Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नॅन्सी पेलोसी यांच्यावर चीनची बंदी

US Speaker of the House Nancy Pelosi
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (17:01 IST)
अमेरिकेच्या संसद अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चीनने बंदी घातली आहे.पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यापासून चीन त्यांच्यावर नाराज आहे. प्रत्युत्तरादाखल चीनने तैवानजवळच्या क्षेत्रामध्ये सैन्याचा सराव सुरू केला आहे.
 
याबाबत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी काढलेल्या पत्रकात ते म्हणतात, चीनच्या अंतर्गत प्रकरणात गंभीर हस्तक्षेप झाला आहे. चीनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडत्वाचं नुकसान झालं आहे. चीनच्या वन-चायना नितीला दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. तैवान प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याचं नुकसान झालं आहे."
 
तैवान-दक्षिण कोरियानंतर जपानमध्ये पोहोचल्यावर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला अमेरिका कधीही एकटं पडू देणार नाही असं सांगितलं.
 
याआधी काय काय घडलं?
चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य सीमेजवळील समुद्रात बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ही बातमी दिली आहे.
 
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी डॉन्गफेंग या मिसाइलचा वापर करते. त्यांनी या मिसाइलचा वापर केला आहे.
चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेनी आपली युद्धनौका पाठवली आहे.
 
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की त्यांनी त्यांची संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. शांततापूर्ण भागात चीनने बेजबाबदारपणे कारवाई करुन या भागाची शांतता भंग केली आहे.
 
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते टॅन कीफी यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांनी संयुक्तपणे जे कारस्थान चालवलं आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.
 
चीनच्या सरकारी माध्यमांनी मिसाइल लॉन्चचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
 
चीनच्या या कारवाईनंतर अमेरिकेच्या सैन्याने तैवानच्या आग्रेय समुद्रात युद्धनौका 'रोनाल्ड रेगन' पाठवली आहे.
 
नौसेनेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की अमेरिकेने रोनाल्ड रीगन आणि त्याचा स्ट्राइक ग्रुप फीलिपीन्सच्या समुद्रात एक स्वतंत्र लष्करी
 
नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये, साई-इंग-वेन यांची घेतली भेट, चीनच्या लष्करी हालचाली
चीनने गर्भित इशारा दिल्यानंतरही अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या प्रमुख नॅन्सी पेलोसींनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई-इंग-वेन यांची भेट घेतली आहे.
 
साई-इंग-वेन यांनी पेलोसी यांचं भव्य स्वागत केलं आहे. तैवानला भेट दिल्याबद्दल त्यांनी पेलोसी यांचे आभार मानले आहेत.
 
नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यामुळे चीननं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे. तसंच हे अमेरिकेकडून गंभीर उल्लंघन असल्याचं चीनचं म्हणणं आहे. त्यासाठी चीननं बिजिंगमधल्या अमेरिकी राजदूतांना समन्स बजावलं आहे.
 
तसंच चीननं तैवानच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत लष्करी संचलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे.
 
गेल्या 25 वर्षांत पहिल्यांदाच कुठल्यातरी मोठ्या अमेरिकन नेत्यानं तैवानला भेट दिली आहे. पेलोसी यांच्या या भेटीला व्हाईट हाऊसने पाठिंबा दिलेला नाही.
 
पण, या भेटीमुळे कुठलाही वाद निर्माण होण्याची गरज नसल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. तैवानमधल्या जैसे थे परिस्थितीला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
 
पेलोसी मंगळवारी रात्री तैवानची राजधानी तैपेयीमध्ये पोहोचल्या. आज म्हणजेच बुधवारी त्या तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई-इंग-वेन यांच्याशी चर्चा करून तिथून निघणार आहेत. दोन्ही नेत्या दुपारच्या जेवणासाठी भेटणार असल्याचं तिथल्या सरकारी प्रसारमाध्यामांनी सांगितलं आहे.
 
अमेरिका आणि चीनमधल्या संघर्षाच्या बातम्या आपल्याला नवीन नाहीत. गेले काही दिवस या दोघांमध्ये तैवानवरून चांगलीच गर्मागर्मी सुरू आहे.
 
अमेरिकेच्या नेत्या नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यामुळे तो तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडतंय? समजून घेऊया.
 
तैवानवरून चीन-अमेरिका भिडले
तैवानचं नेमकं स्टेटस काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
 
तैवानला स्वत:चं सरकार आहे, राष्ट्रपती आहेत, राजमुद्रा आहे. सीमांचं रक्षण करण्यासाठी लष्करी बळही आहे. पण तरीही त्यांना संपूर्ण राष्ट्राचा दर्जा नाही.
 
औपचारिकदृष्ट्या तैवानचं नाव आहे 'रिपब्लिक ऑफ चायना' अर्थात चीनचं प्रजासत्ताक. ते स्वतःला सार्वभौम राष्ट्र मानतात. पण चीनचं म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचं म्हणणं आहे की तैवान हा आपल्यातून फुटून बाहेर निघालेला प्रदेश आहे.
 
चीन भूप्रदेशाबाबत किती आक्रमक आहे याची प्रचिती आपल्याला तिबेट, डोकलाम किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये आजवर घडलेल्या घटनांवरून आलीच आहे. आता अशा एका प्रदेशात जेव्हा नॅन्सी पेलोसींसारख्या एक बड्या अमेरिकन नेत्या येतात तेव्हा साहजिकच चीन संतापतो.
 
तैवानमध्ये आल्यानंतर पेलोसींनी ट्वीट करत म्हटलं, "तैवानच्या लोकशाहीला अमेरिकेचा पाठिंबा डगमगणारा नाही. आमच्या शिष्टमंडळाची भेट हेच दर्शवते. अमेरिकेने तैवानच्या 2 कोटी तीस लाख लोकांबरोबर उभं राहणं आज खूप महत्त्वाचं आहे कारण जगापुढे लोकशाही आणि हुकुमशाही यांच्यातून निवड करण्याची वेळ आलेली आहे. "
 
नॅन्सी पेलोसी अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या अध्यक्ष आहेत. गेल्या दोन दशकांत इतक्या उच्चपदस्थ अमेरिकन नेत्याने तैवानला भेट दिलेली नाही.
 
अमेरिका तैवानला शस्त्रास्त्रं विकते, त्याबद्दलही चीनने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. पण अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ नेत्याने तैवानला भेट देणं चीनला रुचलेलं नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय, "अमेरिका जर या चुकीच्या मार्गावर पुढे जातच राहिली तर त्यानंतर होणाऱ्या गंभीर परिणामांसाठी तेच जबाबदार असतील."
 
यापूर्वीही चीनने पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, मोठी किंमत चुकवावी लागेल अशाप्रकारचा इशारा अमेरिकेला दिला होता. तैवानच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याबद्दल चीन नेहमीच आक्रमक असतो.
 
'अमेरिका तैवान प्रदेशातली शांतता धोक्यात आणतंय' - चीन
चीनने नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीचा निषेध नोंदवला आहे.
 
"अमेरिकेनं 'वन चायना' धोरणाचं उल्लंघन केलंय. याचे चीन आणि अमेरिकेच्या विपरित परिणाम होतील," असं चीन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
 
तसंच, "हे चीनच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेचं उल्लंघन आहे," असंही चीन परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
 
"यामुळे तैवानच्या प्रदेशातली शांतता धोक्यात येऊ शकते. तैवानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या फुटिरवाद्यांना यामुळे चुकीचा संदेश जात आहे," असंही यात म्हटलं आहे.
 
अमेरिकेने 'तैवान कार्ड' खेळणं बंद करावं. चीनच्या अंतर्गत विषयांत ढवळाढवळ करू नये आणि चुकीचा आणि धोक्याचा मार्ग अमेरिकेने अवलंबू नये, असं चीनने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत : महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात