Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री भक्तविजय अध्याय ३७

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीवल्लभाय नमः ॥    
श्री भीमातीरवासी रुक्मिणीकांता ॥ तूं निजबुद्धीचा प्रकाशिता ॥ तुजविण आणिक अनंता ॥ वक्ता वदविता नसेचि ॥१॥
जैसें वृक्षासी कारण मूळ ॥ कीं धान्य पिकवित एक जळ ॥ तेवीं भक्तकथा अति रसाळ ॥ तूं घननीळ वदविसी ॥२॥
नातरी जलचरांसी कारण उदधी ॥ कीं उडुगणांसी असे आकाशसंधीं ॥ तेवीं माझी अत्यंत मंदबुद्धी ॥ तूं कृपानिधी प्रकाशिता ॥३॥
कीं सूत्रधारी धरून दोरी ॥ बाहुल्यानाचवी सभेभीतरीं ॥ तेवीं तूं रिघोनी हृदयमंदिरीं ॥ निजभक्तथोरी वर्णविसी ॥४॥
तुझे न वर्णितां गुण ॥ उदंड कवित्व केलें लेखन ॥ तरी व्यर्थ वाचेसी आणिला शीण ॥ ऐसें दिसोन येतसे ॥५॥
म्हणोनियां पुढतपुढती ॥ तुज प्रार्थितसें श्रीपती ॥ सप्रेम चित्तें महीपती ॥ मागे ग्रंथ वदावया ॥६॥
मागिले अध्यायीं निरूपण ॥ सुरदास भक्त मदनमोहन ॥ त्याचें चरित्र अति गहन ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥७॥
आतां रसिकमुरार भक्त थोर ॥ तो संतसेवेसी अति तत्पर ॥ मथुराप्रांतीं साय नगर ॥ तेथें निरंतर वसतसे ॥८॥
यमुनातीरीं करूनि स्नान ॥ त्यावरी करी श्रीकृष्णपूजन ॥ षोडशोपचार साहित्य करून ॥ पुष्पें तुळसी अर्पीतसे ॥९॥
मग बोलावून वैष्णवजन ॥ स्वहस्तें करी चरणक्षालन ॥ तें तीर्थ निजमुखीं घेऊन ॥ मग संतपूजन करीतसे ॥१०॥
नानापरींचीं पक्वान्नें करून ॥ नित्य संतांसी घाली भोजन ॥ संतमूर्ति विष्णुसमान ॥ मानित मनें निजप्रीतीं ॥११॥
शिष्यसंप्रदायी केले बहुत ॥ ते साहित्य करिती नित्यनित्य ॥ आपण एकांतीं बैसोनि निवांत ॥ भजन करीत सप्रेम ॥१२॥
तंव कोणे एके दिवसीं ॥ वैष्णव आले मंदिरासी ॥ मग तृणासनें सकळांसी ॥ बैसावयासी दिधलीं ॥१३॥
शिष्यासी सांगे ते अवसरीं ॥ संतपूजन करावें सत्वरीं ॥ तीर्थ आणून आपुले करीं ॥ द्यावें झडकरीं मजलागीं ॥१४॥
आज्ञा होतांचि ते समयीं ॥ संतपूजेसी चालिला पाहीं ॥ आळस विकल्प धरूनि देहीं ॥ चरण लवलाहीं धूतसे ॥१५॥
तंव एक कोडी कुश्चळ ब्राह्मण ॥ पाय फुटके अति मलिन ॥ वस्त्र फाटकें बहुत जीर्ण ॥ अमंगळवाणें नेसला ॥१६॥
तो दृष्टीं देखतांचि जाण ॥ चिळसलें त्याचें तत्काळ मन ॥ म्हणे याचे धुवोन घेतां चरण ॥ होईल वमन तत्काळ ॥१७॥
जे सज्ञान शुचिर्भूत दिसती ॥ त्यांचे चरण धूतसे प्रीतीं ॥ पूजा करूनि यथापद्धती ॥ केली आरती संतांसी ॥१८॥
चरणतीर्थ घेऊनि सत्वरी ॥ सद्गुरूसी दिधलें त्या अवसरीं ॥ मग मुरारदास झडकरी ॥ प्राशन करी तेधवां ॥१९॥
तेव्हां सकळ संप्रदायी बोलावून ॥ त्यांस सांगे जीवींची खूण ॥ आजिचें तीर्थ केलें प्राशन ॥ परी त्याजकारण चवी नाहीं ॥२०॥
कोणी संशय चित्तीं धरून ॥ घेतलें असेल तीर्थ जाण ॥ मजला कळली अंतरखूण ॥ ऐसें वचन बोलिला ॥२१॥
आजि फिकें लागलें चरणामृत ॥ ऐसें व्हावया काय निमित्त ॥ विचार करून तुम्ही समस्त ॥ सांगा त्वरित मजपासीं ॥२२॥
ऐकोनि सद्गुरूची वाणी ॥ सकळांसी विचार पडिला मनीं ॥ त्यांत जो लागला होता संतपूजनीं ॥ तो आपुलें मनीं चमत्कारला ॥२३॥
मग पुढें होऊनि सत्वर ॥ उभा ठाकला त्यासमोर ॥ जोडोनियां दोन्ही कर ॥ वृत्तांत साचार सांगतसे ॥२४॥
म्हणे ऐका स्वामी यथार्थ वचन ॥ मी करीत होतों संतपूजन ॥ त्यांत एक कोडी कुश्चळ ब्राह्मण ॥ देखोनि मन कंटाळलें ॥२५॥
मानसीं चिळस वाटली फार ॥ मग त्याचा करूनि अव्हेर ॥ सकळ पूजोनि वैष्णववीर ॥ आलों सत्वर स्वामिया ॥२६॥
मग मुरारस्वामी तये वेळीं ॥ तत्काळ गेला त्याजवळी ॥ नमस्कार घालोनि भूमंडळीं ॥ चरण प्रक्षाली निजकरें ॥२७॥
स्वहस्त्रें पुसोनियां चरण ॥ हृदयीं धरिला प्रेमेंकरून ॥ चरणांगुष्ठ नेत्रांसी लावून ॥ तीर्थ प्राशिलें आवडी ॥२८॥
म्हणे आतां तीर्थासी लागली चव ॥ ऐकोनि आश्चर्य करिती वैष्णव ॥ म्हणती मुरारस्वामीचा भाव ॥ न कळे स्वयमेव कोणासी ॥२९॥
ऐसें गुरुकृपेचें महिमान ॥ एक सच्छिष्य जाणे खूण ॥ कीं चंद्रामृताचा अनुभव पूर्ण ॥ चातकां धडून येतसे ॥३०॥
कां निजपतीच्या मनोगता ॥ जाणे एक ते पतिव्रता ॥ नातरी प्रेमळ भक्तांची ऐकतां कथा ॥ अनुभव विरक्तां जाणवे ॥३१॥
कां कमलपुष्पांचा स्वाद ॥ अनुभवें जाणता एक मिलिंद ॥ कीं गायत्रीचा महिमा अगाध ॥ गाधिसुत जाणतसे ॥३२॥
कीं श्रीरामनामाची प्रचीत ॥ जाणतसे एक कैलासनाथ ॥ कीं भागवतधर्ममहिमा अद्भुत ॥ विष्णुभक्त जाणती ॥३३॥
तेवीं संततीर्थींची निजगोडी ॥ मुरारस्वामीसी कळली फुडी ॥ याजऐसी आणिका आवडी ॥ न लागे चोखडी सर्वथा ॥३४॥
ऐसें म्हणूनि वैष्णवभक्त ॥ मस्तकीं ठेविती वरदहस्त ॥ म्हणती तुज साह्य श्रीकृष्णनाथ ॥ होईल त्वरित निजनिष्ठें ॥३५॥
भाव धरूनि संतचरणीं ॥ तीर्थस्वाद कळला मनीं ॥ रसिकमुरार तैंपासूनी ॥ नाम सकळांनीं ठेविलें ॥३६॥
त्याचा गुरु दयार्णव जाण ॥ तो ब्रह्मज्ञानीं अति निपुण ॥ अर्चन पूजन यथाविधीन ॥ करीतसे जाण निजप्रीतीं ॥३७॥
गंडकीशिळेची मूर्ति सुंदर ॥ तिजला पूजोनि षोडशोपचार ॥ वस्त्रें भूषणें अलंकार ॥ लेववी साचार निजभावें ॥३८॥
तेथें एक राजा दर्शनासी येऊन ॥ पूजा देखोनि संतुष्टमन ॥ चार ग्राम तयालागून ॥ दिधले लिहून तेधवां ॥३९॥
दयार्णवासी म्हणे नृपनाथ ॥ हे ग्राम पूजार्थ दिधले तुम्हातें ॥ याचें द्रव्य उकळोनि समस्त ॥ साधुसंत पूजावे ॥४०॥
ऐसें बोलोनि सत्वरीं ॥ राजा गेला आपुलें नगरीं ॥ दयार्णव निजअंतरीं ॥ आश्चर्य करी तेधवां ॥४१॥
म्हणे आपुले पूजेसी त्वरित ॥ उपाय करी श्रीकृष्णनाथ ॥ यापरी संतोष मानूनि मनांत ॥ अर्चन करीत हरीचें ॥४२॥
बहुत दिवस चालिलें व्रत ॥ तों विघ्न ओढवलें अकस्मात ॥ एक दुष्ट होता उन्मत्त ॥ आला अवचित त्या ग्रामा ॥४३॥
द्रव्य देऊनि राजद्वारा ॥ केला देशींचा इजारा ॥ सदना घेऊनि सत्वरा ॥ वैष्णवनगरा पैं आला ॥४४॥
दयार्णवाची जहागीर ऐकून ॥ जप्त करी तो दुर्जन ॥ जेवीं धर्माचें राज्य दुर्योधन ॥ घेत हिरून पापिष्ठ ॥४५॥
उदंड सांगती धर्मनीती ॥ परी कोणाचें न ऐके तो कुमती ॥ मायालोभानेम पडली भ्रांती ॥ अधोगति जावया ॥४६॥
कृपणासी नावडे धर्मवार्ता ॥ अभक्तासी नावडे हरिकथा ॥ व्यभिचारिणीसी निजभर्ता ॥ दृष्टीं देखतां कष्ट होती ॥४७॥
तया रीतीं तो दुर्जन ॥ नायके कोणाचेंही वचन ॥ म्हणे वैरागियासी ग्राम कोण ॥ व्यर्थ लिहून दिधला ॥४८॥
ऐकोनि अभक्ताची वाणी ॥ दयार्णव विचार करी मनीं ॥ रसिकमुरारास ते क्षणीं ॥ पत्र लिहून पाठविलें ॥४९॥
म्हणे जेवीत असलासी जरी तेथ ॥ तरी तैसेंच टाकूनि यावें येथ ॥ ऐसें लिहून सद्गुरुनाथ ॥ वाट पाहात राहिले ॥५०॥
तों रसिकमुरार ते अवसरीं ॥ जेवीत बैसला आपुलें घरीं ॥ तों मनुष्य पत्र घेऊनि सत्वरीं ॥ आला झडकरी लवलाहें ॥५१॥
सद्गुरूचा मनुष्य पाहतां दृष्टीं ॥ परम संतोष पावला पोटीं ॥ जेवीं सुकत्या झाडा अति नेहटी ॥ मेघवृष्टि जाहली ॥५२॥
कीं सासुरवाणिसीस माहेराहून ॥ मायेनें मूळ पाठविलें जाण ॥ तैशा रीतीं उल्हासोन ॥ वर्तमान पुसतसे ॥५३॥
म्हणे काय आज्ञा सद्गुरुनाथ ॥ देऊन पाठविलें तुम्हांतें ॥ तेणें पत्र काढूनि हातें ॥ टाकिलें त्वरित त्यापासीं ॥५४॥
वामहस्तें घेऊन सत्वरीं ॥ वांचून पाहे ते अवसरीं ॥ तैसीच आज्ञा वंदोनि शिरीं ॥ उठिला झडकरी जेवितां ॥५५॥
कोणासीं न बोलतां वचन ॥ तेथूनि सत्वर केलें गमन ॥ म्हणे सांगती तें तत्काळ करीन ॥ उल्हास निजमनीं धरियेला ॥५६॥
जाऊनि तया नगरांतरीं ॥ प्रवेशले सद्गुरूचें मंदिरीं ॥ दृष्टी देखतां झडकरी ॥ नमन करी साष्टांग ॥५७॥
उच्छिष्टें तैसाचि भरला हस्त ॥ देखोनि पुसती सद्गुरुनाथ ॥ मुखासी अन्न लागलें किमर्थ ॥ सांगें त्वरित मजपासीं ॥५८॥
येरू म्हणे सद्गुरुनाथा ॥ तुमची आज्ञा प्रमाण तत्त्वतां ॥ पत्र वाचूनियां पाहतां ॥ उठिलों जेवितां लवकरी ॥५९॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणे सद्गुरुभक्तीची निजखूण ॥ न कळे तुजविण कोणासी ॥६०॥
मग मुरारीसी सद्गुरुनाथ ॥ सांगती सकळ वृत्तांत ॥ म्हणे देवपूजेचे ग्राम समस्त ॥ दुर्जनें निश्चित वर्जिले ॥६१॥
उदंड सांगितली धर्मनीती ॥ परी तो नायकेच कुमती ॥ तुवां जाऊनियां सतरगती ॥ उपदेश त्याप्रति करावा ॥६२॥
सोडवूनियां आपुलें गांव ॥ कार्य साधूनि शीघ्र यावें ॥ घेऊनि श्रीकृष्णाचें नांव ॥ गमन करावें आतांचि ॥६३॥
सद्गुरुआज्ञा वंदोनि शिरीं ॥ तेथोनि निघाला झडकरी ॥ जाऊनियां नगरांतरीं ॥ ठाव बिराडीं घेतला ॥६४॥
तेथें भाविक होते सज्जन ॥ तयांसी सांगे वर्तमान ॥ म्हणे तुमच्या गांवचे अधिकार्‍यान ॥ इनाम हिरून घेतलें ॥६५॥
मज आज्ञा करून त्वरितें ॥ यास्तव पाठविलें सद्गुरुनाथें ॥ तरी आतांचि जाऊन त्वरितें ॥ साधूं कार्यार्थ आपुला ॥६६॥
लोक म्हणती तो परम खळ ॥ वैष्णवद्रोही अति चांडाळ ॥ तरी आपण होऊन उतावेळ ॥ तेथें तत्काळ नवजावें ॥६७॥
तुम्ही केवळ सात्विक भक्त ॥ तुमचा उपदेश न चाले तेथ ॥ कनकाची भाल कूपांत ॥ कासया व्यर्थ टाकावी ॥६८॥
सन्निध लोह नसतां पाहें ॥ खापरासी परीस घांसों नये ॥ कामधेनूची सरी पाहें ॥ बरड गाय करीना ॥६९॥
तृषा लागतां अगस्तीसी ॥ जाऊं नये थिल्लरापासीं ॥ कल्पतरु म्हणोनि बाभुळेसीं ॥ कामना मानसीं न धरावी ॥७०॥
परावें बाळ क्षुधित होये ॥ तरी वांझ स्त्रियेसी पान्हा न ये ॥ तेवीं सद्भक्तांचें वचन पाहें ॥ दुर्जन काय मानिती ॥७१॥
तरी आतां निजांगें त्वरित ॥ आपण कदापि न जावें तेथ ॥ आम्ही हळूचि युक्तिपंथ ॥ साधू कार्यार्थ आपुला ॥७२॥
ऐसें बोलतां गृहस्थ थोर ॥ मग रसिकमुरार देत उत्तर ॥ मजला गुरुआज्ञा साचार ॥ कीं कार्य सत्वर साधावें ॥७३॥
त्यांची आज्ञा प्रमाण पाहीं ॥ म्हणोनि जातों तया ठायीं ॥ नेदीच तरी आमुचा कांहीं ॥ उपाय नाहीं सर्वथा ॥७४॥
तों इकडे त्या दुर्जनाकारण ॥ कोणीं सांगितलें वर्तमान ॥ कीं ग्राम सोडवावयाकारण ॥ रसिकमुरास येतसे ॥७५॥
त्याची दृष्टीं पडतां जाण ॥ खळासी तत्काळ पडतें मोहन ॥ ऐसें ऐकूनियां वचन ॥ विस्मितमन जाहला तो ॥७६॥
मग विचारूनियां युक्ती ॥ काय करिता जाहला कुमती ॥ मदोन्मत्त आणवूनि हस्ती ॥ पैलवानासी एकांतीं सांगतसे ॥७७॥
म्हणे रसिकमुरास उठाउठीं ॥ आजि येतसे आमुचे भेटी ॥ तरी त्वां वारण उभा करूनि नेहटीं ॥ जाऊनि चोहटीं मारावा ॥७८॥
हें कार्य साधितांचि जाण ॥ कांहीं तुज देईन धन ॥ ऐसें ऐकूनि पैलवान ॥ अवश्य म्हणे तेधवां ॥७९॥
वारणासी मद्य पाजूनि बहुत ॥ उभा केला राजबिदींत ॥ तंव रसिकमुरार कीर्तन करीत ॥ येत त्वरित संभ्रमें ॥८०॥
शिष्यसंप्रदायी बहुत जन ॥ घेतले असती समागमेंकरून ॥ टाळ मृदंग प्रेमें घेऊन ॥ गात नाम गुण आवडीं ॥८१॥
जय जय रुक्मिणीकांता विश्वव्यापका ॥ विधिजनका कंसांतका ॥ निजभक्तांसी तुजविण सखा ॥ वैकुंठनायका नसेचि ॥८२॥
तूं नससी कोणे ठायीं ॥ ऐसा ठाव अणुमात्र नाहीं ॥ जेवें आकाश व्यापक पाहीं ॥ परी मलिन नाहीं सर्वथा ॥८३॥
कीं चंदन आणि हिंगण ॥ या काष्ठीं पेटलिया कृशान ॥ सुगंध दुर्गंध दोहींत जाण ॥ असे समान सारिखा ॥८४॥
ते वीं दुर्जन सज्जन दोघे जाण ॥ यांत सारिखा तूं जगज्जीवन ॥ तुज विश्वरूपा माझें नमन ॥ निजप्रीतीनें येतसे ॥८५॥
ऐसियापरी स्वानंदभरित ॥ श्रीहरीचे गुण वर्णीत ॥ नगरवासी लोक समस्त ॥ कौतुक पाहात निजदृष्टीं ॥८६॥
तों उन्मत्त वारण बिदींतूनी ॥ पुढें येतसे त्वरेंकरूनी ॥ ग्रामींचे लोक देखती नयनीं ॥ उमजले मनीं आपुल्या ॥८७॥
रसिकमुरारासी प्रीतीं ॥ कानीं येऊनि हळूंचि सांगती ॥ कीं दुर्जनें तुम्हांवरी धरूनि कुमती ॥ पाठविला हस्ती मारावया ॥८८॥
ऐसें सांगतां तयासी ॥ कांहीं भय न वाटे मानसीं ॥ म्हणे हें नश्वर रक्षितां यासी ॥ काळ ग्रासी अंतसमयीं ॥८९॥
तें सद्गुरुकारणीं ॥ लावितां जाण ॥ तत्काळ पळती सकळ विघ्नें ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ पुढें गमन करीतसे ॥९०॥
तों पुढें उन्मत्त वारण ॥ संमुख येतां देखिला दुरून ॥ शिष्यसंप्रदायी तयाकारण ॥ बोलिले वचन तें ऐका ॥९१॥
पुढें संमुख येतो काळ ॥ आतां येथूनि काढावा पळ ॥ नाहीं तरी आम्ही सकळ ॥ जीवें तत्काळ जाऊं कीं ॥९२॥
रसिकमुरार तयांप्रती ॥ काय बोलिले वचनोक्ती ॥ सद्गुरुउपदेश तुम्हीं निश्चितीं ॥ घेतला प्रीतीं निजनिष्ठें ॥९३॥
आतां निजदेहाचा लोभ धरूनी ॥ जाऊं म्हणतसां येथोनी ॥ तरी आधींच कां तुळसी गळां बांधोनि ॥ व्यर्थ गोंवूनि पडावें ॥९४॥
ऐसें वचन ऐकूनि कानीं ॥ माळा काढिल्या सकळांनीं ॥ सद्गुरु म्हणती तये क्षणीं ॥ तुम्हांपासोनि सूटलों ॥९५॥
ऐसें वचन बोलोनि देख ॥ तत्काळ पळाले सकळिक ॥ रसिकमुरार एकटा एक ॥ राहिला निष्टंक त्या ठायीं ॥९६॥
जेवीं उष्णकाळ येतां जाण ॥ मेघ टाकोनि देतीं गगन ॥ कीं शीतकाळाचें होतां आगमन ॥ सरिता संपूर्ण ओहटती ॥९७॥
कीं परचक्रें वेढितां नृपवर ॥ देहलोभी पळोन जाती सत्वर ॥ कीं विषम काळ पडतां साचार ॥ दांभिक अनाचार सांडिती ॥९८॥
नातरी वार्धक्यदशा येतां जाण ॥ इंद्रियें सांडिती विषयध्यान ॥ कीं गृहस्थ पीडितां दरिद्रेंकरून ॥ त्यागिती पिशुन तयासी ॥९९॥
भिक्षा मागतां शंकराचारी ॥ तों कांचरस आला हातावरी ॥ शिष्य पळूनि गेले झडकरी ॥ तैसी परी जाहली कीं ॥१००॥
नगरवासी लोक समस्त ॥ अवघे दुरून कौतुक पाहात ॥ म्हणती ग्रामींचा अधिकारी उन्मत्त ॥ मारितो व्यर्थ यालागीं ॥१॥
रसिकमुरास प्रेमेंकरून ॥ करीतसे श्रीहरीचें भजन ॥ शिष्यसंप्रदायी ठाकून ॥ पाहाती दुरून तेधवां ॥२॥
पैलवान उन्मत्त कुमती ॥ तेणें लोटूनि पेलिला हत्ती ॥ परी याचा भाव सर्वां भूतीं ॥ असे श्रीपति व्यापक ॥३॥
ऐसी ज्याची स्थिति पाहें ॥ त्यासीं कदापि नव्हेच अपाये ॥ वारण येउनियां लवलाहें ॥ धरी पाय तयाचे ॥४॥
तामसगुणी उन्मत्त वारण ॥ त्याणें केलें साष्टांग नमन ॥ ऐसें कौतुक देखोन ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥५॥
म्हणती गज हा अति उन्मत्त ॥ जीव मारित असंख्यात ॥ आणि मुरारस्वामीस दंडवत ॥ घालितो अद्भुत नवल कीं ॥६॥
सकळ शिष्यांनीं टाकिल्या माळा ॥ तितुक्याही निजकरें केल्या गोळा ॥ एके ठायीं करूनि सकळा ॥ घातल्या गळां वारणाच्या ॥७॥
रामकृष्णनारायण ॥ उपदेश दिधला त्याजकारण ॥ म्हणे टाकून उन्मत्तपण ॥ संतसेवन करावें ॥८॥
काया वाचा मन ॥ भक्तांस रिघालिया शरण ॥ मग गेलियाही प्राण ॥ गुरुआज्ञा निल्लंघावी ॥९॥
ऐसें सांगतां तयाप्रती ॥ वारणें सात्विक धरिली वृत्ती ॥ इजारदारासी सत्वरगती ॥ सेवक सांगती कौतुक ॥११०॥
म्हणती गज पाठविला मारावयासी ॥ त्यानें दंडवत घातलें तयासी ॥ वृत्तांत ऐकूनि मानसीं ॥ आश्चर्य तयासी वाटलें ॥११॥
चित्तीं अनुताप धरूनियां ॥ चालत आले तया ठाया ॥ म्हणे अद्भुत महिमा नेणोनियां ॥ छळण वायां म्यां केलें ॥१२॥
तुम्ही वैष्णवभक्त निश्चित ॥ म्हणोनि घातलें दंडवत ॥ काय अपेक्षित तुमचें चित्त ॥ ते आज्ञा त्वरित मज करा ॥१३॥
रसिकमुरास म्हणे यावरी ॥ आणिक इच्छा नाहीं अंतरीं ॥ श्रीगुरुवचन वंदोनि शिरीं ॥ पूजेचे ग्राम सोडवावे ॥१४॥
आणि उपदेश केला वारणातें ॥ तोही सोडून द्यावा मातें ॥ ग्रामाधिकारी अवश्य म्हणत ॥ मागुती दंडवत घातलें ॥१५॥
घेतलीं लिहूनि सनदापत्र ॥ सवें वारण घेतला त्वरित ॥ श्रीगुरूपासीं कीर्तन करीत ॥ साधोनि कार्यार्थ पातला ॥१६॥
पशुयातींत हस्ती उन्मत्त ॥ तोही जाहला ज्ञानवंत ॥ हें देखोनि आश्चर्य मनांत ॥ लोक समस्त करिताती ॥१७॥
वारणासी झालें पूर्ण ज्ञान ॥ तो रात्रीं ऐके हरिकीर्तन ॥ दिवसास अरण्यांत जाऊन ॥ इंधनें घेऊन येतसे ॥१८॥
वैष्णवां जेवावया सकळी ॥ नित्य पाहिजेत पत्रावळी ॥ अरण्यांत जाऊनि ते वेळीं ॥ पानें तत्काळीं आणीतसे ॥१९॥
उच्छिष्ट पात्रें देती टाकून ॥ तीं प्रीतीनें भक्षी वारण ॥ त्याजवांचूनि पदार्थ आन ॥ न भक्षीच सर्वथा ॥१२०॥
ठाकुरद्वारीं श्रीभागवत ॥ नित्य वाचिती वैष्णवभक्त ॥ श्रवण करितां नित्य नित्य ॥ वैराग्य अद्भुत मानसीं ॥२१॥
म्हणे पशुयातींत अति उन्मत्त ॥ वारणदेह लाधला येथ ॥ कृपा करितां सद्गुरुनाथ ॥ संतसमागम लाधला ॥२२॥
पूर्वजन्मीचें होतें सुकृत ॥ तें फळासी आलें त्वरित ॥ ऐसें वारण स्वमनांत ॥ नित्य कल्पीत निजआवडीं ॥२३॥
ऐसें बहुत दिवस लोटतां ॥ तों रसिकमुरार ॥ चालिले तीर्था ॥ आनंद झाला वैष्णवभक्तां ॥ उल्हासले निजमानसीं ॥२४॥
समागमें घेऊनि गज ॥ तीर्थासी चालिले वष्णवराज ॥ वस्त्र पात्र सकळ ओझें ॥ घालिती सहज त्यावरी ॥२५॥
वाटेसी कोणी तस्कर मिळून ॥ विष्णुभक्तांचें करिती छळण ॥ तेव्हां सक्रोध होऊनि वारण ॥ टाकी मारून त्यांलागीं ॥२६॥
मुखीं जपे जो रामनाम जान ॥ कंठी असे तुळसीभूषण ॥ याविरहित जवळी कोण ॥ येऊं नेदीच सर्वथा ॥२७॥
ऐसा अनुताप धरूनि चित्तांत ॥ दृष्टीसी तीर्थें देखिलीं बहुत ॥ मग कुरुक्षेत्रीं यावया त्वरित ॥ धरिला हेत बहुतांनीं ॥२८॥
पंथ क्रमितां सत्वरगती ॥ वाटेसी लागली अरुणावती ॥ तेथें उभा करूनि हत्ती ॥ केलें संतीं वास्तव्य ॥२९॥
त्रिरात्र राहावें तेथ ॥ ऐसा समस्तीं धरिला हेत ॥ तों अविंधराज अति उन्मत्त ॥ कळला वृत्तांत तयासी ॥१३०॥
दूत सांगती जाऊनि त्वरित ॥ बैरागी उतरले नगरांत ॥ त्यांनीं वारण उन्मत्त बहुत ॥ आहे सांगातें घेतला ॥३१॥
त्याचें उत्तम ठाणमाण ॥ आपुलें राज्यासी होईल भूषण ॥ तरी आपण बलात्कारें जाऊन ॥ घ्यावा मागून त्यांपासीं ॥३२॥
ऐसें दूतांनीं सांगतां ॥ अभिलाष पडला नृपनाथा ॥ म्हणे राजभूषण कासया वृथा ॥ त्या अतीतां पाहिजे ॥३३॥
दूतांसीं आज्ञा केली त्वरितें ॥ गज हिरूनि आणावा येथें ॥ बैरागी जरी न देती तुम्हांतें ॥ तरी शिक्षा त्यांतें करावी ॥३४॥
ऐकोनि दुर्बुद्धीचें वचन ॥ पायीक धांवले त्वरेंकरून ॥ वैष्णवमेळीं तो वारण ॥ स्वस्थमन बैसलासे ॥३५॥
संतांसी सेवक बोलती ॥ नृपवरें पाठविलें आम्हांप्रती ॥ कीं तुम्हांजवळी आहे हत्ती ॥ त्यावरी प्रीती बैसली ॥३६॥
हा आम्हांसी दिधला पाहिजे सत्वर ॥ नातरी नेऊं बलात्कारें ॥ ऐकोनि दुर्बुद्धीचें उत्तर ॥ वैष्णव थोर चिंतावले ॥३७॥
एकमेकांतें उत्तर बोलती ॥ उन्मत राजा अविंध कुमती ॥ यासी सांगतां धर्मनीती ॥ तरी तो कल्पांतीं नायके ॥३८॥
पिंजर्‍यांत घालोनि काग पढवितां ॥ तो कृष्णनाम न म्हणेचि सर्वथा ॥ कीं कृपणासीं द्रव्य मांगतां ॥ तरी शब्द वृथा जाईल ॥३९॥
शेरासी पाणी घालिता पाहें ॥ अमृतफळ कदापि नये ॥ कसावासी मोहें चाटितां गाय ॥ रक्षील काय तिजलागीं ॥१४०॥
तुलसीमाहात्म्य ऐकूनि कानीं ॥ बोकडासी दया नुपजे मनीं ॥ मद्यपियासी ब्रह्मज्ञानी ॥ देखतां नयनीं कंटाळे ॥४१॥
बोलका रावा देखोन पाहें ॥ त्यासी ससाणा रक्षील काये ॥ जळाविण मत्स्य तळमळिताहे ॥ तरी करुणा नये बकासी ॥४२॥
तेवीं अभक्तांसी सांगतीं धर्मनीती ॥ परी त्यांसी कदापि न रुचे ती ॥ ऐसा विचार करूनि संतीं ॥ उत्तर देती दूतांसी ॥४३॥
म्हणती विष्णुभक्तांविण वारण ॥ कोणासी धरूं नेदीच जाण ॥ तुम्ही स्पर्शतां यालागून ॥ टाकील मारून क्षणमात्रें ॥४४॥
ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ धरूं पाहाती राजदूत ॥ गज नाटोपेच निश्चित ॥ मारूं पाहात निजक्रोधें ॥४५॥
राजयापासीं जाऊन ॥ सकळ सांगती वर्तमान ॥ म्हणती विष्णुभक्तांवांचून ॥ नाकळे वारण कोणासी ॥४६॥
वचन ऐकूनि नृपनाथ ॥ माहातासी सांगतसे युक्त ॥ तूं वैष्णववेष धरून निश्चित ॥ जाईं त्वरित त्यापासीं ॥४७॥
अवश्य म्हणोनि तये वेळां ॥ कंठीं घातल्या तुळसीमाळा ॥ लावूनि गोपीचंदनटिळा ॥ कृष्णा गोपाळा जपतसे ॥४८॥
यात्रेकर्‍यांस लुटावयासी ॥ मार्गीं मैंद होती तापसी ॥ कां मृगासी पाश घालावयासी ॥ गौरी कीर्तनासी बैसती ॥४९॥
नातरी करावया उदरपोषण ॥ बहुरूपी घेती संन्यासग्रहण ॥ कीं मत्स्य धरावयाकारण ॥ मांडिती ध्यान बक जैसे ॥१५०॥
तैशापरी तो उन्मत्त ॥ कपटें झाला विष्णुभक्त ॥ वारणापासीं जाऊनि त्वरित ॥ मुखीं जपत कृष्णनाम ॥५१॥
वारणापासीं येऊनियां ॥ धरूं पाहातसे लवलाह्या ॥ अंतर्यामीं कळलें तया ॥ कीं कपटें काया पालटली ॥५२॥
परी मुखीं नाम जपतो पाहीं ॥ म्हणूनि उपाय न चले कांहीं ॥ वारणें शांति धरितां ते समयीं ॥ कपटें लवलाहीं आकळित ॥५३॥
राजद्वारीं नेतां जाण ॥ अति अद्विग्न झालें मन ॥ म्हणे संतसेवा आजपासून ॥ मजकारणें अंतरली ॥५४॥
ठाणीं बांधितां नेऊन ॥ न खाय कण अथवा तृण ॥ सप्त दिवस लोटतां जाण ॥ वैकुंठभुवन पावला ॥५५॥
जीवनास जातां अकस्मात ॥ देह ठेविला गंगेंत ॥ हरिस्वरूपीं धरूनि हेत ॥ सायुज्यमुक्ति पावला ॥५६॥
धरितां साधूंचा समागम ॥ पशु उद्धरला न लागतां क्षण ॥ मग मनुष्यासी लागावया सद्गुण ॥ नवल कोण तयाचें ॥५७॥
मैलागिरीभोंवत्या सकळा ॥ उगवल्या होत्या बोरी बाभुळा ॥ त्या भिन्न दिसती परिमळा ॥ न्यून सर्वथा नसती कीं ॥५८॥
तैसा खळ हीन यातीचा ॥ दुर्बुद्धि असेल जरी साचा ॥ परी शेजार घडतांचि संतांचा ॥ तरी उद्धार त्याचा होईल ॥५९॥
म्हणूनि भक्तकथा सुरस वाणी ॥ सभाग्य श्रोते ऐका कर्णीं ॥ पुढें मिराबाईस चक्रपाणी ॥ संकट देखोनि पावतील ॥१६०॥
तेचि रसाळ कथेची उत्पत्ती ॥ वाढीन सभाग्य श्रोतयांचें पंक्तीं ॥ श्रोतयां विनवी महीपती ॥ होय सुखप्राप्ति स्वानंदें ॥६१॥
स्वस्ति श्रीभक्तवि० ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविकभक्त ॥ सप्तत्रिंशा० रसाळ हा ॥१६२॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments