सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख-दारिद्ऱ्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी, किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात.
सोळा सोमवार पूजा साहित्य
शिवाची मूर्ती, बेलपत्र, जल, धूप, दीप, गंगाजल, धतूरा, अत्तर, पांढरं चंदन, रोळी, अष्टगंधी, पांढरे वस्त्र, नैवेद्य, ज्यात चूर्मा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गूळ मिसळून तयार करावं.
सोळा सोमवार व्रत संकल्प
कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प घ्यावे. यासाठी हातात जल, अक्षता, विडा, सुपारी आणि नाणी घेऊन शिव मंत्रसह संकल्प घ्यावा-
ऊं शिवशंकरमीशानं द्वादशार्द्धं त्रिलोचन्म्।
उमासहितं देव शिवं आवाहयाम्यहम् ।।
सोळा सोमवार पूजा पद्धत
व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे.
व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवतात.
16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17 व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात.
17 व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते.
व्रत करणारा दिवसभर उपास करतो. निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपास करावा.
ज्याला उपास जमत नाहीत त्याने शिरा, खीर वगैरे "गहू, गूळ व तूप" मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते.
व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करतो व "सोळा सोमवार कथा" किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचतो. नंतर "शिवस्तुती" म्हणून आरती करतो.
कापूर जाळून कापूर आरती देखील केली जाते.
त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी करतात.
कणिकेच्या चूर्म्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वत: घ्यावा. चूर्मा-गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकर्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. त्या हाताने कुसकरून चाळणीने चाळाव्या. यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे. याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाराने अर्धाशेर कणिकेचा चूर्मा घेऊन उपास सोडावा. चूर्मा करताना कणिकेत मीठ घालू नये. तसेच उपासास खावयाच्या पदार्थांतही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ वर्ज्य आहे.
सोळा सोमवार व्रताचे उद्यापन
उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चूरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणि अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षता, धूप, दीप,
कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, 108 किंवा 1008 बेलाची पाने व नैवेद्य या सोळा वस्तू असतात.
देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात.
मनांतल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चूरम्याचे तीन भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा व
तिसरा भाग घरी आणावा.
देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडशोपचार पूजा करता येते.
ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालते.
उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील 16 सोमवारांप्रमाणे "सोळा सोमवार कथा" व "सोळा सोमवार माहात्म्य" वाचतात.
"शिवस्तुती" म्हणून आरती करतात; चूरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खातात.
कुटुंबातले सर्वजण पंचपक्वान्नाचे भोजन करतात.
हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.
सोळा सोमवार व्रताचे फळ
हे व्रत केल्याने, दरिद्री धनवान होतो.
रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते.
दु:खी माणसाला सुख प्राप्त होते.
मनातील चिंता नाहीशी होते.
दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते.
पुत्र-कन्यांचा लाभ होतो.
कुमारिकांना मनपसंत पती मिळतो.
व्यापार्याला व्यापारांत फायदा होतो.
नोकरीत प्रमोशन मिळते.
श्रद्धापूर्वक हे व्रत करणाराची मनींची इच्छा परीपूर्ण होते.