Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री भक्तविजय अध्याय ३५

Webdunia
श्रीगणेशायः ॥ श्रीगोवर्धनोद्धरणाय नमः ॥    ॥
ऐका श्रोते हो नवल अद्भुत ॥ भक्तकथा सेवितां परमामृत ॥ जीवासी तत्काळ येईल प्रचीत ॥ भवरोग त्वरित निरसेल ॥१॥
जगन्नाथीं राजा एक ॥ नांव तयाचें सात्विक ॥ देवाविण पदार्थ आणिक ॥ त्याचें चित्तासी नावडे ॥२॥
वड्याजगन्नाथ क्षेत्र जाण ॥ मृत्युलोकीं साक्षात वैकुंठभुवन ॥ जेथें बौद्धावतार जगज्जीवन ॥ लीला संपूर्ण पाहातसे ॥३॥
तो पूर्वसमुद्रीं नृपराज ॥ तयासी सात्विक नाम साज ॥ जयासी अखंड गरुडध्वज ॥ सुप्रसन्न सर्वदा ॥४॥
त्रिकाळ पूजासमय साधून ॥ राजा तेथें बैसे येऊन ॥ तुळसी प्रसाद घेऊन ॥ त्यावरी भोजन करीतसे ॥५॥
वस्त्रें अलंकार भूषण ॥ देवासी नैवेद्य पक्वान्न ॥ आलिया अतीतासी अन्न ॥ राजा आपण देतसे ॥६॥
नंदादीप अन्नछत्र ॥ दान देणें पाहूनि पात्र ॥ अन्न उदक तों सर्वत्र ॥ प्राणीमात्रीं देतसे ॥७॥
तंव कोणेएके अवसरीं ॥ राजा बैसला महाद्वारीं ॥ काळ क्रमावया सत्वरी ॥ द्यूतकर्म खेळतसे ॥८॥
फांसे टाकितां हास्य करी ॥ देहभान नाहीं अंतरीं ॥ तंव प्रसाद वांटीत महाद्वारीं ॥ सत्वर पुजारी पातले ॥९॥
प्रसाद घ्यावयासी नृपनाथ ॥ पुढें करी डावा हात ॥ पुजारियासी विपरीत ॥ वाटलें निश्चित्त तेधवां ॥१०॥
वामहस्तें घेतो म्हणोन ॥ पुजारी गेला परतोन ॥ द्यूत सरतां राजा आपण ॥ प्रसाद लोकांसी पुसत ॥११॥
ते म्हणती मघांचि वांटिला ॥ तुम्हीं वामहस्त पुढें केला ॥ पुजारी न देतां परतोनि गेला ॥ ऐकोनि दचकला नृपनाथ ॥१२॥
माझें पूर्वकर्म विपरीत जाण ॥ पुढें द्यूतरूपें ठाकलें येऊन ॥ अमृत टाकूनि मद्यपान ॥ केलें मजला वाटतसे ॥१३॥
कीं सिंदीसी घालूनियां पाणी ॥ कल्पतरूस दवडिला सुकवूनी ॥ द्यूत खेळतां तैसी करणी ॥ जाहली मजला वाटतें ॥१४॥
नातरी कोळसे वेंचितां जाण ॥ निधान गेलें हरपोन ॥ द्यूत खेळतां मजकारण ॥ तैसेंच जाहलें वाटतसे ॥१५॥
कीं राख घेतां ओंजळभरी ॥ तो उडोनि गेली कस्तूरी ॥ द्यूत खेळतां तैसी परी ॥ जाहली मजला वाटतें ॥१६॥
राजहंस दवडोनि काग पाळीला ॥ चंदन तोडोनि हिंगण लाविला ॥ द्यूत खेळतां मजला ॥ तैसें जाहलें वाटतें ॥१७॥
नातरी मातंग पाहतां जाण ॥ तों विप्र गेला उठोन ॥ द्यूत खेळतां तैसें कारण ॥ जाहलें मज वाटतें ॥१८॥
राजा अनुतापला भारी ॥ न जाय राउळाभीतरी ॥ सेवाचोर म्हणोनि द्वारीं ॥ उगा तिष्ठत बैसला ॥१९॥
म्हणे स्वकरें म्यां केला अन्याय बहुत ॥ यासी शिक्षा करावी त्वरित ॥ ऐसें म्हणोनि नृपनाथ ॥ अंतरीं युक्त योजिली ॥२०॥
मग बोलावूनि प्रधानासी ॥ विचार सांगे तयासी ॥ मी रात्रीं निजतों मंदिरासी ॥ पिशाच तेथें येतसे ॥२१॥
हात घाली गवाक्षद्वारीं ॥ मजला भय वाटतें भारी ॥ तरी तूं राहूनि मंचकाशेजारीं ॥ हस्त छेदीं तयाचा ॥२२॥
प्रधान म्हणे आज्ञा प्रमाण ॥ पिशाच येतां हस्त छेदीन ॥ मग तीक्ष्ण शस्त्र करीं घेऊन ॥ रात्रीं लपोन बैसला ॥२३॥
दीपक जळती मंदिरांत ॥ प्रधान जागृत वाट पाहात ॥ कीं पिशाच आलिया त्वरित ॥ हस्त निश्चित छेदीन ॥२४॥
तंव आपुला हस्त ते अवसरीं ॥ राजा घाली गवाक्षद्वारीं ॥ प्रधानें शस्त्र घेऊनि करीं ॥ तोडूनि झडकरी टाकिला ॥२५॥
हस्त खालीं पडतांचि जाण ॥ प्रधान ओळखी आपण ॥ गहिंवरें दाटला पूर्ण ॥ अंग धरणीं टाकिलें ॥२६॥
अट्टाहास्यें शोक करी ॥ तों राजा पातला भीतरी ॥ म्हणे माझा होता वैरी ॥ म्हणोनि म्यां हा तोडविला ॥२७॥
तुझें स्वस्थ असों दे चित्त ॥ मग शिबिकेंत घालोनि हस्त ॥ दूताहातीं पाठवीत ॥ महाद्वारीं तेधवां ॥२८॥
म्हणे महाद्वारीं जाऊनि आतां ॥ निरोप सांगा जगन्नाथा ॥ माझिया अपराधाची गणिता ॥ रुक्मिणीकांता ऐक तूं ॥२९॥
फांसे खेळतां दुर्बुद्धी ॥ तुझा प्रसाद न घे कधीं ॥ ऐसा तुमचा अपराधी ॥ तुम्हांजवळी पाठविला ॥३०॥
कर्मेंद्रियांत केवळ ॥ मज अपराधी भासला कर ॥ शिक्षा करूनि सत्वर ॥ तुम्हांजवळी पाठविला ॥३१॥
अपराधी नसतां भलत्यासी मारी ॥ केली असेल कधीं तुमची चोरी ॥ मग दंड करोनि झडकरी ॥ तुम्हांजवळी पाठविला ॥३२॥
मदोन्मत्त हा वनामधीं ॥ खेळला असेल कधीं पारधी ॥ ऐसा तुमचा अपराधी ॥ तुम्हांजवळी पाठविला ॥३३॥
नाहीं केलें तुझें अर्चन ॥ बहु हिंसक खळ दुर्जन ॥ ऐसा हा दुराचारी परिपूर्ण ॥ तूं पुरुषोत्तमा जाणसी ॥३४॥
नाहीं केली संतसेवा ॥ अर्चिलें नाहीं तुज केशवा ॥ ऐसा जो पापी हस्त बरवा ॥ तुम्हांजवळी पाठविला ॥३५॥
कळेल तैसी यासी यातां ॥ शिक्षा करावी जगन्नाथा ॥ ऐसा निरोप सांगोनि दूतां ॥ देवद्वारीं पाठविलें ॥३६॥
मग महाद्वारीं हस्त नेऊन ॥ देवासी सांगती वर्तमान ॥ जयजयकारें बुका सुमन ॥ वैष्णव त्यावरी उधळिती ॥३७॥
म्हणती धन्य हा नृपनाथ ॥ प्रपंचीं असूनियां विरक्त ॥ देवावरीं घालोनियां निमित्त ॥ टाकिला हस्त तोडोनि ॥३८॥
येवरीं नाशवंत शरीर ॥ असंख्य मिळती नारीनर ॥ परी चित्तीं धरूनि जानकीवर ॥ सार्थक साचार न करिती ॥३९॥
करावया शिश्नोदरपोषण ॥ देश फिरती बहुत जन ॥ भलतें निमित्तें वेंचिती प्राण ॥ परी ईश्वरभजनीं न मरती ॥४०॥
नवज्वर होतांचि अंगीं ॥ चवदा लंघनें करिती रोगी ॥ परी एकादशी अभागी ॥ सुकृत जनीं न करिती ॥४१॥
व्यवहारांत कवडी हारपतां जाण ॥ सुहृद सखे करिती भांडण ॥ परी निर्लज्ज होऊनि हरीचे गुण ॥ प्राक्तनहीन न गाती ॥४२॥
तस्करें हिरूनि नेतां संपत्ती ॥ हात चोळोनि उगेच राहाती ॥ परी सत्पात्रीं वेंचोनि कुमती ॥ सार्थ्क न करिती सर्वथा ॥४३॥
हा कलीचा धर्म साचार ॥ मायलोभी असती फार ॥ निष्ठावंत सात्विक नृपवर ॥ कळलें साचार आम्हांसी ॥४४॥
ऐसें संत वैष्णवजन ॥ एकमेकांसी बोलती वचन ॥ तों अद्भुत वर्तलें जाण ॥ तें परिसा सज्जन निजप्रीतीं ॥४५॥
राजयानें हस्त तोडिला ॥ त्याचा अकस्मात दवणा जाहला ॥ पुष्पवाटिकेंत लाविला ॥ नेऊनियां तत्काळ ॥४६॥
मग हरिप्रसाद घेऊन ॥ पूजारी देत प्रीतीकरून ॥ राजयासी नाहीं देहभान ॥ थोटाचि हात ओढविला ॥४७॥
पुढें करितांचि सत्वर ॥ पहिलेसारिखा जाहला कर ॥ भक्त गर्जती जयजयकार ॥ आश्चर्य थोर करोनि ॥४८॥
आणिक ऐका भाविकजन ॥ कथा रसाळ निरूपण ॥ श्रवणीं पडतां त्रितापहरण ॥ संशयखंडन होतसे ॥४९॥
जे जगन्नाथीं भगवान ॥ बौद्धरूपें नांदतसे जाण ॥ अखंड वसती भक्तजन ॥ महाक्षेत्र म्हणोनि ॥५०॥
ब्राह्मणस्त्री कर्माबाई ॥ तिचें चित्त हरीचे पायीं ॥ ती गरोदर असतां पाहीं ॥ भ्रतार शांत जाहला ॥५१॥
शोक करीत अपार ॥ कष्टी होतसे थोरथोर ॥ तंव पुत्र जाहला सत्वर ॥ नवमास भरतांचि ॥५२॥
म्हणे देवाधिदेवा जगन्नाथा ॥ तुझा भक्त तूं वांचवीं आतां ॥ पुत्र दिवसेंदिवस वाढतां ॥ केलें लग्न तयाचें ॥५३॥
तयाची स्त्री गरोदर जाहली ॥ कर्माबाई संतोषली ॥ नातू होतांचि ते वेळीं ॥ पुत्र गेला मरूनि ॥५४॥
रात्रंदिवस शोक करी ॥ सवेंचि मनासी आवरी ॥ म्हणे एवढा झील वांचेल जरी ॥ तरी कामा येईल मजलागीं ॥५५॥
त्याचा सांभाळ रात्रंदिवस ॥ कर्माबाई करी विशेष ॥ आसनीं शयनीं भोजनीं त्यास ॥ पुत्रबाळकास विसंबेना ॥५६॥
ऐसें लोटतां बहुत दिवस ॥ काळें नेलें त्या मुलास ॥ कर्माबाईचें चित्तास ॥ स्वस्थ कोठें वाटेना ॥५७॥
रात्रंदिवस शोक करी ॥ म्हणे कृपावंता श्रीहरी ॥ दुःखरूप त्या संसारीं ॥ मज कासयास घातलें ॥५८॥
तंव अकस्मात साधुसंत ॥ जगन्नाथीं यात्रेसी येत ॥ कर्माबाईच्या मंदिरांत ॥ बिर्‍हाड तयांनीं घेतलें ॥५९॥
चिंताक्रांत ते देखोन ॥ संतीं पुसिलें वर्तमान ॥ जाहलें तैसेंच निवेदन ॥ कर्माबाई करीतसे ॥६०॥
वैष्णव म्हणती ते समयीं ॥ दुःखरूप संसार पाहीं ॥ येथें अणुमात्र सौख्य नाहीं ॥ निश्चयेंसीं जाणिजे ॥६१॥
ढेकुणांचे बाजेवरी ॥ निद्रा निवांत लागेल जरी ॥ तरीच सौख्य या संसारीं ॥ स्वप्न दृष्टीं देखिजे ॥६२॥
कीं मृगजळाचिये पूरीं ॥ तृषाक्रांत निवेल जरी ॥ तरीच सौख्य या संसारीं ॥ स्वप्न दृष्टीं देखिजे ॥६३॥
नातरी विष प्राशितां उदरीं ॥ आयुष्यहीन वांचेल जरी ॥ तरीच सौख्य या संसारीं ॥ स्वप्न दृष्टीं देखिजे ॥६४॥
कीं बधिरासी सांगतां कथानक ॥ सौख्य पावेल पुराणिक ॥ तरीच संसारी अक्षय सुख ॥ स्वप्न दृष्टीं देखिजे ॥६५॥
आतां सावध होईं त्वरित ॥ संसार अवघा नाशवंत ॥ ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ द्रवलें चित्त तियेचें ॥६६॥
कर्माबाई म्हणे साधुसंतां ॥ सांगाल तैसें ऐकेन आतां ॥ मग ते म्हणती जगन्नाथा ॥ रात्रंदिवस भजावें ॥६७॥
अधिकार तैसा उपदेश ॥ साधु सांगती जनास ॥ उद्धरावया पतितांस ॥ मृत्युलोकीं अवतरले ॥६८॥
श्रीहरीचें गुणकीर्तन ॥ जनासी करवावया श्रवण ॥ प्रेमसुख द्यावयाकारण ॥ मृत्युलोकीं अवतरले ॥६९॥
जड मूढ जे अज्ञान ॥ त्यांसी सांगावें दिव्य ज्ञान ॥ झाडावया दुर्जनांचा मान ॥ आले सज्जन मृत्युलोकीं ॥७०॥
भक्तिमार्ग होईल मलिन ॥ प्रपंचीं बुडेल अवघा जन ॥ यास्तव कलियुगीं वैष्णवजन ॥ मृत्युलोकीं अवतरले ॥७१॥
असो आतां कर्माबाई ॥ लागली संतांचिया पायीं ॥ गोपाळमूर्ति काढूनि तिहीं ॥ तिजकारणें दिधली ॥७२॥
वैष्णव म्हणती ते समयीं ॥ याची सेवा करीत जायीं ॥ जेवीं आवडीं पुत्राठायीं ॥ तैसीच येथें असों दे ॥७३॥
ऐसें सांगूनि तियेसी ॥ साधु गेले तीर्थवासी ॥ कर्माबाईच्या चित्तासी ॥ सुख बहुत वाटलें ॥७४॥
खेळवीत होती नातवंड ॥ तैसेंचि देवाचें लागलें वेड ॥ देखतां घेऊनि इडपीड ॥ करीतसे कोड निजप्रीतीं ॥७५॥
उष्णोदक घेऊनि त्वरेंसीं ॥ पायांवरी न्हाणी बाळकासी ॥ पालखांत निजवूनि देवासी ॥ मोहें तयासी हालवी ॥७६॥
वस्त्रें भूषणें तयाप्रती ॥ लेववीत असे निजप्रीतीं ॥ अन्य पदार्थ कांहीं चित्तीं ॥ कृष्णमूर्तिविण नावडे ॥७७॥
दहींभात घालोनि ताटीं गोपाळमूर्तीसी सांगे गोष्टी ॥ जेवीं जेवीं बा जगजेठी ॥ क्षुधित पोटीं जाहलासी ॥७८॥
भक्तिभाव देखोनि हरी जेवूं लागला तिचें घरीं ॥ तों अग्निहोत्री ब्राह्मण द्वारीं ॥ येऊनि सत्वरीं उतरले ॥७९॥
प्रातःकाळीं उठोन ॥ देवासी घालितां भोजन ॥ द्विजवर करिती तिजला प्रश्न ॥ वर्तमान सांगतसे ॥८०॥
ब्राह्मण म्हणती ऐक वचन ॥ कर्माबाई चित्त देऊन ॥ स्नान करूनियां जान ॥ श्रीकृष्णपूजन करावें ॥८१॥
ओंवळीयानें नैवेद्य दाविसी ॥ तो कदा न माने देवासी ॥ ऐकूनि उत्तर बोले तयांसी ॥ आतां ऐसें करीन ॥८२॥
दुसरे दिवसा उठोनि जाण ॥ सडासंमार्जन करून ॥ उदक अनसुट आणोन ॥ स्वयंपाकासी निघाली ॥८३॥
उशीर जाहला कर्म सारितां ॥ क्षुधा लागली जगन्नाथा ॥ स्वप्नीं जाऊनि एकांतां ॥ पूजार्‍यासी सांगितलें ॥८४॥
कर्माबाईचें घरीं ॥ कर्मठ ब्राह्मण उतरले द्वारीं ॥ विकल्प घालोनि अंतरीं ॥ आपण गेले सत्वर ॥८५॥
सोंवळें सांगितलें फार ॥ नैवेद्यासी होतो उशीर ॥ तुम्हीं जाऊनि सत्वर ॥ तुजकारणें सांगिजे ॥८६॥
परमात्मा शुद्धचैतन्य ॥ मायातीत आत्माराम ॥ त्यासी कर्माचें बंधन ॥ कदाकाळीं बाधेना ॥८७॥
करूनि अकर्ता साक्षीभूत जाण ॥ अवतार धरी भक्तांकारण त्यासी कर्माचें बंधन ॥ कदाकालीं बाधेना ॥८८॥
विश्वव्यापक जगज्जीवन ॥ उपदेशितां सिद्धांतज्ञान ॥ त्यासी कर्माचे बंधन ॥ कदाकाळीं बाधेना ॥८९॥
पूजारी जाऊनि सांगती तिजला ॥ कर्माबाईनें नैवेद्य आणिला ॥ सर्वांदेखतां हरि जेविला ॥ तिच्या हस्तेंकरूनि ॥९०॥
जयजयकारें पिटिली टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ सोंवळे ब्राह्मण ते वेळीं ॥ नवल करिती देखोनि ॥९१॥
म्हणती अग्निहोत्रादि यज्ञयाग ॥ तेथें न ये हा श्रीरंग ॥ तो कर्माबाईचिया संग ॥ जेवितो हें नवल कीं ॥९२॥
ब्रह्मादि शंकर जयातें ॥ अखंड ध्याती हृदयांत ॥ तो कर्माबाईचिया हातें ॥ जेवितो हें नवल कीं ॥९३॥
नाना योग नाना मतें ॥ अखंड धुंडिती जयातें ॥ तो कर्माबाईचिया हस्तें ॥ जेविला हें नवल कीं ॥९४॥
एक म्हणती भक्तमहिमान ॥ वर्णूं न शके चतुरानन ॥ कर्माबाईचे वंदिती चरण ॥ सकळ जन तेधवां ॥९५॥
अद्यापि जग्न्नाथक्षेत्रांत ॥ साक्ष चालवी जगन्नाथ ॥ कर्माबाईची खिचडी येत ॥ मग नैवेद्य त्वरित दाखविती ॥९६॥
पुढें सुरस निरूपण ॥ जनजसवंत भक्त जाण ॥ महीपति म्हणे अवधान ॥ द्यावें सज्जनीं निजप्रीतीं ॥९७॥
स्वस्ति श्रीभक्तविजयग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ पंचत्रिंशाध्याय रसाळ हा ॥९८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments