लग्न आणि मंगलाष्टक विधी -
गौरीहार पूजल्यावर वधूचा मामा वधूला लग्नासाठी आणायला जातो. बोहल्यावर दोन पाट अमोर समोर पूर्व पश्चिम ठेवलेले असतात. पाटावर तांदुळाच्या राशी काढून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतात. याला लग्नवेदी म्हणतात.
लग्नवेदीवर एका पाटावर वर हातात मोत्यांच्या नारळ घेऊन फुलांचा हार घेऊन उभा राहतो त्याच्या पाठीमागे त्याचा मामा उभा राहतो. आणि समोरच्या पाटावर वधू हातात मोत्याचे नारळ आणि फुलांचा हार घेऊन उभी राहते. मुलीच्या पाठी तिचा मामा उभा राहतो . तसेच वधू आणि वराच्या बहिणी ज्यांना करवली म्हणतात वधूच्या आणि वराच्या पाठी मागे एक बहीण हातात दिव्याचे ताट घेऊन उभी असते. ताटामध्ये कणकेने बनवलेले दोन मोठे दिवे तेवत ठेवलेले असतात.
दिव्याच्या वाती कापसाची नसून काळ्या कापडाच्या तुकड्याला पीळ देऊन बनवतात तिला काडवात म्हणतात. या काडवाती तेलात भिजवून ठेवतात. तसेच एक अजून बहीण हातात हळद आणि कुंकवाचे बोटे काढलेल्या पाण्याचा तांब्या घेऊन त्यात आंब्याची पाने लावून त्यावर नारळ ठेऊन घेऊन उभी राहते.
वर आणि वधूच्या मधोमध कापडी वस्त्राला आडवे धरून अंतरपाट धरला जातो.हा अंतरपाट दोन्ही बाजूला उभे भटजी धरतात या अंतरपाटावर कुंकवाने दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले जाते. लग्नासाठी जमलेल्यांना रंग-बेरंगी तांदुळाच्या किंवा ज्वारीच्याअक्षता वाटप केले जाते. भटजी मंगलाष्टक म्हणाल्या सुरुवात करतात. प्रत्येक मंगलाष्टक संपल्यावर जमलेले सर्व आप्तेष्टअक्षता वर आणि वधूवर आशीर्वादाच्या रूपाने उधळतात.
मंगलाष्टक-
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।
लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।
गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।
अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।
रामो राजमणी सदा विजयते रामम्।
रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।
रामाय तस्मै नमः।
रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।
रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।
राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।
रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।
लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।
विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।
आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।८।।
‘शुभमंगल सावधान’ म्हणून मंगलाष्टकांची सांगता होते..लग्नाच्या मुहूर्तावर भटजी मंगलाष्टक संपवतात आणि श्लोक म्हणतात.
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तें घ्रीयुगं स्मरामी ||
त्या नंतर अंतरपाट काढतात आणि वधू आणि वर हातातील पुष्पहार एकमेकांना घालतात. आणि जमलेले सर्व जण टाळ्यांच्या गजराने त्यांचे अभिवादन करतात. वधू आणि वर तुपात भिजवलेली अक्षता एकमेकांच्या डोक्यावर टाकतात.
आणि वधू, वराच्या मागे उभ्या असलेल्या करवल्या दिव्याने दोघांचे औक्षण करतात आणि ताब्यातील पाणी वर आणि वधूच्या डोळ्यांना लावतात. वधू आणि वराकडील बायका आलेल्या सर्व लोकांना पेढे देऊन तोंड गोड करतात आणि बायकांना हळदी कुंकू लावून पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतात. अशा प्रकारे लग्न आणि मंगलाष्टक होतात.