Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मगरींचा तज्ज्ञ म्हणून जगभर नावाजलेला 'हा' प्राणीप्रेमी प्रत्यक्षात करायचा कुत्र्यांचे लैंगिक शोषण

Webdunia
सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (15:58 IST)
अ‍ॅडम ब्रिटन (53 वर्षे) यांनी स्वत:ची एक खास प्रतिमा निर्माण केली होती. शांत आणि संवदेनशील व्यक्ती तसंच मुक्या जनावरांची काळजी घेणारा, त्यांच्याबद्दल प्रेम असणारा आणि जगातील एक प्रसिद्ध मगर तज्ज्ञ अशी ही प्रतिमा होती.मात्र आता जे सत्य समोर येतं आहे ते फारच धक्कादायक आहे.
 
त्यानुसार अ‍ॅडम ब्रिटन हे प्राण्यांवर प्रेम करणारे नाही तर प्राण्यांशी जगातील सर्वाधिक वाईट वर्तणूक करणाऱ्या, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे.
या आठवड्यात, ब्रिटन यांना डझनभर कुत्र्यांचं लैंगिक शोषण करताना आणि त्यांच्यावर अत्याचार करताना फिल्म बनवण्याच्या आरोपांसाठी एक दशकाहून अधिक काळाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
प्राण्यांबरोबर क्रौर्यानं वागण्याच्या 56 प्रकरणांमध्ये अ‍ॅडम ब्रिटन यांनी बाल शोषणाशी संबंधित चार साधनांचा वापर केल्याचंही मान्य केलं आहे.
 
जगासमोर ब्रिटन यांची प्रतिमा नेहमीच एक प्राण्यांवर प्रेम करणारा आणि प्राण्यांच्या अधिकारांबद्दल बोलणारा अशी होती.
 
आता त्याच ब्रिटन यांच्याबद्दल आलेल्या या बातम्यांमुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनच्या कृत्यांमुळे त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला आहे.
 
जगानं ब्रिटन यांना सर्वात मोठ्या मगरीबरोबर पोहताना पाहिलं होतं. त्याचबरोबर स्मॉग या आपल्या पाळीव मगरीला त्यांनी अनेक चित्रपट आणि माहितीपटांच्या शूटिंगमधील वापरासाठी दिल्याचंही ऐकिवात होतं. मात्र आता त्याच ब्रिटन यांची कृत्ये ऐकून जग हा प्रश्न विचारतं आहे की अखेर ते 'मॅकमिन्स लगूनचा राक्षस' कसे काय झाले?
 
'मॅकमिन्स लगून चा राक्षस'
मॅकमिन्स लगून (Mcminns Lagoon) हे ऑस्ट्रेलियातील डार्विन परिसरात आहे.
 
मॅकमिन्स लगून हे ब्रिटन यांचं एक भलं मोठं घर आहे. तिथेच प्राण्यांवर लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
 
ऑस्ट्रेलियातील आपल्या घरी ब्रिटन यांनी सर डेव्हिड अ‍ॅटनबरोचा पाहुणचार देखील केला आहे.
बीबीसीशी बोलताना अनेक जणांनी ब्रिटन हे एक लाजाळू मात्र मिळून मिसळून राहणारी व्यक्ती असल्याचं सांगितलं. तर, ते एक अहंकारी व्यक्ती असून त्यांनी जे काम केलंच नव्हतं त्याचं श्रेय देखील स्वत:कडे घेतल्याचं काही जणांनी सांगितलं.
 
अर्थात ब्रिटन यांच्याबद्दल वेगवेगळी मतं असली तरी एका गोष्टीबाबत सर्वांचं एकमत होतं. ते म्हणजे ब्रिटनबद्दल सध्या ज्या प्रकारच्या बातम्या त्यांच्याबद्दल छापून येत आहे असं काही असल्याचं, ऐकल्याचं खूप विचार करून देखील लोकांना आठवत नाही.
 
ब्रिटनचे माजी सहकारी ब्रँडन सिडलेऊ याची तुलना अमेरिकन सीरियल किलर टेड बंडी प्रकरणाशी करतात. ते म्हणतात, "ही प्रत्यक्षात अशी स्थिती आहे, ज्यात असं काही झालं असेल या गोष्टीचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही."
 
मगरींबद्दल ब्रिटन यांना असलेलं आकर्षण
ब्रिटन यांचा जन्म 1971 मध्ये वेस्ट यॉर्कशायरमध्ये (इंग्लंड) झाला होता. न्यायालयात ब्रिटन यांच्याबद्दल सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून दिसतं की, त्यांनी लहानपणापासूनच अत्याचार करण्याची लैंगिक इच्छा दडवून ठेवली होती.
 
वयाच्या 13 वर्षापासूनच त्यांनी घोड्यांबरोबर या प्रकारची कृत्ये करण्यास सुरूवात केली होती.
इंग्लंडमध्ये ब्रिटन यांच्या तरुणपणाची फारशी माहिती उपलब्ध नाही.
आपल्या ब्लॉगमध्ये ब्रिटन यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या आयुष्यावर तीन व्यक्तींचा प्रभाव पडला आणि त्यामुळे ते प्राणी वैज्ञानिक झाले.
ब्रिटन यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या त्या तीन व्यक्ती म्हणजे - त्यांची आई, त्यांचे जीवशास्त्राचे शिक्षक वैल रिचर्ड्स आणि तिसरे म्हणजे सर डेव्हिड अॅटनबरो.
 
लीड्स विद्यापीठात त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं आणि 1992 मध्ये त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी ब्रिस्टल विद्यापीठातून वटवाघळांच्या शिकार करण्याच्या पद्धतींवर प्राणीशास्त्रातून पीएच.डी. पूर्ण केली.
 
मात्र इंग्लंडच्या बाहेर जाऊन मगरींवर संशोधन करण्याचं स्वप्न ब्रिटन यांनी लहानपणापासूनच पाहिलं होतं. 2008 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वत: हे सांगितलं होतं.
 
लहानपणापासून ब्रिटन यांना मगरींचं आकर्षण होतं.
 
डेन ऑफ गीक या मनोरंजन विषयाच्या न्यूज वेबसाईटशी बोलताना ब्रिटन यांनी सांगितलं होतं की, जोपर्यंत लोक स्वत:हून प्राण्यांबद्दल जाणून घेणार नाहीत तोपर्यत लोकांना प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल सांगून काहीही उपयोग होणार नाही.
 
त्यामुळेच 1990 च्या दशकाच्या मध्यात, ब्रिटन ऑस्ट्रेलियातील नॉर्दन टेरिटरीमध्ये गेले. मगरीसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. या भागात खाऱ्या पाण्याच्या जगातील सर्वाधिक मगरी आढळतात.
 
नॉर्दन टेरिटरीमध्ये ब्रिटन याच क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ ग्रॅहम वेब यांच्याकडे गेले. त्यांचं एक छोटंसं प्राणीसंग्रहालय आणि संशोधन केंद्र होतं. त्याचं नाव 'क्रोकोडाइल्स पार्क' असं होतं.
 
इथे ब्रिटन यांनी अनेक चित्रीकरणाच्या योजनांमध्ये भाग घेण्याबरोबरच संशोधन कार्यात देखील सहभाग घेतला.
 
2005 मध्ये इथेच करण्यात आलेल्या एका संशोधनानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगभरात त्यावर चर्चा झाली.
 
ब्रिटन यांनी हे संशोधन केलं होतं. मगरीच्या रक्तातील पॉवरफुल अॅंटिबायोटिक शक्तीबद्दल हे संशोधन होतं.
 
सुरू केलं स्वत:चं केंद्र
2006 मध्ये ब्रिटन यांनी क्रोकोडाइल्स पार्क सोडलं आणि आपल्या पत्नीबरोबर एक नवीन 'मगर संशोधन केंद्र' सुरू केलं.
 
नंतर चार्ल्स डार्विन विद्यापीठात ब्रिटन यांनी सहाय्यक संशोधक म्हणूनही काम केलं.
 
सुरूवातीला इथल्या लोकांना वाटलं की ब्रिटन हे लाजाळू व्यक्ती आहेत. मात्र आता त्यांच्याकडे सामाजिकदृष्ट्या 'विचित्र प्रकारचा माणूस' म्हणून पाहिलं जातं आहे.
 
क्रोकोडाइल्स पार्कसाठी फील्डवरील संशोधनाच्या कामाचं आयोजन करणारे जॉन पोमेरॉय म्हणतात की, ब्रिटन त्यांच्याच विश्वात असायचे. त्यामुळेच कदाचित ते फारसे लोकप्रिय नव्हते. मात्र ते आपल्या कामात निपुण होते.
 
ब्रिटन यांना या क्षेत्रात आणि चित्रीकरणाची कला शिकण्याची संधी देणारे प्राध्यापक वेब स्वत:ला ब्रिटन यांचा मार्गदर्शक समजायचे. मात्र त्यांच्याकडचं काम सोडल्यानंतर ब्रिटन यांनी सर्व संबंध संपवले होते.
आता प्राध्यापक वेब यांचा आरोप आहे की ब्रिटन हे एक अहंकारी व्यक्ती होते. त्यांनी क्रोकोडाइल पार्कच्या टीममधील इतर सदस्यांचं काम देखील स्वत:चं काम असल्याचं दाखवलं होतं. असं दाखवून ब्रिटन यांनी त्यांचे ग्राहक देखील आपल्याकडे खेचून घेतले होते.
 
बीबीसीशी बोलताना प्राध्यापक वेब म्हणाले, "तिथे फक्त वैज्ञानिक आणि वैज्ञानिकच आहेत. अॅडम ब्रिटन तिथे सर्वांना ओळखायचे. त्यांच्याकडे पुष्कळ ज्ञान आहे. मात्र ही एक वेगळी बाब आहे.
 
"ग्रंथपालाकडे सुद्धा खूप ज्ञान असतं. मात्र अॅडम ब्रिटन सारख्या लोकांना फक्त प्रसिद्धी हवी असायची."
 
2013 मध्ये सिडेल्यू यांनी ब्रिटन यांच्याबरोबर क्रोकबाइट नावाची एक डेटाबेस कंपनी स्थापन केली होती. बीबीसीशी बोलताना ते सुद्धा काहीसं असंच मत व्यक्त करतात.
 
सिडेल्यू म्हणतात की, या कामात वेबसाईटच्या डोमेन साठीचा खर्च करण्यापलीकडे ब्रिटननं काहीही काम केलं नव्हतं. मात्र त्यांना श्रेय घ्यायला खूप आवडायचं.
 
ब्रिटन आणि त्यांच्या मगरी
मात्र पुढच्या काळात ब्रिटन आणि त्यांच्या पाळीव मगरी हे एक प्रकारचं समीकरण झालं.
 
नॉर्दर्न टेरिटरीमधील प्राध्यापक वेब यांचं क्रोकोडाइल्स पार्क सोडल्यानंतर ब्रिटन यांनी वेगळी वाट धरली. त्यांनी स्वत:ला मगरींच्या संदर्भातील एक तज्ज्ञ म्हणून प्रस्थापित केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या आठ मगरींच्या घराला म्हणजे 'मॅकमिन्स लगून'ला एक जागतिक स्तरावरील चित्रीकरण स्थळ बनवलं.
 
नाव न सांगण्याच्या अटीवर ब्रिटन यांचे एक माजी मित्र आणि वन्यजीव संशोधक सांगतात की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटन यांनी स्वत:चं असं काही स्थान निर्माण केलं होतं की त्याला तोड नव्हती."
 
2006 मध्ये सर डेव्हिड यांच्या 'लाइफ इन कोल्ड ब्लड' या माहितीपटाच्या शूटिंगसाठी ब्रिटन यांनी खास असं कुंपण तयार केलं. यामध्ये मगरी संभोग करत असतानाच्या दृश्यांचं चित्रीकरण केलं गेलं. याची खूपच चर्चा झाली होती.
 
डेली टेलीग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल ब्रिटन यांनी सांगितलं होतं की, या चित्रीकरणाच्या वेळेस आपल्या आदर्श व्यक्ती सोबत काम करणं हे त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती सारखंच होतं.
 
मगरींच्या हालचाली, त्यांचा वावर याचं चित्रीकरण करणं हे खूप अवघड काम असतं. त्यामुळे 'मॅकमिन्स लगून'वर ब्रिटन यांच्या मगरींच्या हालचालींचं चित्रीकरण करण्यासाठी टीव्ही टीमची गर्दी होऊ लागली होती.
2018 मध्ये एनटी न्यूज सोबत बोलताना ब्रिटन अभिमानानं म्हणाले होते, "जर तुम्ही कुठेही खाऱ्या पाण्यातील मगरीचा पाण्यातील शॉट किंवा सीन पाहिला असेल तर समजा की तो इथल्या स्मॉग या मगरीचाच आहे."
 
त्याच प्रकारे स्टीव्ह बॅकशेल यांनी आपल्या साठ माहितीपटांसाठी इथे चित्रीकरण केलं होतं. तर मॅन व्हर्सेस वाइल्ड या जगप्रसिद्ध टीव्ही शोचे बेअर ग्रील्स सुद्धा इथे येऊन गेले आहेत.
 
इतकंच काय तर चित्रपट निर्माते देखील अॅडम ब्रिटन यांचा नंबर स्वत:जवळ बाळगू लागले होते. मगरींचा तज्ज्ञ ही त्यांची ख्याती परदेशात देखील वाढली.
 
2011 मध्ये फिलिपाईन्समध्ये जगातील सर्वात लांब मगर पकडण्यात आली होती. त्या मगरीची लांबी मोजण्यासाठी देखील ब्रिटन यांनी मदत केली होती.
 
नंतर 2016 मध्ये ब्रिटन यांनी सीबीएसचे टीव्ही सूत्रसंचालक अॅंडरसन कूपर यांच्याबरोबर '60 मिनिट' या कार्यक्रमाच्या एका भागासाठी बोत्सवानामधील रानटी मगरींबरोबर पाण्यात डुबकी मारून चित्रीकरण करण्यासाठी मदत केली होती.
 
ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक आणि लेखक अॅंड्रयू ट्राउकी यांनी बीबीसीला सांगितलं की, "आपल्या क्षेत्रात ते एक लीडर होते. त्याबरोबरच ते एक चांगले माणूस देखील होते."
 
ब्रिटन यांच्यावरील आरोप आणि गुन्हा
2018 मध्ये ट्राउकी यांनी मगरीसंदर्भात एक हॉरर चित्रपट देखील बनवला होता. ब्लॅक वॉटर असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस आणि नंतर या चित्रपटाच्या पुढील भागासाठी 2019 मध्ये देखील त्यांनी ब्रिटन यांच्याबरोबर काम केलं.
 
त्यावेळेस ब्रिटन यांच्या केंद्रात ट्राउकी जितका वेळ होते त्याला ते आनंददायक काळ म्हणतात. त्यांनी खासकरून ब्रिटन यांच्या 'खूपच चांगल्या' स्विस शेफर्डचा देखील उल्लेख केला.
 
ब्रिटनबद्दल न्यायालयात सांगण्यात आलं की, आतापर्यत हे प्राणी वैज्ञानिक फक्त आपल्या पाळीव प्राण्याचं शोषण करत होते आणि कुत्र्यांच्या इतर मालकांनी कुत्रे त्यांच्याकडे देण्यासाठी प्रयत्न करायचे.
 
गमट्री या ऑस्ट्रेलियन ऑनलाइन मार्केटमध्ये ब्रिटन अशा लोकांचा शोध घ्यायचे ज्यांना कोणत्या तरी कारणानं आपला प्राणी नको असायचा किंवा दूर सारायचा असायचा. त्याबदल्यात ब्रिटन त्यांना एक चांगलं घर द्यायचं वचन द्यायचे.
 
जर कोणी ताजी माहिती घेण्यासाठी आला तर ब्रिटन त्यांना 'खोटी कथा' सांगायचे किंवा जुने फोटो दाखवायचे.
बहुतांश प्रकरणांमध्ये कंटेनरच्या आत रेकॉर्डिंगसाठी वापरण्यात आलेल्या उपकरणांमुळे होत असलेल्या त्रासामुळेच कुत्र्यांचा आधीच मृत्यू झालेला असायचा.
 
याच कंटेनरला ब्रिटन 'टॉर्चर रुम' म्हणायचे.
 
अटक होण्याच्या 18 महिने आधी, ब्रिटन यांनी किमान 42 कुत्र्यांवर अत्याचार केले. त्यात 39 कुत्र्यांचा मृत्यू झाला.
 
ट्राउकी म्हणतात, "मी जेव्हापासून ब्रिटनबद्दल हे सर्व ऐकलं आहे तेव्हापासून मी खूप अस्वस्थ आहे. ब्रिटन यांना या गोष्टीसाठी अटक होईल असा कधी विचार देखील केला नव्हता."
 
ब्रिटन यांच्याबद्दलच्या या बातमीमुळे जगभरातील प्राणीप्रेमींना मोठा धक्का बसला होता. जगभरातील शेकडो लोक सोशल मीडियावर यासंदर्भात व्यक्त होत होते. काहीजण तर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात देखील हजर राहून ब्रिटन यांना मृत्यूदंड देण्याची मागणी करू लागले.
अर्थात 1985 मध्येच ऑस्ट्रेलियात मृत्यूदंडाची शिक्षा बंद करण्यात आली आहे.
ब्रिटन यांना शिक्षा मिळालेली पाहण्यासाठी काहीजण डार्विनला पोहोचले. तिथे न्यायालयात जेव्हा ब्रिटन यांच्या गुन्ह्यांबद्दल सांगितलं जात होतं तेव्हा काहीजण रडताना देखील दिसले.
 
ब्रिटन यांनी ज्या प्राणीप्रेमींची फसवणूक केली होती अशा लोकांच्या वतीनं हे लोक लढू इच्छित होते. या प्राणीप्रेमींपैकी काही जण तर अजूनही धक्क्यातच आहेत.
 
नताली करे न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांपैकी एक आहे. नताली म्हणतात, "मला वाटायचं की ते खूप बुद्धिमान आणि दयाळू आहेत. मात्र आता हे सर्व कळाल्यानंतर तीन आठवड्यांपासून मी नीट झोपलेली नाही."
 
मात्र सर्वजण असंही म्हणतात की ब्रिटन हिंसक किंवा क्रूर आहेत असं वाटेल अशा प्रकारचं कोणतंच चिन्ह किंवा संकेत प्रत्यक्षात दिसला नाही.
 
ब्रिटन यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे की, ते एका विचित्र प्रकारच्या विकारानं ग्रासलेले होते. या आजारात लहानपणापासूनच तीव्र आणि विचित्र लैंगिक संबंधांची इच्छा होते.
 
आपल्या माफीनाम्यात ब्रिटन यांनी 'वेदना आणि धक्क्या'ची 'पूर्ण जबाबदारी' स्वीकारली आहे. आपण स्वत:वर उपचार करणार आहोत असं वचन देऊन सर्वकाही सुरळीत करण्याचा मार्ग देखील शोधणार असल्याचं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख