौतुक मांडिलें ये क्षणीं ॥ तें परिसा कानीं भाविक हो ॥९५॥
नामयाचें उच्छिष्ट ते वेळीं ॥ आवडीनें खात वनमाळी ॥ हे देखोनि विस्मित विपकंडळीं ॥ अधोवदनें पाहती ॥९६॥
आश्चर्य मानोनि धराभर ॥ एकमेकंसी देती प्रत्युत्तर ॥ आता काय करावा विचार ॥ बुडविलें साचार निजकर्म ॥९७॥
याच्या स्त्रियांनीं वाढिलें अन्न ॥ नेणवे जातीचा आहे कोण ॥ नव्हे क्षत्रिय ना ब्राह्मण ॥ विअश्य शूद्रही न म्हणवे ॥९८॥
याची अघटित आहे कळा ॥ दिसे चहूवर्णांवेगळा कैसी हे विस्मृति पडली सकळां ॥ अनुपम लीला देखोनी ॥९९॥
आतां हाचि पितांबरीं ॥ घातल्या त्या नाम्याचे शिरीं ॥ संकल्प सोडितां झडकरी ॥ त्यासी पुढारी केलें कीं ॥१॥
बरें अरिष्ट होतें निर्माण ॥तेचि आलें कीं घडोन ॥ आतां कोणी कोणास प्रतिवचन ॥ बोलूं नये सर्वथा ॥२॥
पुढील अध्यायीं शारंगधर ॥ द्विजांसी बोलेल उत्तर ॥ सिद्धांतज्ञानी श्रोते चतुर ॥ परिसा चित्त देऊनि ॥३॥
जैसा हिरा बुडे अहिरणीं ॥ तयास हिरकणी बाहेर काढित ॥ तेवीं अनुभवज्ञानें सभाग्य संत ॥ तेचिक जाणती निजखूण ॥४॥
अन्नापरीस क्षुधाचि गोड म्हणूनि आर्ताचें पुरें कोड ॥ अंतःकरणीं जरी नसती चाड ॥ तरी न लागती गोड हरिकथा ॥५॥
हे तीर्थावळीची टीका सार ॥ तुजविता श्री रुक्मिणीवर ॥ महीपति तयाचा दास किंकर ॥ म्हणवी साचार निजप्रेतीं ॥६॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां वाटेल तुष्टेल ज्गन्नाथ ॥ प्रेमळ भाविकास ॥ त्रयोदशाध्याय रसाळ हा ॥२०७॥
॥ अध्याय ॥१३॥ वोंव्या ॥२०७॥    ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥
॥ श्रीभक्तविजय त्र्योदशाध्याय समातप्त ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री भक्तविजय अध्याय १२