Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्भधारणेनंतर 27 वर्षांनी बाळाचा जन्म, गोठवलेल्या भ्रूणापासून अपत्यप्राप्ती

Childbirth 27 years
, शनिवार, 5 डिसेंबर 2020 (15:42 IST)
हॉली हेंडरिच

मॉली गिब्सनचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला. पण तिने नऊ महिन्यांच्या नव्हे तर तब्बल 27 वर्षांच्या प्रवासानंतर या जगात पाऊल ठेवलंय.
 
ऑक्टोबर 1992मध्ये हे भ्रूण गोठवण्यात आलं होतं आणि 2020मध्ये ते वापरण्यात आलं. अमेरिकेतल्या टेनेसीमध्ये राहणाऱ्या टीना आणि बेन गिब्सन जोडप्याने हे भ्रूण दत्तक घेतलं.
 
सर्वाधिक काळासाठी गोठवून ठेवलेल्या भ्रूणाद्वारे जन्म होण्याचा आगळावेगळा विक्रम या भ्रूणाद्वारे जन्मलेल्या मॉली बाळाच्या नावावर आता नोंदला गेलाय. विशेष म्हणजे मॉलीची मोठी बहीण एमाच्या नावावर हा विक्रम आतापर्यंत होता.
 
मॉलीच्या जन्मानंतर तिची आई टीना गिब्सन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या म्हणतात, "मला अजूनही भरून येतं. मला एक नाही दोन लेकी असतील असं मला पाच वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं."
 
मूल व्हावं म्हणून टीना आणि बेन गिब्सन पाच वर्षं प्रयत्न करत होते. नेमकी त्याच वेळी टीना यांच्या आई-वडिलांनी स्थानिक वृत्त वाहिनीवर एम्ब्रियो अॅडॉप्शन (Embryo Adoption) म्हणजे भ्रूण दत्तक घेण्याविषयीची बातमी पाहिली.
"म्हणूनच जगाला आम्ही आमची गोष्ट सांगतोय. कारण माझ्या आई-वडिलांनी ती बातमी पाहिली नसती, तर आज आम्ही इथे नसतो. आमची बातमी होणं, हे वर्तुळ पूर्ण होण्यासारखं आहे, " 29 वर्षांच्या टीना सांगतात.
 
टीना पेशाने प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत तर त्यांचे पती बेन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत.
 
ही बातमी पाहिल्यानंतर या जोडप्याने नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरशी (NEDC) संपर्क साधला.
 
नॉक्सव्हिल परिसरातल्या या ख्रिस्ती समाजसेवी संस्थेमध्ये भ्रूण गोठवून ठेवण्याचं काम केलं जातं. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेश (In Vitro Fertilization) पद्धतीने उपचार घेत गर्भधारणा करणाऱ्या जोडप्यांनी गर्भधारणेसाठी न वापरता दान केलेले भ्रूण इथे गोठवून ठेवले जातात.
 
गिब्सन यांच्यासारखी कुटुंबं मग यापैकी एक भ्रूण दत्तक घेत बाळ जन्माला घालू शकतात. या बाळाची जनुकं त्याला जन्माला घालणाऱ्या आईवडिलांपेक्षा वेगळी असतात.
 
अमेरिकेत आताच्या घडीला असे गोठवून ठेवलेले सुमारे 10 लाख भ्रूण असल्याची माहिती NEDC ने दिलीय.
 
NEDC चे मार्केटिंग आणि डेव्हलपमेंट डायरेक्टर मार्क मेलिंगर सांगतात, "भ्रूण दत्तक घेणाऱ्यांपैकी 95% जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बाळ होण्यात अडचण आलेली असते. या लोकांना त्यांचं कुटुंब वाढवायला आम्ही मदत करू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे."
 
गिब्सन दांपत्याने पहिल्यांदा भ्रूण दत्तक घेतल्यानंतर 2017मध्ये त्यांची मोठी मुलगी एमाचा जन्म झाला.
"आधी मूल होत नाही म्हणून रात्री जागून काढल्या होत्या. त्यानंतर आई झाले म्हणून रात्री जागवल्या. पण अशाप्रकारे दमणं हवंहवंसं होतं," टीना सांगतात.
 
NEDC ची स्थापना 17 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेतून हजारापेक्षा जास्त जणांनी भ्रूण दत्तक घेतलंय. सध्या दरवर्षी 200 भ्रूण दत्तक घेतली जातात. भ्रूण दान करणाऱ्या कुटुंबाशी संपर्क ठेवायचा की नाही, याचा निर्णय ते दत्तक घेणाऱ्यांना घेता येतो.
 
भ्रूण दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्याला 200 ते 300 दात्यांची प्रोफाईल्स दाखवली जातात. यामध्ये त्यांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती असते.
 
दीर्घकाळ बाळासाठी आसुसलेल्या गिब्सन जोडप्यासाठी या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्यांनी NEDCच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
 
"बाळ कसं दिसेल, ते कुठलं आहे याने आम्हाला फरक पडत नव्हता. पण मी आणि माझे पती, आम्ही दोघेही फारसे उंच नाही. म्हणून मग आमच्या उंची आणि वजनाशी मिळत्याजुळत्या पालक दात्यांची निवड केली."
 
एमा आणि मॉली या गिब्सन दांपत्याच्या दोन्ही मुलींचं एकमेकींशी रक्ताचं नातं आहे. त्या सख्या बहिणी आहेत. म्हणजे एकाच दांपत्याने हे दोन्ही भ्रूण दान केले होते. 1992मध्ये हे भ्रूण दान करून गोठवण्यात आले.
 
आता हे भ्रूण दत्तक घेऊन आई होणाऱ्या टीना तेव्हा (1992मध्ये) फक्त एक वर्षाच्या होत्या.
 
सर्वाधिक काळ गोठवलेल्या भ्रूणातून जन्म होण्याचा विक्रम आधी एमाच्या नावावर होता. तिचं भ्रूण 24 वर्षं गोठवलेल्या रूपात होतं.
 
तिची धाकटी बहीण मॉलीच्या जन्मानंतर आता हा विक्रम तिच्या नावे जमा झालाय.
 
एमाचं मॉलीवर खूप प्रेम असल्याचं टीना सांगतात. "ती प्रत्येकाला सांगते, ही माझी लहान बहीण मॉली."
 
या दोघींमधलं साम्य पाहून गंमत वाटत असल्याचंही टीना सांगतात.
 
भ्रूण गोठवून ठेवण्यासाठीचा काळ अमर्याद असल्याचं NEDC ने सांगितलंय.
 
IVF नंतर गोठवलेल्या भ्रूणातून पहिल्यांदा 1984मध्ये ऑस्ट्रेलियात बाळ जन्माला आलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो, कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचे पुढच्या सामन्यात खेळणार्‍या वर सस्पेंस