Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वैभव लक्ष्मी व्रतकथा

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (10:55 IST)
एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखों लोक रहात होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतींत राहात आणि बसत उठत असत. पण नव्या जमान्यांत माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहीना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, किर्तन, भक्ति, परोपकार, दया, माया, वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती.
 
अशी एक म्हण आहे की, 'हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते.' त्याप्रमाणे शहरांत इतका मोठा दुराचार असूनही त्यांत काही चांगली माणसेही राहात होती.
 
अशा चांगल्या माणसांत शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पती ही विचारी आणि सुशील होता.
 
ती पतीपत्‍नी इमानदारीने जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्‍वर भक्तित सुखाने कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांच्या संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत.
 
शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना 'कर्मगती कांही निराळीच असते.' विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनविते. न जाणो, शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहूं लागला. भलत्याच धंद्यांत तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी 'रोडपती' झाला. रस्त्यातील भिकार्‍या प्रमाणे त्याची हालत झाली.
 
शहरांत दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. शीलाचा पती, त्याला दारुचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस-जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडे-फार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागीने वगैरे सर्व काही तो गमाऊन बसला.
 
एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्‍नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहात होता आणि ईश्‍वरभजनात सुखाने आपला काळ घालवीत होता. त्याऐवजी आता घरांत दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते. त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळायचे ही वांदे पडले आणि नवर्‍याच्या शिव्या खायची शीलावर पाळी आली.
 
शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीचा वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्‍वरावर भरवसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की 'सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच.' त्यामुळे दुःखा नंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेऊन प्रभू भक्तित ती लीन झाली.
 
अशारीतीने दारुन दुःख सहन करतां करतां आणि प्रभुभक्तित दिवस घालवतां घालवतां एक दिवस दुपारी तिच्या दरवाजांत कोणीतरी येऊन उभे राहिले.
 
शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्राने भरले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे?
 
तरीपण आपल्यादारीं आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा संस्कारा़ची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला.
 
पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती. पण तिच्या चेहेर्‍यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणूं अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहातांच शीलाच्या मनाला अपार शांति वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरीपण तिला पाहातांच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिला तिने घरांत नेले. आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसविले.
 
माताजी तिला म्हाणाली,"काय शीला! मला तूं ओळखले नाहीस?" काहीशा संकोचाने शीला म्हणाली, " माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते कि कित्येक दिवस ज्यांना मी शोधीत आहे त्या तुम्हीच आहांत पण ओळख लक्षांत येत नाही."
 
माताजी हसून म्हणली, " काय! विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरांत दर शुक्रवारी भजन होत असते, त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथें दर शुक्रवारी आपली भेट होते."
 
पती भलत्याच मार्गला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ते लक्ष्मीमातेच्या मंदिरातपण अलिकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते.
 
तेवढ्यांत माताजी म्हणाली, "लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस! अलीकडे तूं तिथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारांत पडले की तूं हल्लीं कां येत नाहीस? तूं आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनांत येऊन खबर काढण्याकरिता मी आले."
 
माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यांत अश्रूं उभे राहिले. माताजीच्या समोर ती हुंदके देऊन रडूं लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली. आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करूं लागली.
 
माताजी म्हणाली, "मुली, सुख दुःख हे ऊन आणि सांवली प्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच. तूं मनांत धीर धर आणि तुझे दुःख मला सांग, तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सांपडेल."
 
माताजीचे बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, "माताजी, माझ्या संसारांत खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्‍वराच्या कृपेने पैशाच्या बाबतींतही आम्ही समाधानी होतो. पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतींत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा, वगैरे वाईट सवयी वर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकार्‍यासारखी आमची स्थिती झाली."
 
माताजी म्हाणाली, "मुली सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतच. म्हणूनच म्हटले आहे. की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात. तरीपण तूं चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख तूं आता भोगलेच आहेस तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील, तूं तर लक्ष्मीमाताजीची भक्त आहेस. लक्ष्मीमाताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहाते. तेव्हा मनांत धीर धर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर, म्हणजेच सर्व काही ठीक होईल."
 
लक्ष्मीमाताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, "माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करीन."
 
माताजी म्हाणाली, "मुली, लक्ष्मीमातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला 'वरद लक्ष्मी व्रत' किंवा 'वैभव लक्ष्मी व्रत' असेही म्हणतात. हे व्रत करणाराच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि त्याला यश, सुख संपत्ति प्राप्त होते," असे म्हणून माताजीने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली.
 
"मुली, वैभवलक्ष्मी व्रत तसे साधे सुधे व्रत आहे. परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात कीं सोन्याच्या दागिण्याची हळद कुंकु लावून पुजा केली कीं ते व्रत झाले. पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिण्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिण्याची विधी पूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच "वैभवलक्ष्मी व्रता" चे फळ मिळते.
 
"हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. व्रत करणाराने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणी मनातल्या मनांत "जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता" असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुऊन एक पाट ठेऊन त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रूमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तु ठेवावी; आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी.
 
"लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मीमाता 'श्री यंत्राने' च संतुष्ट होते. तेव्हा वैभवलक्ष्मी व्रत करणार्‍याने प्रथम 'श्री’यंत्राचे आणि लक्ष्मीमाताच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पुजा करावी व लाल रंगाचे फूल वहावे. सांयकाळी घरी बनविलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनविली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक अकरावेळा 'जय लक्ष्मी माता' असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्षांना घालावे. अशारीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. या व्रताच्या प्रभावाने सर्वप्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात."
 
हे ऐकल्यावर शीला अत्यंत खूष झाली. ती माताजीला म्हणाली, "माताजी, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन. पण हे व्रत कितीवेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा."
 
माताजी म्हणाली, "अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे. पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मीव्रत हे लक्ष्मीमातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधी प्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी, दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे, पूजाविधी करून नारळ ओवाळायचा पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा त्या नंतर सात कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप (वैभवलक्ष्मी स्वरूप) माताजींच्या 
फोटोला वंदन करायचे. लक्ष्मीमातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की, "हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरण पूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर. माझ्या इच्छा पुर्‍या कर. निर्धनांना धन दे. निःसंतानांना संतान दे. सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणार्‍यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर."
 
असे बोलून लक्ष्मीमातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताच्या विधी ऐकल्यावर शीलाने डोळे मिटले आणि त्याच क्षणी मनातल्या मनांत संकल्प केला की, 'मी पण माताजीच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करीन.
 
मनांत संकल्प केल्यावर शीलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते. तिला आश्‍चर्य वाटले की माताजी कुठे गेली? ती माताजी दुसरी कोणी नव्हती, पण साक्षात लक्ष्मीमाताच होती. शीला लक्ष्मीमातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखविण्याकरिता लक्ष्मीमाता त्या माताजीचे रूप घेऊन शीलाकडे आली होती.
 
दुसर्‍याच दिवशी शुक्रवार होता. सकाळींच स्नान करून मनातल्या मनांत 'जय माता लक्ष्मी... जय माता लक्ष्मी...' असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली. दिवसभरांत कोणाची निंदा नालस्ती केली नाही. संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुऊन शीला पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरांत सोन्याचे दागिने पुष्काळ होते. पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुऊन तिने वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीने जो विधी 
सांगितला होता त्याप्रमाणे तिने "वैभवलक्ष्मी व्रत" केले. घरांत खडी साखर होती, तिचा तिने प्रसाद केला.
 
पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला. त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्यादिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला.
 
पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिने तिने एकवीस शुक्रवार "वैभवलक्ष्मी व्रत" केले. एकवीसाव्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की, "हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर. आमच्या मनातील इच्छा पुर्ण कर. निर्धनांना धन दे. निःसंतानांना संतान दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणार्‍याना सुख पुन्हा मिळवून दे. आम्हां सर्वांना सुखी कर." असे म्हणून लक्ष्मीमातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशारीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शीलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करूं लागला. लक्ष्मीमातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले शीलाचे दागिने सोडवून आणले. घरांत पूर्वीप्रमाणे सुख-शांती आली.
 
वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारीपाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरूवात केली. 'हे माता धनलक्ष्मी, शीलाला जसे तूं फळ दिलेस तसें सर्वांना फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुख शांती दे. जय माता धनलक्ष्मी.'

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

somvar mahadev mantra jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची

आनंदी पहाट भाऊबीज

एकात्मता निर्माण करणारा सण भाऊबीज

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments